कोणालाच वाटलं नव्हतं बुलेटवरून प्रचार करणारा उमेदवार एका वर्षात पंतप्रधान होणार आहे.

साल १९८८, अलाहाबादमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होणार होती. .

पंडित जवाहरलाल नेहरू ते लालबहादूर शास्त्री अशा अनेक दिग्गज नेत्यांचं गाव म्हणून अलाहाबादची ओळख होती. स्वातंत्र्यलढ्याचे प्रमुख केंद्र होत तेव्हा पासून काँग्रेसचा इथे दबदबा होता. त्यांच्यासाठी ही घरची सीट होती आणि म्हणूनच हा मतदारसंघ त्यांच्यासाठी महत्वाचा राहिलेला होता.

१९८४ साली अलाहाबादमध्ये माजी मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा हे लोकदलाकडून उभे होते. नुकताच इंदिरा गांधींची हत्या झाली होती आणि राजीव गांधींच्या हातात सूत्रे आली होती. तेव्हा त्यांनी बहुगुणा यांना हरवण्यासाठी आपल्या लहानपणीच्या मित्राला राजकारणात आणलं.

अमिताभ बच्चन.

अमिताभ तेव्हा भारतीय फिल्मइंडस्त्रीचा सुपरस्टार होता. त्याची लोकप्रियता शिखरावर होती. त्याची आई तेजी बच्चन या खूप आधी पासून काँग्रेसचं काम करत होत्या. तेव्हापासूनच त्यांचे गांधी घराण्याशी चांगले संबंध होते. अलाहाबाद हे बच्चनचं मूळ गाव.

छोरा गंगा किनारेवाला अशी इमेज असलेल्या अमिताभ बच्चनने हेमवतीनंदन बहुगुणा यांना सहज हरवलं. तो खासदार झाला आणि काँग्रेसचा हा गड मजबूत झाला.

राजीव गांधी या निवडणुकीत खरे हिरो म्हणून समोर आले. त्यांनी विक्रमी ४०० हुन अधिक खासदार निवडून आणले आणि देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. लोकसभेत इतकं संख्याबळ नेहरू इंदिरा गांधी यांच्याकडे देखील नव्हतं.

पण पुढच्या तीन वर्षात मात्र हीच परिस्थिती राहिली नव्हती. गंगेच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल.

राजकारणात अननुभवी असणाऱ्या राजीव गांधींनी आपल्या सल्लागारांचे ऐकून घेतलेले निर्णय फसत गेले. रामाच्या पूजेसाठी बाबरी मशिदीचे कुलूप उघडणे, शहाबानो प्रकरण या सगळ्यात त्यांचे राजकीय आडाखे चुकत गेले.

अशातच बोफोर्स प्रकरण उद्भवलं. विदेशी तोफांच्या खरेदीमध्ये दलाली घेतली गेली असे आरोप विरोधकांनी काँग्रेसवर केले. सोनिया गांधींच्या माहेरचा समजला जाणारा क्वात्रोची याच्या विरुद्ध सबळ पुरावे आहेत असं म्हटलं गेलं.

२१ व्या शतकातल्या कॉम्प्युटरची स्वप्ने दाखवणाऱ्या राजीव गांधींच्या क्लीन इमेजची लक्तरे भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे जगाच्या वेशीवर टांगली गेली. या आरोपांमुळे त्यांचे अनेक जवळचे साथीदार त्यांना सोडून गेले. अमिताभचं देखील बोफोर्समध्ये नाव गोवण्यात आलं. कंटाळून त्याने राजकारणातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि खासदारकीचा राजीनामा दिला.

त्याच्या या तडकपडकी राजीनाम्यामुळे १९८८ साली अलाहाबादमध्ये पोटनिवडणुक लागली.

या निवडणुकीसाठी उभे होते राजीव गांधी यांचे सर्वात मोठे विरोधक समजले जाणारे व्ही.पी. सिंग अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले.

व्ही.पी. देखील एकेकाळी काँग्रेस मध्येच होते. तेव्हाच्या मंत्रिमंडळात अर्थ, संरक्षण अशी मोठमोठी खाती सांभाळणाऱ्या व्हीपी यांचे राजीव गांधींशी मतभेद झाल्यामुळे त्यांना मंत्रिपदावर काढून टाकण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला.असं म्हटलं जायचं कि त्यांच्या जवळ बोफोर्स बद्दल काही तरी स्फोटक माहिती आहे.

