ती आहे भारताची पहिली महिला ट्रक मॅकेनिक ! 

दिल्लीचं संजय नगर ट्रान्सपोर्ट नगर. या भागात दिवसातून सात हजारांच्या दरम्यान ट्रक देशाच्या वेगवेगळ्या भागात जातात. चार पाच हजार ट्रक एका ठिकाणी थांबून असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रक असल्याने साहजिक हितं तितकीच गॅरेज आहेत. तितकीच चहाची दुकानं देखील आहेत. सात हजार ट्रकचा थांबा असल्यानंतर तो भाग कसा विकसित झाला असेल हे वेगळ सांगण्याची तशी गरज देखील नाही. 

मात्र यात एक वेगळी गोष्ट देखील आहे. याच संजय नगर ट्रान्सपोर्ट नगरच्या एका भागात एक महिला पन्नास किलोचं ट्रकच टायर मोठ्या हिंमतीने उचलत असते. एका क्षणात भल्याभल्यांना लावजेल अशा स्टाईलने ती ट्रकच टायर बसवते. ट्रकच्या इंजिनला हात घालते. फरक फक्त इतकाच असतो ती जेव्हा हे सगळं करत असते तेव्हा तिच्या हातात असतात बांगड्या. अंगावर साडी, कपाळावर सिंदूर आणि त्यावरुन येणाऱ्या घामाच्या धारा. 

साडीचा पदर खोचून ट्रकचं भलमोठ्ठ टायर बदलणारी ती आहे तरी कोण हे पहायला लोकं येतात. ते ही गेल्या वीस वर्षांपासून. 

शांतीदेवी अस तिचं नाव आणि हि गोष्ट वीस वर्षांपुर्वीची. 

वीस वर्षांपुर्वी शांतीदेवी आणि तिचा नवरा मध्यप्रदेशातून पोटाच्या कामांसाठी दिल्लीत आले. काय करायचं हे त्या दोघांदेखील माहित नव्हतं फक्त नवरा म्हणालेला काहीतरी करु. त्यांच्या पोटापाण्याचा प्रवास त्यांना दिल्लीच्या संजय नगर ट्रान्सपोर्ट नगरमध्ये घेवून आला. इतक्या मोठ्या प्रमाणावर येणारे ट्रक पाहून त्या दोघांनी इथच एखादं चहाची टपरी काढायचा निर्णय घेतलां. 

झालं शांतीदेवी आणि तिचा नवरा कामाला लागले. शांतीदेवी डोक्यावरचा पदर सावरत चहा करु लागल्या. दोघं मिळून कष्ट करु लागले. कष्ट असले की जम बसतो. त्यांचा देखील बसला. संसार उभा राहिला. हळुहळु मुलांची संख्या वाढली. इतकी की शांतीदेवींना आत्ता चक्क आठ मुलं झाली होती. 

वाढलेल्या संसाराचा खर्च चहा विकून करता येणं शक्य नव्हतं. सेटल झालेली चहाची टपरी बंद करुन नवं काहीतरी शोधणं देखील शक्य नव्हतं. आत्ता काय करायचं ? 

तेव्हा शांतीदेवींनी चहाच्या टपरीसोबत काय करता येवू शकेल याचा शोध घेतला आणि उत्तर मिळालं ट्रक गॅरेज. झालं दुसऱ्याचं दिवसापासून छोट्या मोठ्या गोष्टी घेवून गॅरेज उभा राहिलं. शांतीदेवींचा नवरा गॅरेजमध्ये काम करु लागला तर शांतीदेवी चहाच्या टपरीवर काम करु लागल्या. 

हे ही वाचा – 

हळुहळु गॅरेजच काम शांतीदेवीच्या एकट्या नवऱ्याच्या आवाक्याबाहेर गेलं. अशा वेळी काय झालं असेल तर शांतीदेवींनी आपल्या डोक्यावरचा पदर कंबरेला खोचला आणि पुढं आल्या. नवऱ्यासोबत त्या पटापटं काम करु लागल्या. ट्रकची टायर उचलू लागल्या. इंजिन खोलू लागल्या. एक बाई जिला बंडखोरी देखील कायअसतं ते माहित नव्हतं तिला फक्त पोटाची भूक इतकीच जाणिव होती. ती जेव्हा पुढे आली तेव्हा नवऱ्याने सुद्धा ती मागं हो म्हणून सांगितलं नाही. नवऱ्याने देखील तिला कौतुकानं स्वीकारलं. 

हळुहळु ट्रक दुरुस्त करणारी बाई पहायला लोकं यायला लागले. शांतीदेवी बातम्यात आली. हळुहळु तिची चर्चा युनो सारख्या आंतराष्ट्रीय पातळीवर देखील झाली. पण शांतीदेवीला त्याचं कोणतच कौतुक नव्हत. तिला फक्त होतं ते समाधान संसाराच्या चाकाला हात लावण्यासाठी ट्रकच्या चाकाला हात लावल्याचं ! 

हे ही वाचा –