राजे की पुनिया? इलेक्शनच्या दोन वर्ष आधीच राजस्थानात सामना रंगलाय

तहान लागली की विहीर खोदायची, ही तशी लई जणांची सवय. पण राजकारणात अशी सवय असून चालत नाही. इथं पार आधीपासून नियोजन करत राहिलं, तर टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करता येतोय.

आता राजस्थानचंच बघा ना, तिथल्या विधानसभा इलेक्शनला आजून दोन वर्ष बाकी आहेत. तारखा, आचारसंहिता या सगळ्या गोष्टी ठरायला पण अजून टाईम आहे. पण तिकडं प्रचाराचं बिगुल मात्र चांगलं जोरात वाजलंय.

सध्या राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. त्यांचा कारभार तसा निवांत चाललाय. खळबळ सुरू झालिये ती भारतीय जनता पक्षाच्या गोटात. जवळपास दोन-अडीच वर्ष सक्रिय राजकारणापासून लांब असलेल्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी मोर्चेबांधणी करायला सुरूवात केली आहे.

जोधपूरमध्ये बोलताना त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीबाबत अप्रत्यक्ष भाष्य केलं. त्या म्हणाल्या, ‘स्वतःला वाटतं म्हणून काही होत नाही. जनतेला काय वाटतंय हे जास्त महत्त्वाचं आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे ३६ च्या ३६ जातींवर प्रेम करावं लागेल आणि त्या ३६ जातींचं प्रेम जो मिळवू शकेल तोच पुढे जाऊन राज्य करू शकेल.’

वसुंधराराजे यांनी हे वक्तव्य केल्यावर दोन दिवस तसे शांत गेले. तिसऱ्या दिवशी मात्र कल्ला झाला. राजस्थान भाजपचे अध्यक्ष सतीश पुनिया यांचा वाढदिवस होता. पुनियांच्या घरी ग्रँड सेलिब्रेशन झालं. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ राजस्थान भाजपच्या अधिकृत ट्विटर चॅनेलवर पडला.

या ट्विटचं कॅप्शन वाचूनच स्पष्ट झालं की, भिडू विषय लय डीप रंगलाय.

पुनिया म्हणतात, ‘भाजप परिवार आणि राजस्थानच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पूर्ण ३६ जातींच्या लोकांनी दिलेल्या आशिर्वादासाठी मी ऋणी आहे. मी सगळ्यांना प्रणाम करतो आणि आभार व्यक्त करतो.’

आता माजी मुख्यमंत्री आणि मुरलेल्या राजकारणी असणाऱ्या वसुंधराराजे यांनी ३६ जातींच्या पाठिंब्याचा उल्लेख करत, आपणच मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम आहोत, असं सुचवलं होतं. पुनियांनी मात्र आपल्याला ३६ जातींचा पाठिंबा असल्याचं थेट दाखवूनच दिलं.

थोडक्यात भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार याची शर्यत दोन वर्ष आधीपासूनच सुरू झाली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मते, पुनिया यांनी स्वतःला वसुंधराराजे यांचा पर्याय म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी पक्षात अजूनही पात्र नेते आहेत. केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत, भूपेंदर यादव आणि ज्येष्ठ नेते राजेंद्र सिंग राठोड यांची नावंही शर्यतीत आहेत.

आता भाजपचं नेतृत्व इलेक्शनच्या आधीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करतंय की एकत्रित नेतृत्वात इलेक्शनमध्ये उतरतंय हे पाहावं लागेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.