म्हणून मुंबईच्या चर्चमध्ये हिंदू ब्राह्मण पुजाऱ्याचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला

मुंबईच्या फोर्टमध्ये एक चर्च आहे. सेंट थॉमस कॅथेड्रल ॲंग्लीयन नावाचं हे चर्च. रिझर्व बॅंकेपासून हाकेच्या अंतरावरच हे चर्च उभारण्यात आलेलं आहे. याच चर्चमध्ये संगमरवरी शिल्प आहे.

धोतर नेसलेला, खांद्यावर उपरणं असलेला, घेरा व शेंडी असलेला ब्राम्हण पुजारी एका वडाच्या झाडाला टेकून उभा आहे. व ते वडाचे झाड शोक करत असल्याचं दिसून येत आहे. एका चर्चमध्ये हिंदू ब्राह्मण पुजाऱ्याचा पुर्णाकृती पुतळा असणारं हे जगातील एकमेव चर्च आहे.

साहजिक तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सगळं कशामुळे आणि का..? 

चर्चमधल्या ब्राह्मण पुजाऱ्याची गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला जोनाथन डंकन नावाचा माणूस माहित हवा. जोनाथन डंकन हा मुंबईचा गव्हर्नर होता. इसवी सन १७९५ ते १८११ या काळात तो मुंबईचा गव्हर्नर राहिला.

मुंबईचा सर्वाधिक काळासाठी म्हणजे १६ वर्ष तो गव्हर्नर होता. १८११ साली त्याचा मृत्यू झाला, नाहीतर तो अजून काहीकाळ गव्हर्नर राहिला असता अस सांगितलं जातं. 

जोनाथन डंकन भारतात आला ते साल होतं १७७२. वयाच्या १६ व्या वर्षी तो भारतात आला आणि वयाच्या ५५ व्या वर्षी तो गेला. तो भारतात असतानाच गेला. इतक्या काळात तो इंग्लडला कधीच गेला नाही. १६ व्या वर्षी त्याने इंग्लड सोडलं ते कायमचं.

या काळात काय झालं तर १६ व्या कोलकत्त्याला आल्यानंतर तो ईस्ट इंडिया कंपनीत छोट्या पदावर काम करू लागला. १७८८ या आठ वर्षात तो हलक्या दर्जाचं काम करत राहिला त्यानंतरच्या काळात तो तत्कालीन व्हाईसरॉय कॉर्नव्हालिसच्या नजरेत आला. कार्नवालिसने त्याचा प्रामाणिकपणा पाहून त्याला बनारसचा रेसिडेन्ट केलं.

रेसिडेन्ट हा त्या भागाचा प्रमुख असायचा. त्याला तिथले कर गोळा करण्यापासून ते युद्ध करण्यापर्यन्तचे अधिकार असायचे. पण या माणसाने बनारसच्या विकासाचा अध्याय सुरू केला. 

त्याला समजलं की इथे असणाऱ्या राजकुमार जातीत स्त्रीभ्रूण हत्या करण्याची अमानवीय प्रथा आहे. त्या काळात या जमातीची लोकसंख्या ४००० च्या आसपास होती पण मुलींच प्रमाण नगण्य होतं. डंकनने कंबर कसली या प्रथेमागच्या कारणांचा शोध घेतल्यानंतर त्याला कळालं की, हुडांप्रथेमुळं स्त्रीभ्रूण हत्या करण्यात येते. तो या हत्या बंद करण्याच्या मागे लागला. त्यासाठी कायदा आणण्याची शिफारस त्याने कॉर्नवालिसला पत्र लिहलं.

बनारसला संस्कृत विद्यापीठ उभा करण्याची गोष्ट. 

डंकन या इंग्रज माणसाने बनारसमध्ये संस्कृत विद्यापीठ उभा केले. १७९१ मध्ये त्याने हा प्रस्ताव कॉर्नवालिसला दिला. त्याच्या संमतीनंतर संस्कृत विद्यापीठ बनारसमध्ये उभा करण्यात आले. या विद्यापीठातून वेद, वेदांत, पुराणे, आयुर्वेद, साहित्य, ज्योतिष्यशास्त्र, धर्मशास्त्र, न्याय अशा विषयांबाबत शिक्षण देण्यास सुरवात करण्यात आली.

त्याच्या या योगदानाची साक्ष देणारा शिलालेख आजही बनारसच्या संस्कृत विद्यापीठात आहे.

त्याच्या कामावर खूष होवून त्याला मुंबईचे गव्हर्नर करण्यात आलं. 

मुंबई प्रांतात आजच्या कर्नाटकापासून ते गुजरातपर्यन्तचा भाग येत होता. या सर्व भागाचा मुख्य कारभार डंकनच्या हाती आला. मुंबईचा गव्हर्नर असताना गुजरातच्या पोरबंदर, बडोदा भागातल्या स्त्रीभ्रूण हत्येबाबत त्याला माहिती मिळाली. याचा मागोवा घेत तो बडोद्याला पोहचला.

त्याला समजलं की जडेजा समाजात मुलगी जन्माला आली की नवजात मुलीला नदीकाठी घेवून जातात तिथे एक खड्डा खोदून तो खड्डा दूधाने भरण्यात येतो. याच खड्यात लहान मुलीला बुडवून मारण्याची अमानुष प्रथा आहे.

या अमानवीय प्रथेविरोधात त्याने प्रयत्न सुरू ठेवले. त्याने जडेजा समाजाबरोबर बोलणी करून तूम्ही ही प्रथा बंद केल्यानंतर कंपनी तुम्हाला काही खास अधिकार देईल अस सांगितलं. त्याची बोलणी कामी आली. त्यानंतरच्या काळात जडेजा समाजातून ही प्रथा नष्ट होण्यास मदत झाली. 

स्त्रीभ्रूण हत्येसाठी लढणारा या डंकनचा मृत्यू १८११ साली झाला. वरती आपण ज्या चर्चचा उल्लेख केला त्याच चर्चमध्ये त्याचे पार्थिव पुरण्यात आले. व त्याच्या गौरवार्थ त्याच्या मृत्यूचा शोक करणारे शिल्प या चर्चमध्ये कोरण्यात आले.

संस्कृत विद्यापीठाची स्थापना करणाऱ्या डंकनच्या मृत्यूचा शोक ब्राह्मण पुजाऱ्यांना झाल्याचं या शिल्पातून साकारण्यात आलं. त्यामुळे जगातील एकमेव चर्चमध्ये ब्राह्मण पुजाऱ्याचा पुतळा साकारण्यात आला. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.