नरेंद्रला ‘स्वामी विवेकानंद’ बनवलं ते या राजेसाहेबांनी…

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाला एका व्रतस्थ संन्यास्याने गुलामगिरीच्या जोखडात अडकलेला हा देश आता जागा होतो हे सगळ्या जगासमोर आणलं. भारतीय तरुणांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना रुजवली.  विज्ञानयुगात होरपळणाऱ्या साऱ्या पाश्चात्य जगाला हिंदू अध्यात्मविचारामुळे शांती लाभणार आहे, हा मांडला आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवला.

ते होते योद्धा संन्यासी म्हणून ओळखले गेलेले स्वामी विवेकानंद.  

१२ जानेवारी १८६३ रोजी बंगालमधल्या एका भद्र कुटुंबात झाला. मूळ नाव वीरेश्वर रूढ झालेले नरेंद्रनाथ. वडील विश्वनाथ दत्त, कलकत्ता उच्च न्यायालयात वकील. नरेंद्रावर बालवयात आईकडून धार्मिक, तर मोठा झाल्यावर वडिलांकडून आधुनिक बुद्धिवादी विचारसरणीचे संस्कार झाले.

मेट्रपॉलिटन इन्स्टिट्यूट, प्रेसिडेन्सी कॉलेज आणि जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूशन येथे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण होऊन नरेंद्र १८८४ साली बी. ए. ची परीक्षा दुसऱ्या वर्गात उत्तीर्ण झाला.कायद्याच्या शिक्षणाचा अभ्यास करताना जगाचा इतिहास आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान यांची विशेष ओळख झाली.

अगदी तरुण वयातच ब्राम्हो समाजाने त्यांच्या मनावर खोलवर परिणाम केला.

मूर्तिपूजेला विरोध आणि सामाजिक सुधारणांचे महत्त्व हे विचार तेथून उचलले. नरेंद्राचे आजोबा दुर्गाप्रसाद हे संन्यास घेऊन घरातून निघून गेले होते. नरेंद्राच्या ठायी आरंभापासून संन्यासाची, ईश्वरप्राप्तीची ओढ लागली होती.

अखेर त्यांच्या एका नातेवाईकाने नरेंद्रनाथला तुला ईश्वरप्राप्तीची खरीखुरी इच्छा असेल, तर दक्षिणेश्वरला जा.असं सांगितलं.  दक्षिणेश्वर हा रामकृष्ण परमहंस यांचा आश्रम होता. कॉलेजमध्ये असताना प्रिन्सिपल हेस्टी यांच्याकडून श्रीरामकृष्णांच्या समाधी लागण्याबद्दल ऐकले होते.

पडत्या फळाची आज्ञा मानत नरेंद्रनाथ दक्षिणेश्वरला गेले.

तिथे गेल्यावर नरेंद्राने त्यांना तुम्ही देव पाहिला आहे का असे प्रश्न विचारले. त्यांनी हाच प्रश्न देवेंद्रनाथ टागोरांपासून अनेकांना प्रश्न विचारला होता, पण कोणीही त्याला होकारार्थी उत्तर देऊ शकले नव्हते. मात्र रामकृष्ण परमहंस यांनी निःसंधिग्ध उत्तर दिले,

 “ होय, मी देव पाहिला आहे व तुझी इच्छा असेल तर मी तुलाही त्याच दर्शन घडवू शकेन.”

त्यांचे विशुद्ध मन आणि संपूर्ण ईश्वरशरणता यांमुळे नरेंद्र त्यांच्याकडे आकृष्ट झाला. तरीही आपल्या बुद्धीला पटल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचा स्वीकार न करण्याची त्याची चिकित्सक वृत्ती व संदेहशीलता कायम होती. १८८४ मध्ये वडिलांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आणि नरेंद्राला तीव्र मानसिक क्लेशांमधून जावे लागले. या कालात नरेंद्र प्रथमच कालीमातेच्या मंदिरात तिच्यासमोर नम्र झाला आणि श्रीरामकृष्णांमुळे अद्वैतसिद्धांताचा प्रत्यय येऊन गेला.

यानंतर नरेंद्राचे जीवन संपूर्णपणे पालटून गेले.

हळूहळू कुटुंबाचे पाश त्याने तोडले आणि त्याचे मन आध्यात्मिक साधनेकडे वळले. काशीपूरच्या उद्यानगृहात कर्करोगाने आजारी असलेल्या श्रीरामकृष्णांची सेवा केली. याकाळात त्यांच्याही मनात समाधीचे विचार बळावू लागला पण रामकृष्ण परमहंस यांनी तुला जगन्मातेचे कार्य करायचे आहे असा आदेश दिला. 

१५ ऑगस्ट १८८६ या दिवशी श्रीरामकृष्णांनी महासमाधी घेतल्यावर त्यांच्या आज्ञेनुसार नरेंद्र आणि त्याचे दहाबारा गुरुबंधू यांनी घरादाराचा त्याग केला आणि ते सारे एका छोट्या जुन्या घरात एकत्र राहू लागले तोच वराहनगर मठ होय. भजनपूजन, शास्त्रग्रंथांचा अभ्यास आणि अधूनमधून तीर्थयात्रा असा त्यांचा जीवनक्रम होता. या सर्वांनी विधिपूर्वक संन्यास स्वीकारला होता.

नरेंद्रनाथाने संन्यास घेतल्यावर विविदिषानंद हे नाव धारण केले होते.

