ट्रॅक्टर मोर्चा सोडा महाराष्ट्राच्या राजधानीत एक लाख बैलगाड्या घेऊन शेतकरी हजर झाले होते…

सध्या कोरोनाचा जोर वाढलाय. बघावे तिकडे ऑक्सिजनची कमतरता, रेमेडीसीव्हरची मारामार, व्हेंटिलेटर बेड नसल्यामुळे  वाढता मृत्यूचा आकडा याच बातम्या कानावर पडत आहेत. एकीकडे कुंभमेळा, निवडणुकीचे प्रचार, ठिकठिकाणचे सण समारंभ सुरूच आहेत.

मात्र या सगळ्या धामधुमीत दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी गेली चार महिने आंदोलनाला बसले आहेत याकडे सरकारचं, मीडियाचं, समाजमाध्यमांचं इतकंच काय तर जनतेचं देखील दुर्लक्षच होत आहे. मृत्यूचं सावट असून देखील हे शेतकरी आपल्या जागेवरून हलले नाहीत. त्यांचा लढा चिवटपणे सुरूच आहे.

काही महिन्यांपूर्वी मात्र ही चळवळ ऐन भरात होती. २६ जानेवारीला तर या पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या अन्यायी कृषि कायदयांच्या विरोधात ट्रॅक्टर आंदोलन काढलं होतं. हजारो ट्रॅक्टर दिल्लीमध्ये घुसले होते. त्यात लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्यासारख्या काही अनुचित घटना देखील घडल्या. त्यानंतर याला दडपणे सरकारला सहज शक्य झाले,

या आंदोलनाची जगभरात चर्चा झाली होती. आजवरचं हे सर्वात मोठं ट्रॅक्टर आंदोलन होतं असं म्हटलं गेलं.  

असच एक आंदोलन पन्नास वर्षांपूर्वी झालं होतं. ते ही महाराष्ट्रात. त्याकाळात तब्बल १ लाख बैलगाड्या मुंबई शहरात आल्या होत्या.

या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं शेतकरी कामगार पक्षाच्या भाई उद्धवराव पाटील यांनी.

३० जानेवारी १९२० साली बार्शी तालुक्यातल्या इर्ले गावात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांच्यावर आर्य समाजाचा पगडा होता. LLB च शिक्षण झाल्यानंतर वकील झाले. पण या व्यवसायातील खोटेपणा त्यांच्या तत्वनिष्ठ स्वभावाला न पटल्यामुळे ते समाजकारण व राजकारणात आले.

४२ च्या लढ्यात त्यांनी उडी घेतली. प्रति सरकारच्या नाना पाटलांसह खांद्याला खांदा लावून त्यांनी क्रांतिकार्य गाजवलं. गोळ्या झेलल्या, कारावास सहन केला. स्वातंत्र्यानंतर हैद्राबाद मुक्तिसंग्रामात उतरले. निजामाच्या जुलमी रझाकारांच्या सैन्याला त्यांच्या क्रांतिकारी गटाने चांगलीच झुंज दिली.

पुढे अन्नदात्या शेतकर्यांच्या हितासाठी सरकार दरबारी हक्काने जाब विचारण्याचा हेतु मनात ठेवुन उद्धवराव दादा हे “शेतकरी कामगार पक्ष” या पक्षातर्फे राजकारणात सक्रिय झाले.  

पोराला शेती जमत नाही असा विचार वडिलांच्या मनात आल्याने तो समज खोडुन काढण्यासाठी उद्धवदादा सहा महिन्यांसाठी पक्षकामातुन रजा घेऊन रहात्या गावी इर्ल्याला गेले व वडीलांना यशस्वी शेती करुन दाखवली. यानंतर काहीही झालं तरी हा उपाशी मरणार नाही अशी खात्री उद्धवरावांच्या तिर्थरुपांना झाल्याने १०० ₹ पक्षासाठी हातात देऊन त्यांनी दादांना परत उस्मानाबादेत पाठवले.

भाई उद्धवराव पाटलांनी शेतकऱ्यांना छळणाऱ्या सावकारी विरुद्ध कायम आवाज उठवला. शेतमालाला रास्त भाव मिळायला हवा आणि सरकारने त्यासाठी योग्य ती धोरणं आखावीत यासाठी त्यांनी प्रयत्न केले. व्यवस्थेत आमुलाग्र बदल झाल्याशिवाय शेती आणि शेतकऱ्याची दैनावस्था दूर होणार नाही याची त्यांना जाणीव होती.

शेतकरी आणि शेतमजूर हेच त्यांच्या संपूर्ण लढ्याचे केंद्रबिंदू होते. या सगळ्या लढ्यात त्यांनी लोकशाही समाजवादाचा आधार घेतला किंबहूना या भुमिकेवर ते ठाम राहीले. शोषित, वंचितांच्या प्रश्नांवर सातत्याने आपला आवाज उठवला.

संसदीय राजकारणात प्रवेश

१९५२ मधे त्यांनी पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली. याच काळात शेकापला फुटीचं ग्रहण लागलं. त्यावेळच्या हैद्राबाद असेंब्लीत त्यांनी कडवी झुंज देत दणक्यात एंट्री केली.

