मनाविरुद्धचा प्रदेशाध्यक्ष नेमला म्हणून मुख्यमंत्र्यानी थेट राजीनामाच दिला.

साल होतं १९८३. महाराष्ट्रातील सत्ता आपल्या हातात राहावी म्हणून लोकांचा पाठींबा नसणाऱ्या अंतुले, बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री करणाऱ्या इंदिरा गांधीनां अखेर जनमानसावर आणि संघटनेवर पकड असणाऱ्या वसंतदादांना मुख्यमंत्री करावं लागलं होतं.

गेली अनेकवर्षे मुख्यमंत्रीपदाची खुर्चीशी दादांचा पाठशिवणीचा खेळ सुरु होता तो संपला होता. आपल्या इतक्या वर्षाच्या अनुभवाला प्रत्यक्षात उतरवण्याची संधी दादांना मिळाली होती.

पुढे एका वर्षातच इंदिराजींची हत्या झाली. राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने त्यावेळची लोकसभा न भुतोनभविष्यती अशा बहुमताने जिंकली. इंदिरा गांधींच्या हत्येमुळे जनतेत उमटलेला आक्रोश व सहानुभूती लाट यामध्ये विरोधी पक्ष उडून गेले.

राजीव गांधी तरुण होते. कॉम्प्युटर आणि टेक्नॉलॉजीचं त्यांना आवड होती. प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे आत्मविश्वास होता. नवा भारत तरुणांनी घडवायचा याबाबदल त्यांचं ठाम मत होते. काँग्रेसच्या जुन्या नेत्यांनी आता बदलायला हवं असा एकंदरीत राजीव गांधी यांचा सूर होता. 

गेल्या काही वर्षात दिल्लीतल्या काँग्रेसच्या श्रेष्ठींनी राज्यातली सत्ता देखील आपल्या हातात राहावी यासाठी प्रयत्न केले होते. राजीव गांधी यांनी हाच वारसा पुढे चालवला. महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. वसंतदादा पाटील हे स्वतंत्र विचारांचे लोकनेते होते. त्यांचा करिष्मा पक्षाच्या पलीकडे जाणारा होता. दादा हे निर्णय घेताना दिल्लीला विचारत नाहीत हे राजीव गांधींच्या सल्लागारांचे दुखणे होते.

मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांवर वचक ठेवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बदलायचा अशी खेळी राजीव गांधींनी केली. नव्या प्रदेशाध्यक्षा होत्या प्रभा राव.

प्रभा राव या मूळच्या विदर्भातल्या प्रभा वसू. त्यांच्या कुटुंबावर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता. राज्यशास्त्रात त्या एम. ए. झाल्या होत्या. शाळा कॉलेजमध्ये असताना एक क्रीडापटू म्हणून महाराष्ट्राचं नेतृत्व केलं होतं. शास्त्रीय संगीतातील पदवी देखील त्यांनी प्राप्त केली होती.

पुढे राजकारणात आल्या आणि वर्धा जिल्ह्यातील देवळी मतदारसंघातून सहा वेळा विजय मिळवला. त्यांची धडाडी व कार्यक्षमता पाहून शंकरराव चव्हाण यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं. १९७२ ते ७८ या चार वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक महत्वाची खाती सांभाळली.

काँग्रेसच्या फुटाफुटीमध्ये देखील त्या इंदिरा गांधींच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या. याचाच परिणाम त्यांना विधानसभेचा विरोधी पक्ष नेते पद देण्यात आले होते. पुढे राजीव गांधींनी तर तरुण नेतृत्वाला संधी देण्याच्या धोरणानुसार त्यांची थेट प्रदेशाध्यक्षपदी निवड केली.

ही बातमी आली तेव्हा वसंतदादा यांना प्रभा राव यांची निवड पटली नाही. त्यांनी या बद्दल नाराजी व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी दिल्लीला राजीव गांधींची भेट मागितली. पण काही कारणाने ती टाळली गेली.

वसंतदादा मुख्यमंत्री कार्यालयातून उठले, तडक राज्यपालांकडे गेले आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन घरी निघून गेले. कोणाला काय झाले समजायच्या आत ‘वर्षा’ हा सरकारी बंगला सोडून, मुख्यमंत्र्यांची सरकारी गाडी परत करून आपल्या बळीराम ड्रायव्हरला बोलावून दादा माहीम इथल्या घरी गेलेसुद्धा.

यावेळी त्यांच्या गाडीत सांगलीचे चारुभाई शहा देखील होते. ते वसंतदादा यांना सांगत होते,

“दादा दमानं घ्या. इतका त्रागा करू नका “

पण वसंतदादा यांनी स्पष्ट सांगितलं,

“अरे चारू स्वाभिमानाने राहावं.”

