मुख्यमंत्री नेहरूंना म्हणाले, “ज्या सवयी सोडाव्या लागतात त्या मी लावूनच घेत नाही.”

साल होतं १९६४. मे महिना होता. देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हवापालट म्हणून मुंबईला आले होते. प्रकृती फारशी चांगली नव्हती. महाराष्ट्राच्या राजभवनावर त्यांचा मुक्काम होता. नेहरूंची सख्खी बहीण विजयालक्ष्मी पंडित तेव्हा राज्याच्या राज्यपाल पदी होत्या. त्यांच्याच आग्रहामुळे नेहरू मुंबईला आले होते.

१८ मेच्या रोजी नेहरू राज भवनावर आले. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. वसंतराव नाईकांना यशवंतराव चव्हाणांचा वारस म्हणून ओळखलं जायचं. यवतमाळ सारख्या दुष्काळी भागातल्या बंजारा समाजात आलेल्या या नेत्याचे पाय शेतकरी मातीशी जोडले गेलेले होते. राज्याला अन्नधान्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्याची शपथ घेणारे वसंतराव नाईक हे खऱ्या अर्थाने कृषिपुत्र होते.

पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी त्यांचे सूर चांगले जुळायचे. सुट्टीसाठी आलेल्या पंडितजींशी गप्पा मारायला अनेकदा मुख्यमंत्री राजभवनावर जायचे. राज्यपाल विजय लक्ष्मी पंडित यांच्याशी तर त्यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं.

एकदा वसंतरावांनी विजयालक्ष्मी पंडित यांच्या कडे आग्रह धरला की पंतप्रधानांना घेऊन मुख्यमंत्री निवासवर भोजनासाठी यावे. राज्यपालांनी हसत हसत याला संमती दिली.

त्या दिवशी संध्याकाळी पंडित नेहरू आपल्या बहिणी सोबत वर्षा बंगल्यावर आले. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने वत्सलाबाईंनी नेहरूंच्या साठी खास वर्ष बंगल्याच्या हिरवळीवर डिनरची व्यवस्था केली होती. तिथला टापटीपपणा खास मराठी पद्धतीचे जेवण पाहून पंडितजी प्रचंड खुश झाले. कोकणच्या हापूस आंब्याचा आस्वाद त्यांनी घेतला.

जेवण झाल्यावर हिरवळीवर खुर्च्या टाकून त्यांच्या गप्पा सुरु झाल्या.

वसंतराव नाईक हे त्याकाळच्या काँग्रेसी नेत्यांपासून वेगळे उठून दिसायचे. स्वातंत्र्यलढ्याची ओळख म्हणून काँग्रेसी नेते खादीचे कपडे, धोतर कुडता त्यावर जाकीट, डोक्यावर गांधी टोपी अशा वेशात असायचे. वसंतराव नाईक यांना मात्र निटनिटकेपण पसंत होता.

ते ग्रामीण भागातून आले असले तरी आपल्या राहणीमानाकडे वसंतरावांचं विशेष लक्ष असायचं. ते खादीचाच पण बंद गळ्याचा सूट परिधान करायचे. आकर्षक व ऐटदार पोषाखाला जोड मिळायची त्यांच्या हातात असणाऱ्या किंवा तोंडात शिलगावलेल्या ऐटदार पाइपची!

त्यांच्या व्यक्तिमत्वातून  खानदानी सुसंस्कृतपणा झळकत असायचा. खुद्द पंडित जवाहरलाल नेहरूंना देखील राजकीय दिखाव्याचा असायचा. खादी धोतर जाकीट घालून जगावेगळे धंदे करणाऱ्या नेत्यांचा त्यांना प्रचंड राग होता. ते स्वतः देखील नेहमी शेरवानी सूट परिधान करायचे. त्यावर लावलेलं ऐटबाज गुलाब सगळ्यांच्या ओळखीचं झालं होतं.

जेवण झाल्यावर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री गप्पा मारत बसले होते. बोलता बोलता सवयीने वसंतरावांनी आपली पाईप शिलगावली. पंडितजींचं त्याकडे लक्ष गेलं.

बोलता बोलता ते सहज वसंतराव नाईकांना म्हणाले,

“नाईकसाहेब, पाईप सोडावसा नाही वाटत?”

वसंतराव नाईक अदबीने उत्तरले,

” पंडितजी, जी चीझ सोडावी लागेल ती मी कधी स्वीकारलेच नाही.”

पंतप्रधान दिलखुलासपणे हसले.

खरं तर त्यांना देखील सिगरेटची मोठी सवय होती. मात्र सध्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी ते कमी केलं होतं. पण त्यांना सुद्धा सिगरेटवरून टीकाटिप्पणी सहन करावी लागायची. त्यांनी कधी ही आपली सवय लपवली नाही. जे आहे ते खुलेआम स्वीकारणारा आपल्या सारखाच नेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपद आलाय हे पाहून त्यांना कौतुकच वाटलं.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.