अखिलेश यादव पहिलीच विधानसभा निवडणूक लढवणार, असं असणारे मतांचं समीकरण

उत्तर प्रदेशाच्या निवडणूक जस-जश्या जवळ येत आहेत तसं-तसं युपीमधील राजकीय वातावरण तापत आहे. त्यावरून येथील राजकीय समीकरणही बदललेले दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजप, आणि भाजपनंतर अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष हा युपी मधील सर्वात मोठा विरोधी पक्ष मानला जातो आणि बसपा दोन नंबरवर येते. यानंतर पाचव्या स्थानावर असलेल्या काँग्रेसची स्थिती इतकी खराब आहे की, लोकसभेच्या रायबरेलीतून सोनिया गांधींची जागा धरून विधानसभेत इतर फक्त ७ आमदार आहेत… 

असो युपीचं सद्याचं राजकीय वारं काय म्हणतंय ते बघू…..

याचबाबत, दोन महत्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत, पहिली बातमी म्हणजे समाजवादी परिवारात फूट पडली. आधीच २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांची नाराजी चर्चेत होती. त्याच वेळी, आता भाजपने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव यांना पक्षात घेऊन मोठाच राजकीय डाव साधला आहे. 

आणि दुसरी सर्वात महत्वाची बातमी म्हणजे, अखिलेश यादव हे आपल्या आयुष्यातील पहिलीच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील निवडणूक लढवू अशी घोषणा केली आहे.

अखिलेश यादव हे सध्या आझमगडचे खासदार आहेत. अखिलेश यांनी विधानसभा निवडणूक लढविल्यास त्यांना लोकसभेचे सदस्यत्व सोडावे लागेल. पक्ष सांगेल तेथून निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास तयार असल्याचेही त्यांनी यापूर्वी सांगितले होते. याबाबत खुद्द अखिलेश यादव हे एका टीव्ही चॅनलशी संवाद साधताना म्हणाले होते कि, “आमच्या समाजवादी पक्षाची इच्छा असेल तर यावेळीही आम्ही निवडणूक लढवू. कुठून निवडणूक लढवणार? हे मात्र पक्ष ठरवेल असं त्यांनी स्पष्ट केलं होतं”.

यादव घराण्यात अखिलेश यादव यांच्या आधी मुलायमसिंह यादव, शिवपाल यादव आणि मुलायम यांच्या धाकट्या मुलाच्या पत्नी अपर्णा यादव ज्या नेमकंच भाजपमध्ये गेल्यात त्यांनी देखील विधानसभा निवडणूक लढवली आहे मात्र अखिलेश यादव पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.

२००० मध्ये ते पहिल्यांदा कन्नौज लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकून खासदार झाले होते. त्यानंतर पुन्हा २००४ मध्ये याच मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर २००९ मध्ये तर त्यांनी कन्नौज आणि फिरोजाबाद या दोन लोकसभा जागांवरून निवडणूक लढवली होती, आणि विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी ते जिंकून आले होते. पण तेंव्हा त्यांनी फिरोजाबादची जागा सोडली होती आणि कन्नौजवर कायम होते.  २०१२ मध्ये अखिलेश यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाने ४०३ पैकी २२४ जागा जिंकल्या होत्या आणि समाजवादी पक्षाचे सरकार स्थापन झाले होते तेंव्हा अखिलेश यादव विधान परिषदेचे सदस्य झाले होते. मुख्यमंत्री झाले तेंव्हा ते खासदार होते आणि नंतर विधान परिषदेचे सदस्य झाले. त्यानंतर २०१७ मध्ये योगी आदित्यनाथ मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा ते खासदार होते. अखिलेश यादव हे सध्या आझमगड मतदारसंघाचे खासदार आहेत. 

पण त्यांनी विधानसभा निवडणूक कुठून लढणार हे मात्र सांगितलं नाही पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव आझमगडमधील गोपालपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत असं समजतंय.  गोपालपूरमधून विधानसभा निवडणूक जिंकल्यास त्यांना लोकसभेची जागा सोडावी लागेल हे तर निश्चितच आहे 

पण त्यांनी पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी गोपालपूरच का निवडलं ?

अखिलेश आझमगड जिल्ह्याचे खासदार आहेत आणि त्यांनी विधानसभेसाठी निवडलेले गोपालपूर हे आझमगड जिल्ह्यात आहेत. आणि एकंदरीत या जिल्ह्यावर सपाचं चान्गले वजन आहे.  गोपालपूरच्या गेल्या पाच विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर नजर टाकली, तर स्पष्ट आहे कि, येथून चार वेळा सपा आणि एकदा बसपा विजयी झाले आहेत. या जागेवर सपाच्या ताकदीचे कारण येथील प्रबळ मुस्लिम-यादव फॅक्टर कामी येते. आणि म्हणूनच अखिलेश यादव यांनी गोपाळपूरची निवड केली असं म्हणलं जातंय.

पण आणखी एक कारण नाकारून चालत नाही ते म्हणजे, आझमगड जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण १० जागा आहेत. अखिलेश यादव यांनी जिल्ह्यातील कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवली तरी त्याचा प्रभाव हा थेट इतर ९ जागांवरही होईल…आणि त्याचा थेट फायदा त्यांच्या पक्षाला होईल.  

येथील १० जागांच्या मतांचं समीकरण कसं असणार आहे ?

१९९६ आणि २००२ च्या विधानसभा निवडणुकीत सपाने इथे वर्चस्व मिळवलं होतं. २००७ च्या विधानसभा निवडणुकीत बसपच्या श्याम नारायण यांनी गोपाळपूरमधून सपाचे वसीम अहमद यांचा केवळ १ हजार ४६४ मतांनी पराभव केला होता. याच मतदारसंघातून वसीम अहमद यांनी २०१२ मध्ये बसपच्या कमला प्रसाद यादव यांना ७७ हजार मते घेऊन ४७ हजारांच्या मतांच्या फरकाने हरवलं होतं. तर याच निवडणुकीत भाजपचे योगेंद्र यादव याना फक्त ११ हजार मते मिळाली होती. 

तर मागच्या २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत याच जागेवरून समाजवादी पक्षाचा उमेदवार विजयी झाला होता.  आझमगढच्या गोपालपूर मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या नफीस अहमद यांना ७० हजारच्या वर मते मिळाली होती, तर भारतीय जनता पक्षाचे श्रीकृष्ण पाल यांना ५६ हजारच्या जवळपास मते मिळाली होती, सपा च्या अहमद यांनी भाजपच्या पाल यांना १४,९६० मतांनी पराजीत केलं होतं..आता हे मतांचं समीकरण पाहता सपा चा विजय इथं होणं हे जवळपास निश्चितच आहे म्हणून तर हा मतदार संघ अखिलेश यांनी निवडला आहे. 

आणखी एक म्हणजे पूर्वांचलच्या गोरखपूरमधून योगी आदित्यनाथ निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, पूर्वांचलमध्ये भाजपला कोणताही धोका पत्करायचा नसल्यामुळे योगींना अयोध्या सोडून गोरखपूरमधून रिंगणात उतरवण्यात आल्याचं बोललं जातंय.. एकंदरीत यावेळी भाजप पूर्वांचलवर फोकस करतंय. भाजपच्या या रणनीतीमुळे अखिलेश यादव यांनी पूर्वांचलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे….थोडक्यात योगी आणि अखिलेश यांची हि लढत तितकीच इंटरेस्टिंग असणारे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.