भाजपचे जेष्ठ नेते ज्यांचे सल्ले ऐकायचे ते संघाचे मदनदास देवी कोण होते ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह आणि ज्येष्ठ नेते मदनदास देवी यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी बँगलोरच्या राष्ट्रीय स्वास्थ्य हाॅस्पीटलमध्ये निधन झालं. त्यांचं पार्थिव बेंगलोरहुन पुण्याला आणलं, पुण्याच्या मोतीबाग येथील राष्ट्रीय स्वयं संघाच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आणि आज त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेत. यासाठी देशातील व राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते, मंत्री, संघाचे नेते उपस्थित होते. साहजिकच विचारलं जाऊ लागलं मदनदास देवी कोण होते ज्यांच्या जाण्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं…

आज जाणून घेऊया मदनदास देवी कोण होते ? त्यांचं संघाच्या कार्यात काय योगदान राहिलंय आणि संघाचं सरकार्यवाह हे पद नक्की काय त्या पदाचं महत्व काय ?

मदनदास देवी यांचं जन्मगाव हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा. त्यांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देखील  करमाळ्यातच झालंय. शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले. पुण्यातील बीएमसीसी कॉलेजला १९५९ ला प्रवेश घेतला. नंतर आयएलएस लॉ कॉलेजमधून त्यांनी गोल्ड मेडल मिळवत एलएलबी केलं.

पुण्यातील शिक्षणादरम्यान ते ज्येष्ठ बंधू खुशालदास देवी यांच्या प्रेरणेने संघाच्या संपर्कात आले. संघात दैनंदिन शाखेतील स्वयंसेवक,तत्कालीन संघाचे पदाधिकारी प्रल्हादजी अभ्यंकर व अन्य अधिकारी वर्ग यांच्याशी वैचारिक चर्चा,संघ परीवारातील विविध आयामा विषयी विस्तारीत सल्ला मसलत,अनेक पैलूंवर विचारधारेची स्पष्टता घेत राष्ट्रीय पुन्रनिर्माणच्या व्यापक संदर्भात संघ कार्यासाठी स्वतःला झोकून देण्याचा निर्णय घेतला.

शिक्षण पूर्ण होताच वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी घर सोडलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पूर्ण वेळ काम करायला सुरुवात केली. यात महत्वाचा टप्पा होता तो अभाविप चा.

अभाविपची स्थापना १९४८मध्ये झाली ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील बंदीच्या पार्श्वभूमीवर. स्वातंत्र्याची चव चाखलेल्या; परंतु राष्ट्रनिर्माणातील आव्हानांसाठी स्वतःला सिद्ध कसे करायचे, त्याबद्दलची जाण नसलेल्या तरुणांना सामावून घेणारे संघाबाहेरचे पण संघविचारांनी चालणारे असे छात्र युवा संघटन ही काळाची गरज आहे, हे या नेत्यांनी हेरले होते.

१९६४ पासून मदनजी यांनी मुंबईत अभाविपचे कार्य सुरू केले.  १९६६ मध्ये अभाविप मुंबईचे मंत्री झाले. १९६६ मध्ये आंतरराज्यीय विद्यार्थी जीवन दर्शनचे प्रतिनिधी ईशान्येकडे गेले आणि त्यांनी ईशान्येशी संपर्क सुरू केला.

१९६७ मध्ये अभाविपच्या इंदूर अधिवेशनापासून त्यांनी अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कामाला सुरवात केली. १९७० च्या तिरुवनंतपुरम अधिवेशनात राष्ट्रीय संघटन मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.

मदन दास हे ‘अभाविप’चे पहिले संघटनमंत्री होते.

संघटनमंत्री हा संघ परिवारातल्या संघटनांमध्ये त्यांच्या ठायी असलेल्या संघटनकौशल्यासाठी ओळखला जातो. मुख्य म्हणजे त्याला सर्वांना संभाळून घ्यावे लागते, प्रसंगी रोष ओढवून घेणे, वाईटपणा घेणे अशीही कामे संघटनेच्या व्यापक हितासाठी करावी लागतात. महत्त्वाचे म्हणजे संघटनमंत्र्याकडे बाकी कोणताही घटनादत्त अधिकार नसला तरी नैतिक अधिकार हा असावाच लागतो. मदनजींकडे हा नैतिक अधिकार ठळकपणे होता आणि त्यांनी तो आवश्यक तेव्हा वापरलादेखील.

१९७५ पासून अभाविप आयामात जबाबदारी अभाविपत विभाग, प्रदेश, क्षेत्रीय या जबाबदारी स्वीकारल्या. अ.भा. संघटन मंत्री म्हणून ही त्यांनी काम केले. १९६४ पासून त्यांनी मुंबईत अभाविपचे कार्य सुरू केले. १९६६ मध्ये अभाविप मुंबईचे मंत्री झाले.

पूर्ण देशभरात तालुका- महाविद्यालय- शहर स्तरावर संस्कारित कार्यकर्ता समूह उभा राहील यासाठी विशेष लक्ष देत संघटन उभे केले .अभाविपला नावाप्रमाणे अखिल भारतीय स्तरावर नेण्यात पायाला भिंगरी लावल्यासारख सतत प्रवास करीत देशभरात अनेक समर्पित कार्यकर्त्यांची फळी उभी केली.

मदनदास देवींनी आपलं संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यात घालवले.

भाजपमधील सर्व वरिष्ठ नेते मदनदास देवी यांचा आदेश मानत होते, माझी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असतील किंव्हा आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील हे सगळे मदनदास देवी यांचा सल्ला मानत असायचे.

हे ही वाच भिडू :

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.