अक्खा गावंच ढिगाऱ्याखाली , इर्शाळवाडीत नेमकं काय घडलंय ?

कोकणात पावसामुळे हाहाकार उडालाय. अशातच रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी हे गाव झोपलेलं असताना अचानकपणे काल रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून 120 ते 130 लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्यरात्रीपासूनच बचावकार्याला सुरुवात झाली होती मात्र मुसळधार पावसाने आणि अंधार असल्याने बचावकार्य थांबवण्यात आलेलं. सकाळ उजाडताच बचावकार्य पुन्हा सुरु झालं.

यात आतापर्यंत 75 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे तर दुर्दैवाने १० जणांचा मृतदेह मिळालाय..

कोकणात काल मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसात डोंगराचा एक कडा पायथ्याशी असलेल्या गावावर कोसळला आणि काही क्षणात हे गाव ढिगाऱ्याखाली गडप झालं. काल रात्रीपर्यंत इथं एक वाडी होती आज हा मातीचा ढिगारा बनलाय. जीवाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या मुख्यमंत्री शिंदेंनी इर्शाळवाडी हे गाव दरडग्रस्त यादीत येत नव्हतं हे स्पष्ट केलं. मग हि घटना कशी घडली, कधी घडली ? या गावात काय संकट आलं? मदतकार्य कुठवर आलं ? याचीच  माहिती घेऊयात.

मुंबई-पुणे जुना महामार्गावरुन जात असताना कर्जत आणि पनवेलच्या मधोमध इर्शाळगडला जाण्यासाठीचा रस्ता आहे. 

इर्शाळगड हा रायगडमधील प्रसिद्ध ट्रेकिंग पॉईंट आहे. खालापूरजवळून मोरबे डॅम मार्गे या गावाकडे जाण्याचा रस्ता आहे. या इरसाल गडाच्या पायथ्याशी इर्शाळवाडी हे एक छोटंसं गाव आहे. इथे ठाकूर समाजाची घरं आहेत म्हणून या वस्तीला ठाकूरवाडी म्हणून ओळखलं जातं. डोंगराच्या उतारावर असलेल्या या गावावर काल रात्रीच्या पावसामुळे इर्शाळगड खडकाचा काही भाग कोसळला.  

WhatsApp Image 2023 07 20 at 10.16.30

बुधवारी रात्री ११.३० ते १२ च्या दरम्यान हि दरड कोसळल्याची घटना घडली. रात्री नेमकं काय घडलं यासंदर्भात एका प्रत्यक्षदर्शीनं माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे कि, 

“हे रात्री ११ वाजता अचानक घडलं. शाळेतली काही मुलं मोबाईलवर व्हिडीओ बघत होती. त्यांना वरून येणाऱ्या दगडांचा आवाज आला. त्यांनी आरडाओरडा केला तेव्हा गावातल्या लोकांना माहिती झालं”,

 अशी माहिती या प्रत्यक्षदर्शीनं दिली.“जेव्हा या मुलांनी आरडाओरडा केला, तेव्हा जेवढे वाचायचे तेवढे वाचले. बाकी सगळे ढिगाऱ्याखाली गेले”. 

WhatsApp Image 2023 07 20 at 10.16.31

 

 

नेमकं याच सुमारास मासेमारी करून या गावातील काही लोक घरी जात होते. 11 वाजता डोंगराचा काही भाग खचत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आरडाओरड केल्यानं गावातल्या लोकांना दरड कोसळल्याची माहिती मिळाली आणि तेव्हा अनेक गावकरी घरातून बाहेर आले मात्र काहीच मिनिटात हि घटना घडल्याने 30 ते 40 घरं या मातीच्या आणि खडकाच्या ढिगाऱ्याखाली अडकले. लागलीच गावातील  सरपंच आणि काही गावकरी घटना स्थळी पोहचले. त्यांनी स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. 

दरड कोसळल्याची माहिती मिळताच साडे १२ च्या सुमारास स्थानिक पोलीस, ऍम्ब्युलन्स, इतर प्रशासन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोनच्या सुमारास स्थानिक आमदार महेश बालदी, मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी पोहचले. पावणे तीन च्या सुमारास एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी पोहचल्या आणि बचावकार्यास सुरुवात करण्यात आलं. 

त्याआधी स्थानिक लोकं आणि उपस्थित असलेले प्रशासनाचे काही कर्मचारी लोकांना बाहेर काढण्याचं काम करतच होते. रात्रभर अंधार आणि संततधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. त्यात पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू टीम वर जात असताना एका अग्निशमन दलाच्या एका जवानाचा दम लागल्यानं मृत्यू झाला. 

WhatsApp Image 2023 07 20 at 10.16.32

येणाऱ्या धोक्यांमुळे बचावकार्य थांबवण्यात आलं होतं. सकाळी पुन्हा सुरु करण्यात आलं. पण या बचावकार्यात अनेक आव्हानं येत आहेत कारण एक तर हे इर्शाळवाडी गाव इर्शाळगडाच्या पायथ्यापासून खूप उंचीवर आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही. पायथ्यापासून ठाकूरवाडीपर्यंत जाण्यासाठी एक पायवाट आहे तीही पूर्ण चिखलात गेलीय, या पायवाटेतुन बचावपथकांना जावं लागत आहे.

हे तासभराचं अंतर आहे. इतकंच नाही तर पक्का रस्ता नसल्यामुळे जेसीबी, पोकलेन सारखी मोठी यंत्रे घटनास्थळी नेता येत नसल्यामुळे बचाव पथकाचे सदस्य अक्षरश: कुदळ, फावड्यासारख्या हत्यारांच्या मदतीनेच ढिगारे उपसत आहेत. त्यात मुसळधार पावसामुळे अजूनही डोंगरावरची माती घसरतेय त्यामुळे डोंगराळ भागात अजूनही भूस्खलन होतंय त्याचाही धोका आहेच. आता मदतकार्य काय सुरु आहे याबाबत माहिती अशी मिळतेय कि, मदतीसाठी इर्शाळवाडी गावातच पोलिस कंट्रोल रुम बनवण्यात आले आहे. 

मदतीसाठी 8108195554 या क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी 7.30 वाजता इर्शाळवाडी गावात दाखल झालेत. त्यांनतर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत 80 लोकांना बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आलेलं मात्र दुर्दैवाने ५ जणांचा मृतदेह काढण्यात आले. सोबतच दोन हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदतकार्य करण्यात येईल, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मदतकार्यासाठी हेलिकॉप्टर सज्ज आहेत परंतु पावसाच्या स्थितीमुळे आणि दाट धुक्यांमुळे हेलिकