आणि टिळकांनी आपल्या फॅक्टरीसाठी लातूरची निवड केली…

देशात पहिल्यांदाच स्वतःच्या बिझनेस नेटवर्कचा वापर करुन पॉलिटिकल नेटवर्क वाढविणारे दुसरं तिसरं कोणी नसून लोकमान्य टिळक होते असं म्हंटल तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका. शेतकऱ्यांपासून ते व्यापारी वर्गापर्यंत आपला कनेक्ट वाढवून भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत या लोकांना आणण्यासाठी  टिळकांनी बरेच प्रयत्न केले. त्यांना आपली राजकीय मते खर्‍या अर्थाने समाजाच्या सर्व स्तरात पोहोचविता आली.

राजकीय आंदोलने करता करता उत्तम आणि यशस्वी व्यापार कसा करावा, याचा वस्तुपाठ टिळकांनी आपल्या कृतीतून घालून दिला.

लोकमान्य टिळकांच नाव घेतलं कि आपल्या डोळ्यांसमोर येतात शिवजयंती आणि गणेशोत्सव. म्हणजे या घटनांना खऱ्या अर्थाने सामाजिक रूप देण्याचं काम टिळकांनी केलंच आहे. राजकीय साध्यासाठी साधन म्हणून उद्योगाचा वापर करून घेणार्‍या टिळकांना उत्सवाबरोबर उद्योगही तेवढाच महत्त्वाचा वाटला.

टिळकांनी सार्वजनिक प्रश्नात लक्ष घालायला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा तर ते व्यापार्‍यांच्या बाजूने उभे राहिले. निमित्त होते क्राफर्ड प्रकरणाचे.

व्यापार आणि उद्योग क्षेत्रात टिळकांच्या वडिलांनाही रुची होती. त्यासाठी त्यांनी इंग्रजी अधिकार्‍याला पैसे उसने दिले होते. तोच हा क्राफर्ड. जॉइंट स्टॉक कंपनीत टिळकांच्या वडिलांनी एक हजार रुपये याच क्राफर्डमुळे गुंतवले होते. पुढे ते बुडाले, पुन्हा मिळाले नाहीत.

भारतातला पहिला ‘लॉ क्लास’ टिळकांनी काढलेले पण टिळकचं. 

डेक्कन सोसायटीचा राजीनामा दिल्यानंतर स्वतःच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून टिळकांनी दोन मार्ग निवडले. हे दोन्ही मार्ग उद्योगाचे होते. त्यांनी ‘लॉ क्लास’च्या माध्यमातून शिकवणी वर्ग सुरु केले. आजकाल सगळीकडे ज्याचे पेव फुटलेले आहे, त्या खासगी क्लासेसचे जनक लोकमान्य टिळक आहेत. ‘लॉ क्लास’ची जाहिरात त्या काळात ‘केसरी’त प्रसिद्ध व्हायची. यातून जोडले गेलेले बहुतेक तरुण पुढे टिळकांच्या राष्ट्रीय विचाराने झपाटले.

‘बिझनेस नेटवर्क’चा वापर ‘पॉलिटिकल नेटवर्क’ म्हणून टिळकांनी सगळ्यात आधी आपल्या देशात केला.

१८९१ साली टिळकांनी लातूर मध्ये जिनिंग कंपनीची सुरुवात केली. विशेष म्हणजे, त्यात भागीदार म्हणून दोन मराठी माणसांना सोबतीला घेतले. यात आबासाहेब परांजपे आणि अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे होते. आजकाल ज्या व्यवसायाला आपण ‘जॉइंट स्टॉक कंपनी’ म्हणतो ना तेच भांडवल गुंतवणुकीचे काम टिळकांनी सुरु केले.

लातूर हे त्याकाळी बाजारपेठेचं गाव होत म्हणूनच टिळकांनी आपल्या फॅक्टरीसाठी लातूरची निवड केली होती.

आपल्याच देशात कच्चा मालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहावे यासाठी  टिळक अतिशय आग्रही होते. व्यापाराबद्दल टिळकांचे भाकीत होते की,

“आम्हास लागत असलेले कापड मँचेस्टर येथे तयार व्हावे व चिनी-जपानी लोकांस लागत असलेले कापड आम्ही मुंबईस तयार करावे असला खो-खोचा व्यापार कधीही शाश्वत राहावयाचा नाही.”

