कधीकाळी संपल्याची चर्चा होती, तेच विनोद तावडे हिमाचल प्रदेशचे किंगमेकर ठरु शकतात…

हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निकालाचे आकडे सकाळपासून बदलतायत. गुजरातमध्ये काँग्रेस आघाडीवर असलं, तरी हिमाचल प्रदेशमध्ये मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर सुरु आहे. ६८ पैकी ३३ जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर ३२ जागांवर काँग्रेस.

थोडक्यात मॅजिक फिगर कोण गाठणार याची चर्चा तर आहेच, पण कशी गाठणार याची सुद्धा.

हिमाचलमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे आणि भाजपनं अपक्षांना आपल्या बाजूनं वळवण्यासाठी पावलं उचलायला सुरुवातही केली आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये आघाडीचं नाव आहे भाजपचे महासचिव विनोद तावडे.

त्रिशंकू परिस्थिती, अपक्षांचं वाढलेलं महत्त्व आणि सत्ता टिकवण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं विनोद तावडेंवर विश्वास दाखवलाय. निकाल लागण्याआधीच तावडेंना हिमाचल प्रदेशमध्ये पाठवण्यात आलंय. विनोद तावडेंवर हिमाचल प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी होतीच, पण आता निकालानंतरची सूत्रंही विनोद तावडेंच्याच हातात आहे.

पण एखाद्या राज्यात भाजप जिंकतंय आणि विनोद तावडे केंद्रस्थानी आहेत, ही गोष्ट काही नवी नाही. याआधी चंदीगड महानगर पालिकेत बहुमत नसतानाही भाजपचा महापौर बसवण्यात विनोद तावडेंचा मोठा वाटा होता.

काँग्रेसनं हिमाचल प्रदेशमध्ये पूर्ण ताकद लावलेली, सोबतच तिथं ५ वर्षांनी सत्ता बदलते हा इतिहासही आहे, मात्र असं असलं तरी विनोद तावडेंनी प्रभारी म्हणून कमान सांभाळत भाजपला सत्तास्थापनेच्या रेसमध्ये आघाडीवर ठेवलंय.   

उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं आणि दिल्लीत देखील भाजपच्या या विजयाचं सेलिब्रेशन सुरू झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील या लोकांना अभिवादन करण्यासाठी समोर आले. जेव्हा मोदी आणि अमित शहा अभिवादन करत होते तेव्हा या दोन मोठ्या चेहऱ्यांच्या मागे एक चेहरा दिसत होता. 

तो चेहरा म्हणजे, कधीकाळी राजनाथ सिंह यांच्या गाडीत बसवण्यावरून नकार मिळालेले, त्यामुळेच सोशल मिडीयावर ट्रोल झालेले. २०१९ च्या निवडणूकीत विधानसभेचं तिकीटही न मिळालेले 

विनोद तावडे.

१९८० ते १९९५ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केले. १९९५ पासून राजकारणात जम बसवला. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, मुंबई अध्यक्ष, विधान परिषदेचे १३ वर्षे सदस्य, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, २०१४ मध्ये मंत्रीपद अशाप्रकारे राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. 

नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे या दोन बड्या नेत्यांच्या सावलीत राहून विनोद तावडे यांनी भाजपमध्ये स्वत:चे भक्कम स्थान निर्माण केले होते मात्र २०१४ मध्ये त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वकांक्षेमुळे फडणवीसांनी त्यांच्याकडे प्रतिस्पर्धी म्हणूनच पाहिले.

फडणवीस सरकार मध्ये तावडे यांच्याकडे शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण ही महत्वाची खाती होती.  त्यांचा मंत्रिमंडळाचा कार्यकाळ वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. 

तर २०१९ मध्ये त्यांना विधानसभेचं तिकीट सुद्धा देण्यात आलं नाही. तावडे दोन वर्ष अडगळीत पडले होते. २०२१ मध्ये भाजपने त्यांचे पुनर्वसन केले.

त्या पुनर्वसनाचे टप्पे पाहिलेत तर विनोद तावडे यांना राष्ट्रीय राजकारणात बढतीच मिळत गेली…. त्याचेच हे टप्पे.

१. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस पद.

राष्ट्रीय चिटणीस पदावरून विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदावर पदोन्नती झाली.