महाराष्ट्रभरात उद्धवराव एसटीनेच प्रवास करायचे. मतदारसंघाच्या दौऱ्यासाठी एसटी, बैलगाडी यांचा वापर करत. त्यांच्या पत्नी या म्हशीचं दुध आणि किरकोळ गोष्टी विकुन घर चालवायच्या याची जाणिव जनसामान्यांना असल्याने उद्धवरावांच्या प्रचारासाठी लोक घरुन भाजी भाकर बांधुन आणत.

यामुळेच त्यांनी आजवरच्या सर्व निवडणुका फक्त आणि फक्त लोकांच्या भरवशावर जिंकल्या होत्या कारण पदरचा पैसा खर्च करायला मुळात पैसाच नव्हता. अक्षरशः शाळकरी मुले त्यांचा प्रचार करत होती.

१९५७ च्या निवडणूकीत तर काँग्रेसच्या  फुलचंद गांधींसारखा आर्थिक शक्तींनी बलाढ्य असलेला उमेदवार समोर असतानाही ते प्रचंड मतांनी निवडून आले, यावरूनच जनमानसातला उद्धवरावांचा प्रभाव आणि वावर स्पष्ट होतो.

तो काळ संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा होता. चळवळ आणि भरात होती. मराठी माणसांचा प्रश्न उद्धवरावांनी रस्त्यावरच्या आंदोलनातून विधानसभेच्या सभागृहवर नेला. १९५८-५९ मधे द्वैभाषिक मुंबई राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांचा दबदबा तेव्हा इतका असायचा कि उद्धव दादा बोलायला उठलेत ही माहिती मिळताच मुख्यमंत्री आपल्या केबिन मधून धावत पळत सभागृहात यायचे.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर अल्पकाळातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात जबाबदारी घेण्यासाठी जावे लागले. चीनच्या युद्धाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तेव्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद कोणाकडे द्यावं हा प्रश्न यशवंतरावांपुढे पडला होता.

त्यांच्या डोळ्यासमोर एकमेव व्यक्ती उभी राहिली ती म्हणजे विरोधी पक्षनेते भाई उद्धवराव पाटील. काँग्रेसच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या पण समान विचारधारा असलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी आणि महाराष्ट्राची घडी बसवण्यासाठी उद्धवराव पाटलांना मुख्यमंत्रीपद देऊ केलं.

पण आपल्या तत्वांशी बांधील असणाऱ्या उद्धवराव पाटलांनी याला चक्क नकार कळवला.  

१९६४-६६ मधे त्यांनी खासदारकीही भुषवली. अभ्यास आणि वक्तृत्व या बळावर उत्कृष्ट संसदपटू म्हणुन नावलौकीक मिळवला. संसदीय राजकारणाची वेगळी वाट त्यांनी स्वीकारलेली होती. अनेकवेळा पराभव झाला मात्र त्यांच्यातला कार्यकर्ता कायम जिवंत राहिला.

त्यांचे सर्वात गाजलेलं आंदोलन म्हणजे मुंबईमधील एक लाख बैलगाड्यांचा मोर्चा.

महाराष्ट्राच्या शेतक-याला शेतीमालाच्या उत्पादनाच्या खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे, या मागणीची पहिली शास्त्रशुद्ध मीमांसा विधानसभेच्या व्यासपीठावर फक्त उद्धवरावांनी केली आणि लोकसभेतही त्यांनी तो आवाज उठवला.

१३ मार्च १९६६ रोजी शेतक-यांच्या याच प्रश्नासाठी मुंबईत शेतकरी कामगार पक्षाचा एक लाख बैलगाड्यांचा मोर्चा मुंबईत धडकला होता.

मुंबईत एक लाख बैलगाड्यांचा मोर्चा ही कल्पना आज कोणी करू तरी शकतो का? ही ताकद उद्धवरावांची होती. यातील चाळीस हजार बैलगाड्या उद्धवरावांच्या एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यातून आल्या होत्या. अत्यंत शिस्तबद्धरित्या या एक लाख बैलगाड्या मुंबई मध्ये दाखल झाल्या आणि कोणतीही अनुचित घटना न घडता त्यांनी आपला मोर्चा मुंबईच्या रस्त्यांवरून विधिमंडळावर नेला.

मुख्यमंत्री वसंतराव नाईक या मोर्चाला सामोरे गेले होते. आजवरच्या इतिहासात इतका विराट मोर्चा कोणी पहिला नसेल. कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद तेव्हा मुंबईकराना अनुभवायला मिळाली.

इतकी मोठी राजकीय ताकद असूनही उद्धवराव पाटलांसारखा नेता आयुष्यभर व्रतस्थ संन्याशाप्रमाणे राजकीय पदे, खुर्ची यापासून अलिप्त राहिला. गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामकरी, वंचित, शोषितांसाठी झटत राहिला. 

ज्यांच्या विरुद्ध लढताना त्यांनी कधीही आपली तलवार म्यान केली नाही अशा काँग्रेसच्या यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते १९८० साली औरंगाबादमध्ये उद्धवराव पाटील यांचा सत्कार झाला. पुढे याच काँग्रेसच्या विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्री झाल्यावर औरंगाबादमध्ये उद्धवरावांचा पुतळाच उभा केला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.