लाखोंचा इनाम असलेले खुंखार डाकू विनोबांच्या पायाशी बंदुका ठेवून रडत होते

मध्यप्रदेश मधील चंबळ नदीच्या खोऱ्यात प्रवास करताना आजही अनेकांना धडकी भरते. या निबिड जंगलात पाऊल टाकायचं पोलिसांना देखील धाडस होत नाही.

आपण सिनेमात बघतो त्याप्रमाणे चंबळच्या खोऱ्यात डाकू राज्य करतात.

पन्नास साठ वर्षांपूर्वी परिस्थिती आणखी बिकट होती. चंबळ मध्ये डाकूंच्या अनेक टोळ्या होत्या. त्यांच्यात एकमेकांमध्ये लढाया व्हायच्या. बंदुकीच्या गोळ्यांचा पाऊस पडायचा. रोज खून लुटालूट कायमचा प्रकार होता. या भागातील लोक जीव मुठीत धरून जगायचे.

अशातच एका संत माणसाचं तिथं आगमन झालं. हे संत कोणी धार्मिक बाबा नव्हते तर ते होते

म.गांधींचे सर्वात लाडके शिष्य आचार्य विनोबा भावे.

कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तहसिलातील गागोदे या गावी विनोबा तथा विनायक नरहरी भावे यांचा जन्‍म झाला. त्यांच्या अनेक पिढ्यांचे वास्तव्य वाई येथे होते.

विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथे झाले.

१९१६ साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईस जाण्यास निघाले परंतु वाटेतच सुरतेस उतरून आईवडिलांना न कळविताच वाराणसी येथे रवाना झाले.

त्यांना दोन गोष्टींचे आकर्षण होते. एक हिमालय व दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक, वाराणसी येथे हिंदुविश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधीचे भाषण झाले. त्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला.

हिमालयातील अध्यात्‍म आणि बंगालमधील क्रांती यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधीच्या उक्तीत आणि व्यक्तिमत्त्वात त्यांना आढळल्या.

त्याक्षणाला ते गांधीजींचे कट्टर भक्त बनले.

ब्रम्हचर्याचे व्रत स्वीकारून गोरगरिबांची सेवा केली, गांधीजींच्या आंदोलनात सहभागी घेतला, स्वातंत्र्यलढ्यासाठी कारावास भोगला. जमनालाल बजाज यांच्या आग्रहाखातर वर्धा येथे गांधी आश्रम उभे केले.

दुर्दैवाने भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काहीच महिन्यात राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे आचार्य विनोबा भावेंना धक्का बसला. फाळणीनंतर परागंदा झालेल्या लाखो कुटूंबाना धीर देण्यासाठी विनोबा दिल्लीला आले होते.

इथे चालू असलेला हिंसाचार पाहून त्यांना प्रश्न पडला की,

अहिंसक क्रांतीचा संदेश म. गांधीनी जगाला दिला. परंतु तो भारतालाही समजला नाही, तर जगाला कसा समजेल ?

बंगाल मधील नक्षलवाद, काश्मीर मधील दहशतवाद पाहिल्यावर या भूतलावरच शांतिमय क्रांतीचे कार्य पुरे व्हावयाचे आहे अशा तर्‍हेचा विश्वास निर्माण करण्याकरता ‘सब भूमी गोपाल की’ व ‘जय जगत्’ची घोषणा विनोबांनी केली.

७ मार्च १९५१ रोजी आंध्रमधील शिवरामपल्ली या गावाला पोहोचण्यासाठी विनोबांनी सेवाग्रामहून पदयात्रा सुरू केली. ही पदयात्रा म्हणजे भूदानाचे ऐतिहासिक आंदोलन होय. १८ एप्रिल १९५१ रोजी तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात पोचमपल्ली गावी विनोबा पोहोचले. हे कम्युनिस्ट नक्षलवाद्यांचे केंद्र होते. त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केले की,

मी आजपासून भारतातील भूमिहीनांसाठी जमीन मागण्याचा प्रयोग करीत आहे. जमिनीची योग्य वाटणी झाली तरच खरी सामाजिक क्रांती-विशेषतः स्वयंपूर्ण ग्रामराज्याकडे नेणारी क्रांती-निर्माण होऊ शकेल’

ही यात्रा सुरू झाल्यानंतर ७० दिवसांत एकूण १२ हजार एकर जमीन मिळाली.

साऱ्या जगाचे लक्ष या ग्रामदानच्या आंदोलनाकडे त्यांनी वेधून घेतले. वय वर्षे ५५ ते ६८ पायी यात्रा करून सारा भारत देश त्यांनी पाहिला. चाळीस हजार मैल चालले.

विनोबांची पदयात्रा काश्मीरला निघाली असता त्यांना एक पत्र मिळाले. हे पत्र चंबळचा कुप्रसिद्ध डाकू मानसिंह याचा मुलगा तहसीलदार सिंग याने लिहिले होते.

त्याला फाशीची शिक्षा झाली होती. या पत्रात त्याने विनोबांची अखेरची भेट घेण्याची विनंती केली होती.

विनोबांनी लागलीच पत्र पाठवून जनरल यदुनाथ सिंह यांना तहसीलदारसिंग याच्या भेटीला पाठवून दिले. त्याला आपल्या कुकर्माचा पश्चाताप होत होता. यदुनाथ सिंह हे चंबळ मध्ये जाऊन आले त्यांनी विनोबांना कळवले की आपण प्रयत्न केले तर अनेकजण दरोडेखोरो सोडायला तयार होतील.

७ मे १९६० रोजी हातात कोणतंही शस्त्र नसलेला पांढरी दाढीवाला गांधीवादी म्हातारा चंबळच्या जंगलात शिरला.

खोऱ्यातून हिंडताना विनोबांनी तिथल्या डाकूंचे ह्रदयपरिवर्तन केले. ते म्हणायचे,

सज्जनांचे क्षेत्र हे डाकूग्रस्त का झाले त्याची कारणे शोधा. शोषक आणि शोषित, ही विकृती निर्माण करणारी कारणपरंपरा शोधा ,ती कारणे दूर सारा. आज दिल्लीतही सफेदपोश डाकू आहेत, नफेबाज व्यापारी हादेखील डाकूच आहे.

१९ मे १९६० रोजी ११ डाकूं टोळ्यांच्या मुखींयानी विनोबांच्या प्रार्थना सभेत आत्मसमर्पण केलं. लाखोंचा इनाम असलेले खुंखार डाकू विनोबांच्या पायाशी बंदुका ठेवून रडत होते. त्यांचा नेता लुक्कासिंग म्हणाला,

अब तक हमने बहुत से बुरे काम किए हैं. उन पर हमें दुःख हो रहा है

हाच लुक्कासिंग पुढे जाऊन पंडित लोकमन नावाने प्रसिद्ध झाला. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनावेळी शेकडो दरोडेखोर त्याच्यामुळेच शरण आले.

भूदान चळवळ असो किंवा हे डाकूचे आत्मसमर्पण गांधीवादाची जादू अशक्य गोष्ट शक्य करून दाखवते हे विनोबा भावेंनी दाखवून दिलं आणि जगाला विसमयचकीत करून सोडलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.