टिळकांचे सर्वसाधारण म्हणणे असे आहे की,

“आता इंग्रजी राज्यात जो तो उठतो तो शिक्षणानंतर नोकरीच्या मागे धावतो. उच्चवर्णीय लोक नांगर हाती घेऊन मातीत शेती करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे अशावेळी सरकारी नोकर्‍या कमी होऊ लागल्या तर भारतीय तरुणांनी नव्याने व्यापाराकडे लक्ष दिले पाहिजे. कुणीतरी नोकरी देईल याची वाट पाहण्यापेक्षा स्वतः उद्योग उभारून नोकर्‍या निर्माण करण्यात खरे शहाणपण आहे,”

टिळकांची हि जिनिंग फॅक्ट्री चांगली चालली नाही. पण या फॅक्टरीमुळे लातूरला प्रचंड मोठा फायदा झाला. टिळकांच्या आगमनामुळे लातुरात देखील स्वातंत्र्यलढ्याचे वारे वाहू लागतील म्हणून हैद्राबाद संस्थानच्या निजामाने लातूर गावात एका मुन्स्फी कोर्टाची स्थापना १८९४ साली केली. त्यानंतर १८९९ साली लातूरवरून बार्शीला जाणारा पक्का रस्ता तयार झाला.

टिळकांचा उद्योग लातुरात चालला नाही पण मराठवाड्याच्या उद्योगधंद्याची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली.

जमशेदजी टाटा यांच्यावर टिळकांनी ‘केसरी’त लिहिलेला मृत्युलेख डोळ्यात अंजन घालणारा होता.

‘बॉम्बे स्वदेशी को-ओप. स्टोअर्स’ ही एक फार महत्त्वाची कंपनी होती. जमशेदजी टाटा आणि लोकमान्य टिळक या दोघांच्या संकल्पनेतून तिची स्थापना झाली. तिच्या सुरुवातीच्या काही करारपत्रात टिळकांची स्वाक्षरी आहे. दरम्यान त्यांनी काड्यापेट्यांच्या कारखान्यांना सक्रीय प्रोत्साहन दिले.

आता विशेष म्हणजे आत्ताच्या पिढीला रस असणाऱ्या शेअर मार्केट मध्ये टिळक सुद्धा सक्रीय होते. शेअर्स बद्दलचा टिळकांचा अभ्यास अतिशय अफाट होता. फक्त शेअर बाजारच नाही तर टिळकांचे भारतातील कामगार वर्गाशी हि खास नाते आहे. त्यांनी सातत्याने कामगारांचे प्रश्न ‘केसरी’तून मांडले.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्लंडमधील मजूर पक्षासोबत टिळकांचे संबंध चांगले होते ते यामुळेच!

कामगारांच्या बाबतीत पुढे भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे प्रणेते श्रीपाद अमृत डांगे यांनी टिळकांकडून प्रेरणा घेतल्याचे डांगेनीच सांगितले. व्यापारी किंवा मालक आणि कामगार यांच्यात संघर्ष निर्माण न करता, परस्परपूरक समन्वय घडवून आणणारी कामगार नीती टिळकांनी भारतीयांना सांगितली.

टिळकांना सहा वर्षांच्या काळ्यापाण्याची शिक्षा झाल्यावर मुंबईच्या गिरणी कामगारांनी केलेला सहा दिवसांचा आक्रमक संप टिळकांची कामगार वर्गातील लोकप्रियता सांगतो.

म्हणजे शेतकऱ्यांपासून, व्यापारी आणि कामगार या तिन्ही वर्गातील लोकांना खऱ्या अर्थानं भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणण्यासाठी टिळकांच योगदान मोलाचं आहे. आपल्या आर्थिक धोरणातून राजकीय हितसंबंध जोपासण्याची जी कला आहे त्याचे शिल्पकार लोकमान्य टिळक होते आणि त्यांचे श्रेय नाकारण्याजोगे नाही.

याद्वारेच त्यांना आपली राजकीय मते खर्‍या अर्थाने समाजाच्या सर्व स्तरात पोहोचविता आली.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.