मराठा साम्राज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती श्रीमंत उमाबाईसाहेब दाभाडे.

हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी शिवरायांच्या अनेक मावळ्यांनी आपलं रक्त सांडल होत यापैकीच एक होत तळेगावचं दाभाडे घराणं. पुण्याजवळच्या तळेगावचे हे पाटील. येसाजीराव दाभाडे हे शिवबांचे खास अंगरक्षक होते. छत्रपतींच्या विश्वासातले म्हणूनच तळेगावच्या दाभाड्यांना ओळखलं जायचं.

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची जबाबदारी राजाराम महाराजांच्यावर पडली होती. औरंगजेबाची मुघल सेना महाराष्ट्रात मराठ्यांचा निःपात करायच्या असा प्रण करून आली होती. पण राजाराम महाराज त्यांच्या तावडीतून सुटले आणि त्यांनी दक्षिणेत जिंजी गाठली.

तिथेही मुघल सरदार झुल्पिकार खान येऊन पोहचला. जिंजीला अनेक दिवस त्याने वेढा घातला होता. पण त्याच्या मगरमिठीतून मराठा सैनिकांनी छत्रपती राजाराम महाराजांची सुटका केली .या सर्व मोहिमेत राजाराम महाराजांच्याबरोबर येसाजी दाभाड्यांची दोन मुलं सावली सारखी सोबत होती. त्यांच नाव खंडेराव आणि शिवाजी.

शिवाजी दाभाडे यांचा मोहिमेतील दगदगीमुळे प्रवासात मृत्यू झाला. पन्हाळ्यावर पोहचल्यावर खंडेराव दाभाडेंच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना सेनाखासखेल ही पदवी आणि तेरा गावांची सरपाटीलकी दिली.

पुढे जेव्हा संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज छत्रपती झाले तेव्हा खंडोजी दाभाडे त्यांना जाऊन मिळाले. गुजरात प्रांतावर धडक मारून बडोद्यापर्यन्तचा भाग त्यांनी मराठी सत्तेच्या टापाखाली आणला. शाहू महाराजांनी त्यांना मराठा साम्राज्याचे सरसेनापती बनवले.

49899445 242535313307392 2326386091193532416 n
छत्रपती शाहू महाराज आणि सरसेनापती खंडेराव दाभाडे

श्रीमंत खंडेराव दाभाडे यांचा विवाह नाशिकच्या अभोणा गावचे देशमुख ठोके यांची मुलगी उमाबाई हिच्याशी झाला होता.

उमाबाई या एकदा लहान असताना पन्हाळागडावर राजाराम महाराजांची पत्नी ताराबाई राणीसाहेब यांचे दागिने पाहत होत्या. त्यामध्ये असलेले सोन्याचे तोडे त्यांना आवडले. ते त्यांनी घातले. त्यावेळी उमाबाईच्या सासर्यांनी येसाजीनी त्यांना ते काढायला लावले आणि समजावलं,

” सोन्याचे तोडे घालण्याचा मान राजघराण्याला असतो.”

उमाबाई जिद्दी स्वभावाच्या होत्या. आपल्या कर्तुत्वावर हा मान आपण मिळवायचाच हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले.

पुढे त्यांचे पती श्रीमंत खंडेराव दाभाडे सरसेनापती  यांचा सन १७२९ मध्ये मृत्यू झाला. खंडेरावांच्या नंतर उमाबाईचे जेष्ठ सुपुत्र त्रिंबकराव यांना शाहूमहाराजांनी वंशपरंपरागत सरसेनापतीपदाची वस्त्रे दिली. पण त्रिंबकराव आणि त्यावेळचे पेशवे बाजीराव यांच्यात गुजरातच्या चौथाईवरून वाद झाले. सरसेनापती निजामाला जाऊन मिळतील या भीतीने राव बाजीने दाभाड्याच्या सैन्यावर हल्ला केला. 

१ एप्रिल १७३१ रोजी झालेल्या डभईच्या लढाईत बाजीराव पेशव्याने त्रिंबकरावचा पराभव केला. या युद्धात त्रिंबकराव कामी आले.असे म्हणतात त्यांचा मृत्यू त्यांचे मामा भावसिंगराव ठोके यांच्या आदेशावरून झाला. आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच रणरागिणी उमाबाईसाहेब चवताळून उठल्या. त्यांनी बाजीरावास धडा शिकवण्याचा मनसुबा रचला पण बाजीरावाने छत्रपतींचा आश्रय घेतला.

शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे सर्वात पराक्रमी दोन सरदार घराणे आज एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत हे छत्रपती शाहुरायाना आवडले नाही. ते स्वतः बाजीरावला घेऊन तळेगावला आले. त्यांनी उमाबाईसाहेबांची समजूत काढली.

“आपला मुलगा समजून बाजीरावास माफ करावे आणि एक चित्ताने कारभार करावा”

असा आदेश महाराजांनी दिला.

