आईचं लाडकं ‘टपरवेअर’ फेमस होण्यामागे देखील बायकांची किटी पार्टी होती..

तुम्ही शाळेत नापास व्हा, कोणाशी मारामारी करा, ऍक्सीडेन्ट करून घराची गाडी ठोकून या, वडिलांचा मार बसतो, ओरडा खावा लागतो पण जगातल्या शंभर चुका केल्या तरी आपली आई मात्र आपल्याला पदराखाली घेते. सगळ्या चुका माफ करते.

वात्सल्यसिंधू प्रेमळ माऊली फक्त एकाच गोष्टीमुळे रुद्रावतार धारण करते. ती गोष्ट म्हणजे टपरवेअर. एखादे वेळेस तुम्ही हरवला तर चालेल पण टपरवेअरची डब्बे कुठे हरवले नाही पाहिजेत. माता न तू वैरिणी म्हणायला लावणारं टपरवेअर आहे तरी काय ?

टपरवेअर ज्यांनी जाहिरातींवर एकही रुपया खर्च न करता प्रत्येक घरात आपली हक्काची जागा निर्माण केलीये. तर जाणून घेऊ जवळपास सगळ्या महिला मंडळाची पहिली चॉईस बनलेल्या या ब्रॅण्डची स्टोरी.

तर या टपरवेअर ब्रॅण्डचा निर्माता होता अर्ल टपरवेअर. अर्ल हा ‘ड्यू पॉन्ट’ या कंपनीत काम करायचा. जिथं त्यानं वेगवेगळ्या प्रकारचं प्लास्टिक आणि त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला होता.  या अमेरिकन नागरिकाला प्लॅस्टिकची अशी भांडी बनवायची होती, ज्यात अन्न बराच वेळ ताजं राहील.  

१९३८ साली त्यानं अर्ल टपर या कंपनीची स्थापना करून या प्लॅस्टिकच्या भांड्याचा प्रयोगही केला. पण तो फेल गेला. त्यानंतर त्यानं १९४६ मध्ये पॉलिएथीलीन’च्या स्लॅगपासून एका नव्या प्लास्टिकच शोध लावला. जे मजबूत असण्याबरोबर लवचिक सुद्धा होते. याच प्लॅस्टिकपासून त्यानं प्लॅस्टिक बाउल्स बनवले. या बाउल्सला पाहता क्षणी पसंत पडतील असे रंग दिले. तिथूनच या टपरवेअर डब्ब्यांची सुरुवात  झाली.

 १९४६ ला त्यानं Tupperware® या ब्रँडची नोंदणी करून बाजारात विक्री सुरु केली. त्यानं सुरुवातीला ही भांडी डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये ठेवली. नंतर स्वतःच दुकानसुद्धा टाकलं. ही भांडी दिसायला आर्कषक असण्याबरोबर त्याचे डिझाईन सुद्धा वेगळे होते. त्यात क्वालिटी इतकी बेस्ट होती कि, डब्याच्या आतला पदार्थ जसाच्या तसा राहायचा. पण तेव्हाही त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

यामागचं मेन कारण म्हणजे  त्यावेळी प्लॅस्टिकच्या वस्तू म्हंटल कि, लोक दुसरा रस्ता पकडायची. कारण प्लॅस्टिक म्हंटल कि, तो वास आणि मजबुतीवर मोठं प्रश्नचिन्ह. पण अर्ल ला ही समजूत मोडीत काढायची होती.  यासाठी त्याने स्टॅनली होम प्रॉडक्ट या कंपनीच्या ब्राउनी मे हंफ्रे या महिलेची मदत घेतली, जिने अर्ल टपरला काही नवीन आयडिया दिल्या.  

त्यांच्या म्हणण्यानुसार ‘जर आपण लोकांना तयार केले  तर ते व्यवसाय तयार करतील’. हेच डोळ्यांसमोर ठेवत त्या महिलेने टपरवेअर होम पार्टीची सुरुवात केली. बायकांनीच एकत्र गोळा होत, या उत्पादनाची माहिती द्यायची. ती कशी वापरायची आणि त्यातून कसं कमिशन मिळवायचं, हे सगळं या पार्ट्यांत सुरु झालं.

‘द मॉडर्न वे टू शॉप’ असं या होम पार्टीचं स्लोगन होत. ‘या पार्टीची जाहिरात करा, उत्पादनाची मार्केटिंग करा आणि स्वतःची कार घ्या.’ असं स्वप्न कंपनी या बायकांना दाखवू लागली.  ज्या बाईच्या घरी ही पार्टी असायची तिच्यासाठी खास बक्षीस असायची. पार्टीत जितका जास्त खप व्हायच तितकं मोठं बक्षीससुद्धा दिल जायचं . 

टपरवेअरच्या या भन्नाट आयडियामुळं अनेक महिलांना घसबसल्या पैसे कमवण्याची संधी मिळाली. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या मंदीच्या काळात अनेकांना घरखर्चासाठी या व्यवसायाची मदत मिळाली. यानंतर टपरवेअरनं विक्रीच जे स्पीड पकडलं ते कधीच कमी झालं नाही. एकेकाळी दुकानात पडून असलेला माल आता कमी पडायला लागला. ज्यामुळं कंपनीनं आपला माल फक्त  होम पार्टीतचं विकायचा हे ठरवलं. 

या दरम्यान ब्राउनी मे हंफ्रेला ‘ब्राउनी वाईज’ हे नवीन नाव मिळालं. कारण टपरवेअरच्या व्यासायिक  यशात ब्राउनी वाइजचा मोठा वाटा मानला जातो.  टपरवेअरनंतर बऱ्याच कंपन्यांनी ही मार्केटींग स्किम चोरली. पण टपरवेअर एवढं कोणालाच मिळालं नाही. एवढंच काय, ज्या ब्राउनी वाइजमुळे टपरवेअरचा इतका खप झाला, तिने ‘सिंड्रेला’ नावाचा स्वतःचा ब्रँड सुरु केला. पण तिलाही इतका फेम मिळाला नाही. ज्यानंतर ब्राउनी आणि टपरवेअरचा करार संपला. थोड्या दिवसात अर्लने कंपनी विकून टाकली. 

पण यानंतरही कंपनीचा विस्तार होतचं गेला. आज टपरवेअरचे ३० लाखांहून अधिक विक्रेते आहेत. हळूहळू करत ही कंपनी जवळपास १०० देशात जाऊन पोहोचलीये. ज्यामुळे त्याच्या उत्पादनात वाढ होत गेली. प्लॅस्टिकचे डब्बे आणि भांड्यासोबतच आता मायक्रोवेव्ह, फ्रिजरवेअरची यात भर पडलीये.

हा, आता ब्रँड म्हंटल कि, जास्त किमतीची तक्रार असतेच. पण क्वालिटी सुद्धा तितकीच मॅटर करते. याच आपल्या बेस्ट क्वालिटीमुळे आईचं लाडकं टपरवेअर आजही टॉपला आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.