जगातल्या सर्वात बलाढ्य नेव्हीची सूत्र एका महिलेच्या हातात असणार आहेत

चूल-मुल आणि रांधा-वाढा या संकल्पना फार पूर्वीपासून स्त्रियांसाठी असायच्या. ही परिस्थिती फक्त भारतात नव्हती तर सगळीकडेच होती. अगदी अमेरिकेसारख्या पाश्चात्य देशात सुद्धा बायकांना कोणतीच मोकळीक नव्हती. पण अमेरिकेतल्या स्त्रिया ही चौकट मोडून हळू हळू बाहेर पडू लागल्या. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या. म्हणजे वैज्ञानिक क्षेत्र असो वा राजकीय क्षेत्र असो स्त्री सगळीकडे पुरुषासोबत काम करत होती. पण तरी अजूनही अशी काही क्षेत्रं आहेत जिथे स्त्रिया पोहोचू शकलेल्या नाहीत. त्यापैकी एक म्हणजे अमेरिकन आर्मी. सतराव्या-अठराव्या दशकात अमेरिकन आर्मीमध्ये स्त्रिया फक्त छावणीतंच सैनिकांसाठी त्यांच्या परिचारिका म्हणून किंवा जेवण बनवून देण्याचं काम करायच्या आणि वेळ पडलीच तर हेरगिरी सुद्धा करायच्या पण कधी सैनिक म्हणून त्या सैन्यात शामिल नव्हत्या झाल्या.

पण आता त्यातही एका महिलेने बाजी मारली आहे. 

अलीकडेच अमेरिकन नौदलात अ‍ॅडमिरल लिसा मेरी फ्रँचेट्टी यांची नौदलाच्या प्रमुखपदी निवड झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी केली. पण अजूनही अमेरिकन सिनेटकडून या निवडीला मान्यता मिळालेली नसली तरी ती लवकरच मिळेल आणि एकदा का सिनेटने त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केला तर हा क्षण इतिहास रचेल.

त्या सध्या अमेरिकन नौदलाच्या युरोप-आफ्रिका आणि नेपल्स, इटली इथे सहयोगी संयुक्त सैन्य दलाच्या कमांडर आहेत. 

तसंच त्यांच्याकडे ऑपरेशनल आणि पॉलिसी या दोन्ही क्षेत्रांमध्ये नैपुण्य आहे. लिसा फ्रँचेट्टी या दक्षिण कोरियामध्ये अमेरिकेच्या सहाव्या फ्लीट आणि यूएस नेव्हल फोर्सेसच्या प्रमुख होत्या. त्यांनी एअरक्राफ्ट कॅरियर स्ट्राइक कमांडर म्हणूनही काम केलं आहे.

कोण आहेत लिसा फ्रँचेट्टी?

लिसा फ्रँचेट्टी यांचा जन्म न्यूयॉर्कमधल्या रोचेस्टर इथे झाला. पत्रकारितेत बॅचलर्स डिग्री मिळवून नंतर त्या फिनिक्स विद्यापीठातून संस्थात्मक व्यवस्थापनात पदव्युत्तर झाल्या. नंतर त्यांनी १९८५ मध्ये नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या नेव्हल रिझर्व्ह ऑफिसर ट्रेनिंग कोअर प्रोग्रॅममधून लष्करी प्रशिक्षण घेतलं आणि अशी त्यांच्या लष्करी कारकीर्दीला सुरुवात झाली.

कोरियातील अमेरिकन नौदलाच्या कमांडर, कॅरियर स्ट्राइक ग्रुप ९ आणि वाहक स्ट्राइक ग्रुप १५ च्या कमांडर म्हणून त्यांनी नेतृत्व केलं आहे. 

तसच, नेव्ही स्टाफच्या संचालक आणि यूएस नेव्ही वॉर कॉलेजच्या कमांडर म्हणूनही काम केलं आहे. लिसा फ्रँचेट्टी या दक्षिण कोरियामध्ये अमेरिकेच्या सहाव्या फ्लीट आणि यूएस नेव्हल फोर्सेसच्या प्रमुख होत्या. त्यांनी एअरक्राफ्ट कॅरियर स्ट्राइक कमांडर म्हणूनही काम केलं आहे. 

अमेरिकन नौदलातसुद्धा त्यांनी अनेक मानाची पदं भूषवली आहेत. 

लिसा यांना अमेरिकन नौसेनेच्या सेकंड लेफ्टनंट, नौसेनेच्या ऑपरेशन्स विभागाच्या उपप्रमुख तसंच स्ट्रॅटेजी, प्लॅन्स आणि पॉलिसी ऑफ द जॉईंट स्टाफच्या संचालकपदी काम करण्याचा अनुभव आहे. तसंच लिसा फ्रँचेट्टी या फोर स्टार अ‍ॅडमिरलची रँक मिळवणाऱ्या दुसऱ्या अमेरिकन महिला आहेत. त्यांनी कॅरिअर स्ट्राईक ग्रुपचं नेतृत्वही केलं आहे. २०२२ मध्ये अमेरिकन नौसेनेच्या ऑपरेशन्स विभागाच्या उपप्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि आता त्या याच नौसेनेचं प्रमुख म्हणून नैतृत्व करणार आहेत.

सिनेटने शिक्कामोर्तब केला की त्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम पाहतील आणि जॉइंट चीफ ऑफ स्टाफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या पहिल्या महिला असतील. 

अमेरिकन मीडियामधल्या एका वृत्तानुसार, अमेरिकन संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांच्या अ‍ॅडमिरल लिसा मेरी फ्रँचेट्टी या पहिल्या पसंती नव्हत्या. लॉयड ऑस्टिन यांनी अमेरिकेचे पुढचे नौदल प्रमुख म्हणून सॅम्युअल पापारोआ यांची शिफारस केली होती. पण बायडेन यांनी सॅम्युअल पापारोआ यांना नौदलाचं प्रमुख केलं नसलं तरी, पापारोआ यांनाही पदोन्नती दिली आहे. सॅम्युअल पापारोआ यांचं आता पॅसिफिक प्रदेशाच्या अमेरिकन सैन्य दलाचे कमांडर म्हणून नामनिर्देशित करण्यात आलं आहे.

पण अमेरिकन नौसेनेच्या प्रमुखपदी म्हणजे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ या पदावर एका महिलेची नियुक्ती होणं ही संरक्षण क्षेत्रासाठी खूप महत्वाची आणि आनंदाची बाब आहे. या ऐतिहासिक गोष्टीमुळे संरक्षण क्षेत्राचं स्वप्न पाहणाऱ्या इतर महिलांच्या पंखात अजून बळ येईल एवढं मात्र निश्चित.

लिसा फ्रँचेट्टी यांनी संरक्षण क्षेत्रात आणि मुख्यतः नौदलात अडतीस वर्ष काम केलं आहे. लिसा यांना नौदलाच्या ऑपरेशन्स आणि धोरणात्मक कामाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे अमेरिकन नौसेनेच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफ या पदाला लिसा फ्रँचेट्टी या नक्कीच योग्य न्याय देतील हे निश्चित.

हे ही वाच भिडू :

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.