पुणेकरांनो, खबरदार ! आता पबमध्ये दंगा केला तर गाठ थेट या लेडी बाउन्सरशी आहे !

बाउन्सर माहिती आहेत का? हो तेच. बार, पब सारख्या रंगीत ठिकाणी दाराजवळ रुक्ष चेहरा करून काळ्या कपड्यामध्ये हाताची घडी घालून उभे असणारे आडदांड पहिलवान . पब मध्ये गैरवर्तन करणार्यांना उचलून फेकण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.

आता पर्यंत इथे पुरुषांची मोनोपॉली होती. पण आता पुणे तिथे काय उणे म्हणवून घेणाऱ्या शहरात स्वामिनी लेडी बाउन्सरस नावाची फक्त महिला बाउन्सर असणारी संस्था सुरु झाली आहे. नारीशक्ती फक्त नाऱ्या पुरती न उरता तीचा ताकद या पुरुषांच्या एकाधिकार असणाऱ्या क्षेत्रात दाखवून देण्याचा चंग या महिलांनी बांधला आहे.

अमिता कदम यांनी स्वामिनी लेडी बाउन्सर(SLB) ची स्थापना केली. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की,”माझ्या बहिणीचे पती बाउन्सर आहेत. त्यांच्या कामाबद्दल मला कायम आदर वाटायचा. माझ्या लक्षात आले की पब मध्ये किंवा बार मध्ये पुरुष बाउन्सरस मुळे काही वेळा मुलीना त्रास वाटतो. मग महिलानीच बाउन्सर का बनू नये?  ”

यातूनच स्वामिनी लेडी बाउन्सर सुरु झाली. या कंपनीमध्ये आज पन्नास महिला बाउन्सर म्हणून आत्मविश्वासाने काम करत आहेत.

618f8733 9fcf 4fed 9759 0a1a8ca94fc0

बार-पब असो वा कोणताही इव्हेंटचा कार्यक्रम असो, बाउन्सरवर खूप जबाबदारी असते.  कामाच्या वेळा बऱ्याचदा गैरसोयीच्या असतात. रात्री अपरात्री दारू पिऊन माजलेल्या धेंडाना सरळ कराव लागत. मग अशा वेळी घरच्यांचा सपोर्ट हा महत्वाचा असतो. अमिता कदम यांच्या सासरच्यांनी त्यांना या कामासाठी प्रोत्साहनच दिले.

मात्र या कंपनीमध्ये काम करणाऱ्या आरती भुवल यांना सुरवातीला घरच्यांचा विरोध झाला. मात्र अमिता कदम यांनी आरतीच्या नवऱ्याला भेटून तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि तिच्या घरच्यांना आश्वस्थ केलं.

आज या महिलांना कंपनीमध्ये सेल्फ डिफेन्स, संभाषण कला, मॅनेजमेंट स्कील याचे प्रशिक्षण दिले जाते. स्वताच्या संरक्षणाबरोबरच बार मध्ये शिस्त राखणे, तिथे येणाऱ्या मुलींना आधार देणे, त्यांची छेड काढणार्यांना वठणीवर आणणे या जबाबदाऱ्या स्वामिनी बाउन्सरच्या या मुली अतिशय बेधडक पणे करत आहेत. या कामातून मिळणारी कमाई सुद्धा समाधानकारक आहे.

अबला म्हणल्या जाणाऱ्या या पोरी फक्त स्वतःच्या पायावर उभ्या आहेत इतकच नव्हे तर नशेत ज्यांचे पाय लडखडत आहेत त्यांना त्या आधार देण्याचं काम ही करत आहेत.

आज केरळ मध्ये स्त्रियांना मंदिरात प्रवेश दिला गेला पाहिजे की नको अशी चर्चा चालू असताना सोमरसमंदिरात कोणाला प्रवेश द्यायचा हे ठरवणाऱ्या या पुण्याच्या लेकीनी देशभरात एक चांगल उदाहरण प्रस्थापित केल आहे.

ताजा कलम: घरात बायकोच्या लाटण्याचा धाक म्हणून बार मध्ये जावं तर तिथे महिला बाउन्सरचा नवा धाक. गरीब पुणेरी नवर्यांनी आता आमच पिणं सुद्धा बंद झालंय असा आक्रोश सुरु केलाय अशी बातमी कानावर आली आहे. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.