दादांच्या तडकपडकी राजीनाम्याची बातमी वा-यासारखी पसरली. कार्यकर्त्यांची गर्दी जमली. रात्री राजीव गांधींचा फोन आला. ते त्यांना समजावत होते. दादांनी स्पष्टपणे सांगितले,

‘मुख्यमंत्र्याला किमान अध्यक्षपदाचा बदल सांगून कराल की नाही? तुमची ही पद्धत मला मान्य नाही..’

वसंतदादा एवढं मोठं पाऊल उचलतील याची कोणाला कल्पनाच नव्हती. त्यांचे जाणे महाराष्ट्रात पक्षाला परवडणारे नाही हे राजीव गांधींना ठाऊक होते. त्यांनी दादांची समजूत काढण्यासाठी दिल्लीहून चार बड्या नेत्यांना पाठवलं. यात सीताराम केसरी यांच्या पासून ते महाराष्ट्राचे प्रभारी मोपणार यांचा समावेश होता.

पण वसंतदादा यांनी कोणालाच दाद दिली नाही. अखेर त्यांच्या जागी शिवाजीराव पाटील निलंगेकर या त्यांच्याच खास माणसाला मुख्यमंत्री बनवण्यात आलं. एकार्थे सत्ता दादांचीच राहिली.

पण प्रभा राव मात्र प्रदेशाध्यक्षपदी कायम राहिल्या.

वसंतदादा विरोधात असूनही त्यांनी प्रदेशाध्यक्षपद खंबीरपणे सांभाळलं. स्पष्टवक्तेपणा आणि परिणामांची पर्वा न करता निर्णय घेणे, अशी त्यांची कार्यशैली होती. पक्षश्रेष्ठींना नेमके काय हवे याचा अचूक अंदाज घेत, त्या अनेक धाडसी निर्णय घेत असत.

मुलीचे परीक्षेत मार्क वाढवले या प्रकरणातून निलंगेकर यांच्या एका वर्षात झालेल्या गच्छंतीला देखील त्याच कारणीभूत आहेत अशी चर्चा होती. पुढे शंकरराव चव्हाण यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांच्याशी मात्र प्रभा राव यांचे सूर जुळले.

१९८८ साली शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री बनले तेव्हा मात्र प्रभा राव यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात प्रवेश घेतला. त्याच वर्षी त्यांच्या जागी प्रतिभाताई पाटील यांची राजीव गांधींनी प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली होती.

पुढे प्रभा राव राज्यातील राजकारणापासून दूर राहिल्या. केंद्रात पक्षाच्या कार्यकारणीमध्ये त्यांनी अनेक वर्षे घालवली. त्या काळात त्यांच्यावर दिल्ली, गोवा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, पश्‍चिम बंगाल, हरियाना, केरळ, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड अशा अनेक राज्यांची जबाबदारी देण्यात आली होती. १९९९ साली वर्धा येथून त्या खासदार देखील बनल्या.

२००४ साली त्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी महाराष्ट्रात परतल्या. त्यावर्षीची विधानसभा निवडणूक त्यांच्या आणि मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आल्या. काँग्रेसने या निवडणुकीत चांगली कामगिरी बजावली.

प्रभा राव यांचा अध्यक्ष म्हणून पक्षात मोठा दरारा होता. त्यांना पदाधिकाऱ्यांनी अघळपघळ वागलेले खपत नव्हते. त्यांच्या करड्या शिस्तीमुळे अनेक ज्येष्ठ पदाधिकारीही पूर्वपरवानगी न घेता त्यांच्यासमोर जायला कचरत असत. 

कित्येकदा आपल्याच सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढणारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सेझ प्रकल्पांचे परिणाम, कुपोषण, विजेची समस्या अशा प्रश्‍नांवर अहवाल तयार करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. विलासरावांविरुद्ध त्यांनी दिल्लीत मोहीम देखील राबवली होती. दोघांच्यातील तणाव बराच गाजला.

त्यांची प्रदेशाध्यक्षपदाची दुसरी टर्म जवळपास चार वर्षे चालली. अखेर विलासरावांच्या प्रयत्नांना यश आले. प्रभा राव यांची 2008 मध्ये त्यांची हिमाचलच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली.

त्यावेळी पक्षाच्या वतीने इस्लाम जिमखान्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेले मुख्यमंत्री विलासराव देशमुख व महसूलमंत्री नारायण राणे यांना जवळ बोलाविले, एकमेकांच्या हातात हात दिले आणि यापुढे एकोप्याने काम करा, असा सल्ला दिला. त्या वेळी उपस्थित कॉंग्रेसजन भारावून गेले होते.

प्रभा राव या दिल्लीश्वरांच्या मर्जी राखणाऱ्या प्रदेशाध्यक्ष म्हणून ओळखल्या गेल्या. मुख्यमंत्र्यावर वचक राखण्याचं काम त्यांनी चोखपणे बजावलं. त्यांच्या बद्दल अनेकदा वादंग जरी झाले असले तरी काँग्रेसच्या गाजलेल्या प्रदेशाध्यक्षांमध्ये त्यांचा उल्लेख निश्चित केला जाईल. 

हे ही वाच भिडू.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.