आणि चक्क त्या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे बिडी पेटवायला माचीस मागितली..

महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने कुणी शेतकऱ्यांचा नेता होता तर ते म्हणजे… दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक !

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला संपूर्ण देशात मानाचं स्थान असते. कित्येकजण या पदावर बसण्यासाठी तळमळत असतात. मात्र या खुर्चीवर तब्बल १२ वर्षे बसण्याचा विक्रम केला वसंतराव नाईक यांनीच. इतका प्रदीर्घ काळ त्या आधी तर सोडाच, परंतु त्यानंतर कोणाही मुख्यमंत्र्याला लाभला नाही.

याच सर्वात महत्वाचं कारण म्हणजे काळया मातीशी त्यांची नाळ कधी तुटली नाही.

पिढीजात शेतकरी कुंटुंबात जन्मलेले नाईकसाहेब शेती विषयाकडे आत्यंतिक जिव्हाळ्याने आणि आपुलकीने पाहत असत. राजकीय कर्तृत्वाच्या पायऱ्या चढत जात असतानाही आणि राजकारणाच्या व्यस्ततेतही त्यांची ही आवड कधी कमी झाली नाही.  शेतकऱ्यांच्या जीवनातील साऱ्या अडी अडचणीची, सुख-दुःखाची, न-पावसाच्या खेळीची त्यांना सूक्ष्म जाण होती.

जेव्हा-जेव्हा नाईकसाहेब आपल्या जन्मगावी जायचे तेव्हा तिथल्या भेटायला त्यांच्या शेताच्या बांधावर हमखास जात. तिथल्या चंद्रमौळी झोपडीत येऊन पोत्यावर बसत. त्यांच्याशी गप्पा मारत. मात्र या गप्पा शेतीविषयीच्याच असत.

एका मागासलेल्या भागात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या नेत्याने आपला पिढीजात सुसंस्कृतपणा कधी सोडला नाही. बुशशर्ट आणि पँट वापरणारे ते पहिले मुख्यमंत्री असतील. आकर्षक व ऐटदार पोषाखाला जोड मिळायची त्यांच्या हातात असणाऱ्या किंवा तोंडात शिलगावलेल्या ऐटदार पाइपची!

त्यांच्या या सवयी बद्दल अनेकांनी टोकलं होत पण वसंतराव दिलखुलासपणे याला प्रत्युत्तर द्यायचे. एकदा खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पाईप ओढण्याच्या सवयीबद्दल त्यांना टोकलं होतं.

वर्षा बंगल्यावर झालेल्या एका डिनर पार्टीनंतर बोलता बोलता पंडितजी सहज वसंतराव नाईकांना म्हणाले,

“नाईकसाहेब, पाईप सोडावसा नाही वाटत?”

वसंतराव नाईक अदबीने उत्तरले,

” पंडितजी, जी चीझ सोडावी लागेल ती मी कधी स्वीकारतच नाही.”

असे हे शौकीन व तितकेच स्वाभिमानी असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. पण त्यांच्या साधेपणाचा एक किस्सा आजही सांगितला जातो.

गोष्ट आहे १९७३ सालची. यवतमाळ मध्ये ४९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार होते. तत्कालीन जिल्हापरिषद अध्यक्ष सुधाकरराव नाईक या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. उद्‌घाटन तत्कालीन केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते तर समारोप तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत होणार होता.

वसंतराव नाईक स्वतः चांगले व चोखंदळ वाचक होते. उत्तमोत्तम मराठी व इंग्रजी ग्रंथांचा त्यांचा संग्रह मोठा होता. त्यांच्या भाषणात त्या ग्रंथांचे दाखले येत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राशीही त्यांनी जवळचा संबंध ठेवला होता. त्यामुळे यवतमाळ मध्ये होणारे साहित्य संमलेन त्यांच्या उपस्थितीत होणे साहजिक होते.

या संमलेनाचे ग.दि. माडगूळकर हे अध्यक्ष होते. ‘ग्रामीण महाराष्ट्राचे व त्याच्या व्यथा वेदनांचे चित्र मराठी साहित्यात जरा उमटू द्या’ हे त्यावेळच्या भाषणात उमटले होते.

ग.दि.माडगूळकरांचं भाषण संपलं. समेंलनाचे उद्‌घाटन आटोपल्यावर आणि मंडपासमोरच्या चौकात एका बाजूला उभे राहून ते यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक उभ्या उभ्याच गप्पा करीत रेंगाळले होते. पोलीस व्यवस्था दूर होती, समेंलनाला आलेली माणसे पुढाऱ्यांपर्यंत सहज जात-येत होती.

वसंतरावांनी त्यांचा तो प्रसिद्ध पाईप पेटवायला घेतला आणि कोणाच्या काही लक्षात येण्याआधी डोक्यावर गाठोडे घेतलेला एक ग्रामीण माणूस लगबगीने त्यांच्यापर्यंत पोहचला.

त्याने मुख्यमंत्र्यांना काय मागावे ? तो म्हणाला, ‘जरा माचिस दे की बाबा’.

त्याच्या हातात त्याची विझलेली विडी होती. वसंतरावांनी त्याला क्षणभर न्याहाळले आणि काहीएक न बोलता आपल्या जवळच्या लायटरने त्याची विडी तिथल्या साऱ्यांसमक्ष पेटवून दिली. तो ग्रामीण माणूस आला तसाच परतलाही.
त्याला अडवून एका पत्रकाराने विचारले, ‘तुझी विडी पेटविणारे कोण होते, ठाऊक आहे का तुला?’

‘नाही बा.’ तो भाबडेपणाने म्हणाला.

‘वसंतराव नाईक. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.’ पत्रकाराने त्याला सांगितले.

‘बापारे, म्हणजे त्या फुलसिंग नाईकाचा लेक?’ तो तेवढ्याच सहजपणे उद्‌गारला आणि चालू लागला… तेव्हाचे नेते जनतेच्या केवढे जवळ होते त्याचा हा साक्षात्कार.

वसंतरावांच्या व्यक्तिमत्त्वातले साधे माणूसपण असे अनेक प्रसंगांनी प्रगट व्हायचे. शेतकऱ्यांशी जोडलं गेलेलं नातं त्यांनी कधी सुटू दिलं नाही आणि म्हणूनच मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली तरी त्यांच्याबद्दलचा जनतेबद्दलचा अभिमान व प्रेम कधी कमी झालं नाही.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Milind Nagesh Guruba says

    Very good

Leave A Reply

Your email address will not be published.