पत्त्यांच्या डावात मुलायमसिंह यांनी सायकल जिंकली अन निवडणुकीचं चिन्ह सायकलच ठरली
निवडणुका आल्या म्हणलं कि, मोठ मोठे राजकीय नेत्यांचे एकमेकांवरचे आरोप -प्रत्यारोप फार आश्चर्याची गोष्ट नाहीये. पण या आरोपांमुळे चर्चेला नवीन नवीन मुद्दे मिळत जातात आणि या निमित्ताने या विषयांचा इतिहास देखील काढलाच जातो. आता आम्ही एवढं घुमवून – फिरून सांगण्यापेक्षा थेट विषयाला हात घातलेला बरा…
आता विषय आहे समाजवादी पार्टीच्या चिन्हाचा म्हणजेच सायकलचा. आणि निमित्त आहे मोदींचं भाषण ज्यामुळे आपण आज समाजवादीच्या सायकल बाबत बोलणार आहोत.
उत्तर प्रदेशातील हरदोई येथील सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणाचा संदर्भ देत अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षावर हल्लाबोल केला. मोदी म्हणाले कि, “मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो, त्या काळात अहमदाबादमध्येही बॉम्बस्फोट झाले होते. मला आश्चर्य वाटते की हे दहशतवादी बॉम्बस्फोटासाठी सायकल का वापरत होते. तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. त्याच दिवशी माझे सरकार अंडरवर्ल्डमधून या दहशतवाद्यांना शोधून त्यांना शिक्षा करेल, असा संकल्प मी केला होता. कधी मुंबईत बॉम्बस्फोट झाले, तर कधी दिल्ली, जयपूर, बंगळुरू, हैदराबाद, गुवाहाटी, लुधियाना, आगरतळा, इम्फाळ, किती शहरे बॉम्बस्फोटांनी हादरली, त्या हल्ल्यांमध्ये किती निष्पाप नागरिकांचा बळी गेला.”
२००६ मध्ये काशीमध्ये झालेला बॉम्बस्फोट, संकट मोचन मंदिरातला बॉम्बस्फोट, कँट रेल्वे स्थानकावरचा हल्ला. २००७ मध्ये लखनौ, अयोध्या येथील न्यायालय परिसरात बॉम्बस्फोट झाले होते. जेंव्हा २०१३ मध्ये समाजवादी पक्षाचे सरकार पुन्हा सत्तेवर आलं तेंव्हा याच सरकारने वरील बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या शमीम अहमद तारिक काझमी नावाच्या दहशतवाद्यावरील खटला खटला मागे घेण्याची चूक केली होती. तसेच यूपीमध्ये एक-दोन नव्हे तर १४ दहशतवादी हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये समाजवादी सरकारने अनेक दहशतवाद्यांचे खटले मागे घेण्याचे आदेश दिले होते. हे लोक स्फोट घडवत होते आणि समाजवादी पक्षाचे सरकार या दहशतवाद्यांवर कारवाईही होऊ देत नव्हते.
हे सगळे संदर्भ देत मोदींनी समाजवादी पक्षाला सायकल निवडणारे दहशतवादी म्हणलं आहे.
सायकल निवडणारे दहशतवादी असं मोदी म्हणाले आणि यावर आता अखिलेश यादव यांनी उत्तर दिलं कि, “आमचे चिन्ह हे सामान्य माणसाची सवारी असणारी सायकल आहे. त्यामुळे सायकलचा अपमान हा संपूर्ण देशाचा अपमान आहे “.
त्यामुळे ऐन निवडणुकीत ज्या सायकल चिन्हाची चर्चा चालू आहे, ते चिन्ह नेमकं निवडणुकीचं चिन्ह का ठरलं असावं ? समाजवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह बनलेल्या सायकलचा इतिहास देखील जाणून घेणं महत्वाचं आहे. अलीकडेच युपीच्या राजकारणात पक्षाच्या दोन गटांमध्ये सायकल चिन्हावर दावा केला जात होता.
कुणी काही का दावा ठोकेना पण हे सायकल चिन्ह का निवडणुकीचं चिन्ह बनलं त्याचा आणि मुलायम सिंह यादव खरा तर घनिष्ट संबंध आहे. १९६० च्या सालात समाजवादी पक्षाचा चेहरा असलेले मुलायम सिंह यादव उत्तर प्रदेशातील इटावा येथे महाविद्यालयात शिकत असायचे. कॉलेजसाठी त्यांना दररोज सुमारे २० किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागत असायचा.
मुलायम यांच्या घरची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती की ते सायकल विकत घेऊ शकतील. पैशाच्या कमतरतेमुळे तो मनाने दु:खी राहायचा आणि कॉलेजला जाण्यासाठी धडपडत असे. असं म्हणतात की मनापासून जे हवं असतं ते मिळवण्यात अख्खं जगच गुंतून जातं, असाच काहीसा प्रकार मुलायमसिंह यांच्या सोबत घडला होता. एकदा ते त्यांच्या बालपणीच्या मित्रासोबत त्यांच्या गावात गेले होते.
फ्रँक हुजूर यांच्या आत्मचरित्रावर आधारित ‘द सोशलिस्ट’ या पुस्तकानुसार,
मुलायम त्यांचे बालपणीचे मित्र रामरूप यांच्यासोबत एके दिवशी काही कामानिमित्त उजयनी गावात गेलेले. दुपारची वेळ होती, गावच्या चौपालात म्हणजेच चौकात काही लोकं पत्ते खेळत होते. मुलायम आणि रामरूपही त्या पत्त्याच्या खेळात सहभागी झाले. त्याचवेळी गिंजा गावातील बटाटा व्यापारी लाला रामप्रकाश गुप्ता हेही पत्ते खेळत होते. गुप्ताजींनी गेममध्ये एक अट घातली की जो जिंकेल त्याला रॉबिनहूड सायकल दिली जाईल.
आणि मग काय मुलायमसिंह यांना आता वाटू लागलं कि, आपण जर का हा डाव जिंकला तर आपल्याला हि सायकल मिळेल आणि आपला रोजचा कॉलेजला जाण्याचा प्रवास सोपा होईल.
मुलायम सिंह यांच्यासाठी गुप्ता यांनी टाकलेली अट त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे साधन बनली. मुलायमसिंह यादव यांनी पैज जिंकली आणि रॉबिनहूड सायकलही जिंकली. आणि मुलायमसिंह अशा प्रकारे जसे सायकलवर स्वार झाले कि, त्यानंतर त्यांचा प्रवास थांबलाच नाही.
त्यानंतर ४ नोव्हेंबर १९९२ रोजी जेंव्हा समाजवादी पक्षाची स्थापना झाली तेंव्हा सायकल हे त्यांचे निवडणूक चिन्ह ठरवण्यात आले. तर असा होता या सायकलचा प्रवास. थोडक्यात मुलायमसिंह यादव यांना त्यांच्या संघर्षमय आयुष्याची जाणीव कायमच राहावी म्हणून कदाचित सायकल चिन्ह त्यांच्यासाठी महत्वाचं असेल.
हे हि वाच भिडू :
- मुलायमसिंह यादव आणि डॉ. अब्दुल कलामांच्या दोस्तीमुळं काँग्रेसचं सरकार वाचलं होतं…
- इकडे बाप-लेक सायकलसाठी भांडत होते तिकडे दुसरा मुलगा लॅम्बोर्गिनी घेऊन फिरत होता
- ९० च्या जमान्यातल्या पोरांची हवा व्हायची ती फक्त ऍटलास सायकलवरचं