पुण्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात होत्या तेव्हा माजी पंतप्रधान थेट रस्त्यावर उतरले होते

काल पुण्यात आंबील ओढा परिसरातील अतिक्रमण हटवण्याचं प्रकरण संपूर्ण राज्यभरात चांगलंचं गाजलं. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला होता.

त्याला उत्तर म्हणून पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करून स्थानिकांना जबरदस्ती घराबाहेर काढल्याचं बघायला मिळालं. याचं संघर्षातून आंदोलनादरम्यान स्थानिकांकडून आत्मदहनाचा देखील प्रयत्न करण्यात आला.

अखेर पोलीस-स्थानिक यांच्या संघर्षानंतर न्यायालयाने या तोडकामास पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे.

मात्र या सगळ्या प्रकरणादरम्यान सगळ्यात जास्त चर्चा झाली ती उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या या प्रकारणावरील शांततेची.

स्थानिक खासदार, आमदारांनी यावर भाष्य केलं तरी राज्याचे प्रमुख म्हणून ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी यावर बोलणं अपेक्षित होतं. मात्र दिवसभर माध्यमांमधून याबाबत बातम्या दाखवल्या जातं असताना या दोघांकडून त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

मात्र इतिहासात असाचं एक प्रसंग पुण्यातचं घडून गेला आहे.

ज्यावेळी शेतकऱ्यांवर होतं असलेल्या अन्यायाची केवळ माध्यमांमधील बातमी बघून थेट देशाच्या पंतप्रधानपदी राहिलेल्या माणसाने प्रतिक्रिया दिली होती. आणि ते फक्त बोललेचं नव्हते तर ते आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर देखील पोहोचले होते.

त्यांचं नाव म्हणजे माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग.

तसं तर व्ही. पी. सिंग यांचं आणि पुण्याचं एक भावनिक नातं  होतं. आपल्या कॉलेजच्या आयुष्यातील महत्वाचं शिक्षण त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून घेतलं होतं.

तसचं पुढे त्यांची नात रिचा हि देखील पुण्यातील भारती विद्यापीठामध्ये वकिलीच शिक्षण घेण्यासाठी होत्या. याच भावनिक धाग्यामुळे कदाचित पंतप्रधानपदी राहिलेला माणूस थेट पुण्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला होता.

२००० नंतरच्या काळात पुणे वेगानं बदलत होतं. विकसीत होत असलेलं आयटी पार्क, वाढत जाणार औद्योगीकरण आणि त्यातुन पुणे मोठं शहरीकरणाचं रुप घेत होतं. परदेशी कंपन्यां दुरदृष्टी ठेवून इथं मोठ्या प्रमाणवर गुंतवणूक करत होत्या.

याच औद्योगीकरणासाठी २००६-०७ च्या काळात पुण्याच्या हिंजवडी, रांजणगाव, खेड, वाघोली या भागांमध्ये हजारो एकर जमिनींच अधिग्रहण सुरु झालं होतं. त्यातुन या भागांना विषेश आर्थिक क्षेत्र म्हणजेचं स्पेशल इकोनॉमिक झोन (SEZ) तयार करण्याची शासनाची योजना होती. मात्र यासाठी इथल्या स्थानिक शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होता.

जिल्हाभरात मेधा पाटकर, कुमार सप्तर्शी, भाई वैद्य उल्का महाजन अश्या सगळ्यांच्या नेतृत्वात शेतकरी या जमिन संपादनाच्या विरोधात एकवटले होते.

मार्च २००६ मध्ये असचं एक शेतकऱ्यांचं आंदोलन माण – हिंजवडीमध्ये सुरु होते. त्यावेळी स्थानिक प्रशासनानं शेतकऱ्यांचा विरोध असून देखील पोलिसी बळाचा वापर करुन जमिनीची मोजणी आणि बाकीचा सर्वे सुरु केला होता. त्यामुळे शेतकरी अधिकचं संतापले, पुरुषांच्या खंद्याला खंदा लावून महिला-मुलं देखील आंदोलनात उतरले. परिणामी आंदोलन आणखी चिघळलं.

हे आंदोलन एका टप्प्यावर इतक चिघळलं की पोलिसांनी सुरुवातीला लाठीमार, मग अश्रुधूर आणि शेवटी गोळीबार देखील केला. या सगळ्या झटापटीत काही शेतकरी पुरुष आणि महिला जखमी झाल्या. त्यावेळी इलेक्ट्रोनिक माध्यम खूपचं मर्यादित होते. पण टिव्हीवरुन या सगळ्या आंदोलनाबाबत बातम्या येवू लागल्या.

हे सगळं सुरु असताना माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग मुंबईमध्ये डायलिसीससाठी आणि उपचारासाठी आले होते. त्यांचा मुक्काम सह्याद्री अतिथीगृह येथे होता.