नोव्हेंबर २०२१ मध्ये भाजपच्या नव्या राष्ट्रीय समितीची घोषणा करत विनोद तावडेंना राष्ट्रीय सरचिटणीसपदी नेमणूक झाल्याचंही घोषित करण्यात आली ज्याची बरीच चर्चा झालेली. कारण राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी मिळाल्याने त्यांच्या कारकिर्दीचा आलेख उंचावण्यास मदत झाली.

भूपेंद्र यादव केंद्रीय मंत्री झाल्यानंतर निर्माण झालेली रिक्त जागा भरण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सचिव असलेले तावडे यांची सरचिटणीसपदी बढती करण्यात आली.

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर राष्ट्रीय सरचिटणीस पदावर नियुक्त होणारे तावडे हे महाराष्ट्रातील दुसरे नेते आहेत.

२. त्रिपुरा आणि हरियाणा राज्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी.

२०२० पासून भाजपशासित हरयाणा राज्याचे प्रभारीपदाची जबाबदारी विनोद तावडेंवर होती. तसेच २०२३ मध्ये त्रिपुरा च्या विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विनोद तावडे यांची त्रिपुरामध्ये पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्रिपुरातल्या निवडणुकांची कमान तावडेंच्या खांद्यावर आहे, तिथे भाजपाला यश मिळालं तर त्या श्रेयाचे वाटेकरी तावडे देखील असतील.

३. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांचे समन्वयक.

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी विनोद तावडे यांना उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांसाठी समन्वयक बनवले. 

४. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे समन्वयक म्हणून देखील पक्षाने त्यांची नियुक्ती केलेली आहे .

५. मन की बातचे समन्वयक. 

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचं समन्वयकच नव्हे तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तावडे यांना प्रधानमंत्री कार्यालयातील पंतप्रधानांच्या ‘मन कि बात’ या प्रकल्पाच्या समन्वयकपदाची जबाबदारी दिली. तसेच त्यांना विविध केंद्र सरकारच्या योजनांची जबाबदारीही दिली होती.

६. भाजपचं राष्ट्रीय महामंत्रीपद.

२०२१ च्या अखेरीस भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काही संघटनात्मक नियुक्ता केल्या त्यात तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांची नियुक्ती महत्त्वाची ठरली. कारण थोडक्यात ते महाराष्ट्र प्रभारी म्हणून जबाबदारी पाहणार आहेत.

 ७. राष्ट्रपती निवडणूक व्यवस्थापन समिती

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने  ‘राष्ट्रपती निवडणूक व्यवस्थापन समिती’ स्थापन केली होती. यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्यासह विनोद तावडे यांचाही समावेश होता.

तावडे यांच्याकडे समितीचे सहसंयोजकपद सोपवण्यात आले होते. राष्ट्रपती निवडणुकीत भाजपशासित राज्यांतील मतांचे योग्य नियोजन करणे, मित्रपक्ष व अपक्ष आमदारांची जुळवाजुळव करणे, त्यांची मते भाजपकडे वळवण्याची जबाबदारी तावडेंकडे देण्यात आली होती, जी त्यांनी व्यवस्थित पारही पाडली.

८. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘मिशन १४४’ ची जबाबदारी.

देशात सलग तिसऱ्यांदा सत्तेत यायचं या उद्देशाने भाजप २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या लागलंय. भाजपने मागील निवडणुकीत जिंकू न शकलेल्या १४४ जागांवर लक्ष्य केंद्रित केलं आहे. २०१९ मध्ये गमावलेल्या लोकसभा मतदारसंघाचा देखील या १४४ जागांमध्ये समावेश आहे.  लोकसभा प्रवास योजना असं नाव याला देण्यात आलेलं आहे.

या मिशनसाठी भाजपने ४ नेत्यांची नेत्यांची एक समिती स्थापन केली त्यात विनोद तावडे यांचाही समावेश आहे. विनोद तावडेंकडे दक्षिण भारतातील राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपचा फारसा प्रभाव नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडे आव्हानात्मक अशी जबाबदारी देण्यात आली आहे.

त्यामुळं कधीकाळी राजकारणातून साईडलाईन झाले का ? राज्यातल्या राजकारणाला ब्रेक बसला का अशी चर्चा ज्यांच्याबद्दल सुरु होती, तेच विनोद तावडे राष्ट्रीय राजकारणात भाजपसाठी पुन्हा एकदा हिरो ठरु शकतायत.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.