अहमदनगरला कशाची जास्त गरज आहे? नामांतर की जिल्हा विभाजन ?
भूगोलात एक प्रश्न विचारला जातो, महाराष्ट्रातला क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता ? त्याचं उत्तर आहे अहमदनगर. पण सध्याच्या काळात जेंव्हा जेंव्हा अहमदनगरची चर्चा होते तेंव्हा तेंव्हा नगरच्या नामांतराचाच मुद्दा समोर येतो. भाजप आमदार गोपीचंद पडळकर अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर करण्याची मागणी करत आलेत तर शिवसेना नगरचं नाव अंबिकानगर करण्यात यावं, अशी मागणी करत आली आहे. नामांतरासोबतच जिल्ह्याच्या विभाजनचा मुद्दा पुन्हा पुढे आलाय. आता अहिल्यानगर नाव व्हावं कि अंबिकानगर? पण याही पलीकडे जाऊन अहमदनगरला कशाची जास्त गरज आहे? नामांतरची की जिल्हा विभाजनाची? याची चर्चा होणं जास्त महत्वाचं आहे.
आधी अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरचा मुद्दा काय ते क्लीअर करून घेऊ.
त्यासाठी अहमदनगरचं ‘अहमदनगर’ हे नाव नेमकं कुणामुळे पडलं याचा इतिहास पहायचा झाला तर,
अहमदनगर जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या शहराचा उल्लेख २४० इ.स. पूर्व काळात म्हणजेच मौर्य सम्राट अशोकाच्या काळातही आढळतो. मध्ययुगीन इतिहास लक्षात घेतला तर राष्ट्रकुट, चालुक्य आणि त्यानंतर दिल्ली यांनी या प्रदेशावर राज्य केलं. जेंव्हा दिल्लीचं वर्चस्व आलं तेव्हा अफगाण सैनिक अल्लाउद्दीन हसन गंगूने बंड पुकारलं आणि दख्खन प्रांतात बहामनी राज्याची स्थापना झाली.
पण पंधराव्या शतकाच्या अखेरीस बहामनी राजवटीत फूट पडली आणि इ.स. १४८६ मध्ये मलिक अहमद हा दख्खन प्रांतातल्या निजामशाह बहामनी सल्तनतीच्या पंतप्रधान या पदावर बसला. मलिक अहमद निजामशाह हा बहामनी राजाचा मंत्री असलेल्या निजाम उल-मुल्क भैरी यांचा मुलगा होता. मलिक अहमदने १४९४ मध्ये त्याने एक शहर वसवलं जे सीना नदीच्या किनाऱ्यावर होतं. या शहराला मलिक अहमदने स्वतःचं नाव दिलं जे होतं अहमदनगर.
आता थेट येऊ १७२५ मध्ये….
३१ मे १७२५ ला अहमदनगरच्या चौंडी या गावात माणकोजी शिंदे यांच्या पत्नीला कन्यारत्न झालं, त्या कन्या म्हणजे अहिल्याबाई. अहिल्याबाईंचं वयाच्या आठव्या वर्षी पेशवा बाजीरावांचे सेनापती असलेल्या मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव होळकरांशी लग्न झालं.
१७५४ मध्ये भरतपूरच्या राजाविरोधात लढाई लढत असताना खंडेराव होळकरांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंनी मावळ प्रांतावर ताबा मिळवला. अहिल्याबाई होळकर या शासक असतांना त्यांनी हिंदू मंदिरांचा जिर्णोद्धार करण्याच्या भूमिकेवर भर दिला.
होळकरांची राजवट ३० वर्षे होती. अहिल्याबाई होळकर या महान शिवभक्त म्हणून जशा ओळखल्या गेल्या तशाच एक उत्तम शासक आणि संघटक म्हणूनही ओळखल्या गेल्या म्हणून त्यांचं नाव अहमदनगरला देण्यात यावं अशी मागणी सुरु झाली.
आता येऊ अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाच्या मुद्द्यावर,
राज्यातील क्षेत्रफळाच्यादृष्टीने सर्वांत मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करण्याचा विषय मागील बऱ्याच वर्षांपासून चर्चेत असतो. संगमनेर, श्रीरामपूर आणि कोपरगाव या तीन तोडीसतोड ठिकाणांहून मुख्यालयाची मागणी होते आहे. मात्र, मध्यवर्ती ठिकाण आणि अलीकडच्या काळात शिर्डी या गावाचे वाढलेले महत्त्व पाहता शिर्डीलादेखील मुख्यालय करण्याविषयी अधूनमधून चर्चा होत असते.
विभाजनासाठी राजकीय प्रयत्न झालेत का ?
तर २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये नवे जिल्हे आणि तालुके निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीत वित्त, महसूल, नियोजन विभागाचे सचिव, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त होते.