त्यादिवशी त्यांना भेटण्यासाठी इथले महाराष्ट्रातील त्यांचे सर्वात विश्वसनीय सहकारी नाथाभाऊ शेवाळे आणि ललीत रुणवाल मुंबईला गेले. संध्याकाळी भेट झाल्यानंतर सगळ्यांची चर्चा सुरु झाली.

याच चर्चेदरम्यान माण – हिंजवडी आंदोलनाची दृश्य व्ही. पी. सिंग यांनी टीव्हीवर पाहिली आणि नाथाभाऊ व ललीत यांना हे ठिकाण कुठे आहे अशी विचारणा केली. माहिती मिळाल्यानंतर अचानक व्ही. पी. सिंग उठले आणि म्हणाले,

हम कल इन किसानोंको मिलने जायेंगे और उन्हे सपोर्ट करेंगे. आप तय्यारी किजीये.

एवढचं नाही तर त्यांनी त्याचवेळी त्यांच्या खाजगी सचिवाला बोलून सांगितल की उद्या पुण्याला जावून आपण माण मधील शेतकऱ्यांनी चालू केलेल्या आंदोलनाला भेट द्यायची आहे, तसा कार्यक्रम प्रोटोकॉल विभागाला कळवा. सोबतच रेल्वे ऐवजी गाडीने जाणार असल्याचं देखील त्यांनी राजशिष्टाचार विभागाला कळवलं. स्थानिक पातळीवर नानासाहेब बलकवडे यांना सगळी व्यवस्था केली.

ठरल्याप्रमाणे सकाळी ११ वाजता व्ही. पी. सिंग यांच्या गाड्यांचा ताफा माण भागात पोहोचला. प्रचंड मोठ्या पोलिस बंदोबस्तात त्यांच स्वागत झाले आणि ते पुढे चालू लागले. इतक्यात स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी व्ही. पी. सिंग यांना भेटून या भागात जमावबंदी आदेश आहे, सभा घेता येणार नाही असे सांगितले.

यावर व्ही. पी. सिंग यांनी विचारलं,

कुठवर जमावबंदी आदेश आहे?

त्यावर पोलिसांनी त्यांना हिंजवडी व माण या दोन गावात असल्याचं सांगितलं. त्यावर व्ही. पी. पुन्हा म्हणाले,

मग मी गावाबाहेर जावून शेतकऱ्यांना भेटतो, पण भेटणार आणि पाठिंबा देणार हे नक्की.

त्याप्रमाणे व्ही. पी. सिंग यांच्या गाड्यांचा ताफा गावाबाहेरील शेतावर पोहोचला. शेताच्या बांधांवर त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि व जमीन संपादनाला शासन स्थगिती देत नाही तो पर्यंत मी इथून उठणार नाही, अशी आक्रमक घेतली.

व्ही. पी. सिंग यांना आठवड्यातून दोन-तीन वेळेला वेळा डायलेसीस करायला लागायचे. त्यांची तब्बेत नाजूक होती. दुपारचे कडक ऊन होते. त्यामुळे काही वेळ गेल्यानंतर सुरक्षा यंत्रणेला त्यांच्या तब्बेतीची काळजी पडली. त्यांनी ताबडतोब संपर्क साधून उन्हातून उठण्याची विनंती केली, व वरिष्ठांशी पुण्यातील विश्रामगृहावर पोहचल्यावर चर्चा करू असे सांगितले व शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन संपादन करणार नसल्याचे शासनाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.

यावर व्ही. पी. सिंग यांनी आंदोलन थांबवले, पण वरिष्ठांशी चर्चा करण्याचे अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन त्यांच्या पक्के लक्षात होते. त्यानुसार विश्रामगृहावर आल्यावर त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी संपर्क केला व माण येथील शेतकऱ्यांचा जमिन एआडीसीला देण्यास विरोध असून भूसंपादन प्रक्रिया थांबवावी, अशी विनंती केली.

विलासराव यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत संपादन प्रक्रिया थांबवण्याचे आदेश संबंधित विभागात दिले. व्ही. पी. सिंग यांच्या एका भेटीने आणि पाठिंब्याने पुण्यातील शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी वाचल्या.

पण माणच्या याच आंदोलनाने एका देशव्यापी आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली होती. ६ महिन्यानंतर व्ही. पी. सिंग यांनी यांच्या दिल्ली येथील तीनमुर्ती या निवासस्थानी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत बैठक झाली.

या बैठकीला माणमधील शेतकऱ्यांना घेवून येण्याची सुचना त्यांनी नाथाभाऊंना केली होती. या बैठकीला सिताराम येचूरी, डी. राजा, यांच्यासह देशातील प्रमुख नेते उपस्थित होते. याच बैठकीनंतर देशभरातील SEZ विरोधातील आंदोलनांना विरोधी पक्षांच्या नेतृत्वात सुरुवात झाली होती.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.