१८९० च्या मध्याच्या सुमारास त्यांनी कलकत्ता सोडली. गाझीपूरला पव्हारीबाबांच्या आकर्षणात काही दिवस घालवून बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या मार्गाने ते मीरतला आले. तेथे एकाकी भ्रमण करण्याचा निर्णय घेतला.

१८९१ च्या दरम्यान ते राजस्थानच्या खेत्री या गावी पोहचले.

तिथे खेत्रीच्या राजाला म्हणजेच महाराज अजितसिंह यांना कोणी तरी सिध्दपुरुष आपल्या राज्यात आला आहे हे कळालं. त्यांनी या संन्यास्याला भेटण्यासाठी पाचारण केलं. अस्खलित इंग्रजीमध्ये बोलणारा तेजस्वी रूपातील तरुण स्वामीने आपल्या विचारांनी अजित सिंह यांना प्रचंड प्रभावित केले. महाराज पहिल्यांदा इंग्रजी मध्ये बोलणाऱ्या संन्यास्याला भेटत होते.

दोघांची कित्येक तास अनेक विषयांवर चर्चा झाली. स्वामीजींना देखील अध्यात्म आणि इतर सर्व विषयांवर सखोल अभ्यास असलेला हा राजा आवडला. महाराजांनि स्वामींना आपल्या राज्यात काही काळ वास्तव्य करण्याची विनंती केली.

स्वामीजी तिथे तब्बल ४ महिने राहिले. या काळात महाराज अजित सिंह यांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. आपल्या भारतभ्रमन्तीच्या काळातील सर्वाधिक काळ स्वामीजी खेत्रीमध्ये राहिले. त्यांचे आणि महाराजांचे नाते फक्त गुरु शिष्याचे नाही तर मित्रत्वाचे राहिले. महाराजा अजित सिंह यांनीच एकदा बोलता बोलता तुम्हाला विविषानंद याच्या ऐवजी विवेकानंद हे नाव जास्त शोभून दिसते असं सांगितले.

त्या दिवसापासून नरेंद्रनाथ हे स्वामी विवेकानंद म्हणून ओळखले जाऊ लागले.

खेत्रीनंतर स्वामी विवेकानंद  काठेवाड, सौराष्ट्र, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू असा प्रवास करीत ते २४ डिसेंबर १८९२ या दिवशी कन्याकुमारीला पोहोचले. या परिभ्रमणामुळे वर्तमानकालीन भारताचे एक विराट दर्शन त्यांना घडले. शतकानुशतके हा समाज निद्रितावस्थेत आहे, आपला उज्वल वारसा विसरला आहे आणि रूढी व परंपरा यांचा दास झाला आहे, असे भीषण चित्र विवेकानंदांच्या डोळ्यांसमोर होते.

राजा अजितसिंग यांनी स्वामीजींना शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्मपरिषदेस हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून जाण्यास राजी केले.

११ सप्टेंबर १८९३ या दिवशी विवेकानंदानी केलेल्या पाच मिनिटांच्या भाषणाने सारी सभा मंत्रमुग्ध झाली आणि सतरा दिवस चाललेल्या त्या परिषदेवर सर्वांत अधिक प्रभाव त्यांचा पडला. त्यानंतर सुमारे साडेतीन वर्षे त्यांचा अमेरिका आणि इंग्लंड येथे संचार झाला. बुद्ध आणि ख्रिस्त यांच्याशी त्यांची तुलना झाली. अनेक व्याख्याने त्यांनी दिली.

विवेकानंद यांना अमेरिकेला जाण्याची जहाजाची तिकिटे काढण्यापासून सगळं खर्च महाराज अजितसिंह यांनी केला.

स्वामीजींचे अमेरिकेत पैसे चोरीला गेले तेव्हा तात्काळ अजितसिंह यांनी मनी ऑर्डर करून रक्कम पाठवून दिली. भारतीय अध्यात्म जगभरात पसरवण्यास अजित सिंह यांचा देखील हातभार लागला. म्हणूनच स्वामी विवेकानंद आपल्या भाषणात कायम सांगत असत की,

आपल्या हातून जे काही थोडं फार कार्य घडलं ते फक्त महाराज अजितसिंह यांच्या मदतीमुळे शक्य झालं 

स्वामी विवेकानंद यांनी त्यांना आपल्या आयुष्यातील एकमेव मित्र मानलं. त्यांनी एकदा एका पत्रात अजितसिंह यांना विनंती केली होती की माझी आई कलकत्त्याच्या घरामध्ये वृद्धपकाळात राहत आहे. तिच्या मदतीसाठी काही पैसे पाठवण्याची व्यवस्था आपण करावी.

आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत अजितसिंह यांनी विवेकानंद यांना दिलेला शब्द पाळला. विवेकानंद यांच्या वडिलांप्रमाणे त्यांनी त्यांच्या कुटूंबाची काळजी घेतली. 

पण दुर्दैवाने स्वामी विवेकानंद यांच्या ३७ व्या जन्मदिनाच्या आठवड्याभरातच महाराजा अजितसिंह यांचा उत्तरप्रदेशातील सिकंदरा येथे मृत्यू झाला. विवेकानंद यांना आपल्या या शिष्याच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला त्यांचा जगभरातील प्रवास अविश्रांत परिश्रमामुळे त्यांचे शरीर थकत चालले होते. ४ जुलै १९०२ या दिवशी रात्री त्यांनी बेलूर मठात महासमाधी घेतली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.