सरसेनापती पद उमाबाईचां मधला मुलगा यशवंतराव दाभाडे यांना आणि सरखालखेल पद धाकटा मुलगा बाबुराव दाभाडे याला देण्यात आले. ही मुले अल्पवयीन असल्यामुळे सेनापतीपदाची जबाबदारी उमाबाईसाहेब यांच्यावर आली.

१७३२ साली अहमदाबादवर जोरावर खान नावाचा मुघल सरदार चालून आला. त्याच्या पारिपत्याची जबाबदारी श्रीमंत उमाबाई साहेब यांच्यावर देण्यात आली. सरसेनापती उमाबाई या आपल्यावर चालून आलेल पाहून जोरावर खानानं त्यांना पत्र लिहिलं,

“तू एक विधवा आहेस, तुला लहान मुले आहेत. आम्ही तुला हरविले तर तुझ्या मुलांचा सांभाळ कोण करणार ?
आमच्या वाटेला येऊ नकोस. ज्या रस्त्याने आली आहेस त्याच रस्त्याने परत जा.”

 हे पत्र वाचून उमाबाईंनी ठरविले की  जोरावरखानाला उत्तर लढाईतच द्यायचे. अहमदाबादच्या किल्याबाहेरच युद्ध सुरू झाले.पांढरा शुभ्र पेहराव परिधान केलेल्या उमाबाई प्रचंड सैन्याच्या गदारोळात रणांगणाच्या मध्यभागी हत्तीवर बसून लढत होत्या. जोरावरखानाच्या प्रचंड सैन्याचा मावळ्यांच्या सहकार्यांने त्यांनी धुव्वा उडविला.

उमाबाईच्या मराठा सैन्याचा आवेश बघून जोरावरखान किल्याच्या आत जाऊन लपून बसला. किल्याचे दरवाजे आतून बंद केले. उमाबाईंना दरवाजाच्या आत शिरायचे कसे हा प्रश्न पडला. तेंव्हा शत्रूच्या सैन्यातील मृतदेहाचे ढीग दरवाजाला लावून , एकावरएक रचून पेटवून दिले.

दरवाजा पडला व मराठा सैन्य आत शिरले. जोरावरखानला जेरबंद करून साताऱ्यास आणले व त्या तळेगावी परतल्या.अहमदाबादेतील शौर्यावर खूश होऊन छत्रपती शाहू महाराज हे श्रीमंत उमाबाईंचा गौरव करण्यास तळेगावी आले. तळेगावात मोठा दरबार भरवण्यात आला.

छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना पांढरा शालू, पांढरी शाल, दाणेदार सोन्याच्या पाटल्या आणि खास तयार केलेले सोन्याचे तोडे सन्मानाने दिले. लहानपणी सोन्याचे तोडे घालण्याचे उमाबाईंचे स्वप्न पूर्ण झाले. त्या वेळेपासून वंशपरंपरेने तळेगावच्या सेनापती घराण्याला पायात सोन्याचे तोडे घालण्याचा मान मिळाला.

बाजीरावच्या नंतर आलेल्या नानासाहेब पेशव्यांशी मात्र दाभाड्यांशी कधीच पटले नाही. श्रीमंत यशवंतराव आणि बाबुराव दाभाड्यानी सुरत मोहिमेत पराक्रम दाखवून  दिलाच होता मात्र गुजरातच्या चौथाईचा वाद कायम राहिला. या दोन्ही घराण्याचे वाद शाहू महाराजांच्या धाकामुळे वाढले नाहीत मात्र त्यांच्यानंतर असे घडणे अशक्य होते.

मराठेशाहीत शाहू महाराजांच्या नंतर राजकारण सुरु झाले. राजाराम छत्रपतींच्या विधवा श्रीमंत ताराराणीसाहेब यांनी नानासाहेब पेशव्याच्या अनिर्बंध सत्तेवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला.  तळेगावच्या उमाबाई दाभाडे आणि ताराबाई महाराणीसाहेब या एकत्र आल्या. मात्र पेशव्याच्या सैन्याने त्यांचा मोठा पराभव केला.

१७५१ मध्ये पेशव्यांनी दाभाड्यांना पुण्यात नजरकैदेत ठेवले होते. १४ फेब्रुवारी १७५२ ला उमाबाईंना पुण्यात आणण्यात आले. शनिवारवाड्यानजिक ओंकारेश्वराजवळ नडगेमोडी येथे त्या राहिल्या. २८ नोव्हेंबर १७५३ रोजी श्रीमंत उमाबाईंचे वृद्धापकाळाने निधन झाले.

सरसेनापती श्रीमंत खंडेराव दाभाडे आणि उमाबाईसाहेब दाभाडे यांचे थेट तेरावे वंशज सत्यशीलराजे दाभाडे हे आजही दाभाडे कुटुंबियांचा पराक्रमाचा इतिहास अभिमानाने सांभाळत आहेत. स्वराज्याच्या पहिल्या आणि एकमेव महिला सरसेनापती यांचे चरित्र पुष्पा पंढरीनाथ दाभाडे नलवडे यांनी लिहिले आहे.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Bipin Musale says

    उमाबाइसाहेब दाभाडे थोरल्या बाजीरावालाही भारी पडल्या?

Leave A Reply

Your email address will not be published.