या समितीने २२ नवे जिल्हे आणि ४९ नवे तालुके निर्मितीचा प्रस्ताव दिला होता. या समितीने लोकसंख्या आणि क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या जिल्ह्यांचं त्रिभाजन करण्याची शिफारसही केल्याचं सांगितलं जातं.
मोठ्या जिल्ह्यांचं विभाजन आणि त्रिभाजन करण्याचा प्रस्तावच मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील समितीने ठेवला होता आणि त्यात अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर असे तीन जिल्हे निर्माण करण्याची शिफारस समितीने केल्याचं सांगितलं जातं.
पण नगर जिल्ह्याचे विभाजन अथवा त्रिभाजन झाल्यास कोणत्या गावांना तालुक्याचा दर्जा मिळू शकतो ?
नगरचं त्रिभाजन झाल्यास शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर असे ३ जिल्हे निर्मितीची शिफारस होत आहे. त्रिभाजन झाल्यास श्रीरामपूरमध्ये बेलापूर, टाकळीभान, राहात्यात पुणतांबा, कोल्हार, राहुरीत देवळाली, वांबोरी, अकोलेत राजूर, कोतूळ, संगमनेरात तळेगाव, साकूर, नेवाशात सोनई, कुकाणा आणि कोपरगावात संवत्सर, पोहेगाव या नवीन तालुक्यांची निर्मिती होऊ शकते. यापूर्वी अनेकदा या गावांतल्या ग्रामस्थांनी तालुका निर्मितीची मागणी केलेली आहे.
अहमदनगरला कशाची जास्त गरज आहे? नामांतराची की जिल्हा विभाजनाची ?
या चर्चेत जिल्हा विभाजनाची गरज का आहे यावर चर्चा करायची झाली तर,
आधी अहमदनगरचं भौगोलिक महत्व बघायला लागेल –
अहमदनगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ १७,०४८ चौ.कि.मी.इतकं आहे. तर ४५,४३,१५९ इतकी लोकसंख्या आहे. तेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे जिल्हयाची तुलना करायची झाली तर पुण्याचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. किमी आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्रफळानुसार राज्यात पहिला क्रमांक नगरचा तर दुसरा क्रमांक पुण्याचा लागतो. दोन्ही जिह्याच्या तुलनेत पुण्याबरोबरच नगरचे विभाजन होणं महत्वाचं आहे.
नगर जिल्ह्यातली उपलब्ध संसाधने, कृषी क्षेत्रातील प्रगती, पाण्याची उपलब्धता व व्यवस्थापनातून जिल्ह्याची बाजारपेठ समृध्द आहे. मुख्य म्हणजे सहकारासाठी ओळखला जाणारा जिल्हा त्यातून झालेली आर्थिक प्रगती, शिक्षण, आरोग्य विषयक बाबींची महानगरांच्या धर्तीवरील उपलब्धता, सामाजिक व राजकीयदृष्टया नगर जिल्हा वैभवशाली आहे.
पण क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगरला प्रशासकीय अडचणी येतात.
१९८७ च्या सुमारास संगमनेर मध्ये सुरु होणारे उपप्रादेशिक कार्यालय तांत्रिक कारणांमुळं आणि जागेची उपलब्धता नसल्यामुळे बारगळले होते. आता तरी ही मागणी प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे.
याबाबत आवश्यकता वाटल्यास शासन धोरणात बदल करण्याची तयारी राज्य शासनाने दाखवायला हवी.
नगर तालुक्याची वाढती लोकसंख्या पाहता विभाजन, व्यवस्थापन गरजेचं आहे.
यात संगमनेर ला जिल्हा करावं या मागणी कृती समितीने आंदोलनाच्या माध्यमातून संगमनेर मुख्यालयाची मागणी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पर्यंत हा विषय कृती समितीने पोहचवला होता.
नगर शहरातील वैभवशाली मध्यवर्ती बसस्थानक, आगामी रेल्वेमार्ग, भव्य न्यायालय, प्रशासकिय भवन, प्रशस्त रस्ते या सुविधा पाहता जिल्ह्यात विभाजन होण्यास योग्य असल्याचं वाटतं.
प्रशासकीय अडचण अशी होतेय की, सर्वाधिक वाहन संख्या असलेले संगमनेर जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. सध्या श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कामकाजासाठी संगमनेर व अकोले पासून दूर असल्यामुळे नगरकरांना गैरसोयीचे आहे. त्यामुळे संगमनेरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यासाठी प्रयत्न केले गेले. जिल्ह्याच्या विभाजनावरून आणि नव्या नामांतरावरून शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडी आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाच भिडू :
- तुम्ही समृद्धी महामार्गावरून जाताय का ? त्या आधी मार्गावर येणाऱ्या अडचणी माहित करून घ्या
- अघळपघळ अहमदनगरची २१ वैशिष्टै माहित आहेत का..?