व्ही.पी.नी पंतप्रधानांना थेट त्यांच्या बालेकिल्ल्यात  आव्हान देत अलाहाबादच्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज भरला.

राजीव गांधींना काहीही करून निवडणूक जिंकायचीच होती. त्यांनी आपला हुकुमाचा पत्ता म्हणून लालबहादूर सह्स्त्री यांचे धाकटे चिरंजीव सुनील शास्त्री यांना उमेदवारी दिली. शास्त्रीजी इथे दोन वेळा खासदार राहिले होते. त्यांच्या मुलांबद्दल अलाहाबादमध्ये सहानुभूती होती. शिवाय या लढतीत बहुजन समाज पार्टीचे कांशीराम देखील उतरले होते.

या तिरंगी लढाईत काँग्रेसचं पारडं जड दिसत होतं. राजीव गांधींनी सामदाम दंड भेद वापरून ही निवडणूक जिंकायचंच ठरवलं होतं. मोठमोठे दिग्गज नेते प्रचाराला उतरवले. पैशांचा पाऊस पाडला.

दुसरी कडे अपक्ष उभे राहिलेल्या व्ही.पी.सिंग यांचा प्रचार एकाकी सुरु होता. ते मूळचे अलाहाबाद जिल्ह्यातले. ते लहानपणी मंड्या इथल्या राजाला दत्तक गेले असल्यामुळे त्यांना राजा ही उपाधी मिळाली होती. काँग्रेसने आपल्या प्रचारात ते राजघराण्यातील आहेत यावर जोर दिला. पण तिथल्या जनतेच्या मते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, देशाचे अर्थमंत्री वगैरे मोठमोठ्या पदावर राहून व्ही.पी.सिंह यांनी मोठी कमाई कधी केली नव्हती.

व्ही.पी.सिंग आपला प्रचार एका साध्या बुलेटवरून करत होते. रामचरण शुक्ल नावाचा त्यांचा एक कार्यकर्ता होता. त्याच्या बुलेटवर मागे बसून व्ही.पी.सिंग यांची प्रचार फेरी निघायची. मतदासंघातल्या प्रत्येक खेड्यात प्रत्येक घरात व्ही.पी.जाऊन पोहचले.या बुलेटने त्यांना भरपूर साथ दिला. दुचाकीवरून फिरल्यामुळे त्यांचा साधेपणा, स्वच्छ प्रतिमा यानंतर आणखी उजळून निघाली.

याच प्रचार फेऱ्यांमध्ये काँग्रेसला उत्तर देण्यासाठी एक घोषणा निघाली जी पुढे भारतभरात फेमस झाली. ती घोषणा होती,

“राजा नहीं फकीर हैं, देश की तकदीर हैं”

त्यांनी आपल्या प्रत्येक भाषणात विरोधी उमेदवारांवर नाही तर राजीव गांधी यांच्या बोफोर्स भ्रष्टाचारावरच कडाडून टीका केली. बघता बघता व्ही.पी.सिंग यांचा जोर वाढला. सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले.

व्ही.पी.सिंग यांनी अलाहाबादमधून काँग्रेसच्या सुनील शास्त्री यांचा लाखो मतांनी पराभव केला. हा चमत्कारच मानला गेला.

मात्र तेव्हा देखील बुलेटवरून प्रचार करणारे व्ही.पी.पुढच्या काही महिन्यात देशाचे पंतप्रधान होतील असं कोणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. पण त्या अलाहाबाद निवडणुकीनंतर देशाचा करंट सेट झाला. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध व्ही.पी.सिंग यांनी उठवलेल्या आवाजाचं बघता बघता वणव्यात रूपांतर झालं.

१९८९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या तब्बल २१७ जागा कमी झाल्या. जनता दलाच्या नेतृत्वाखाली इतर विरोधी पक्ष एकत्र आले आणि राजीव गांधींच्या जागी व्ही.पी.सिंग यांना पंतप्रधान करण्यात आलं.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.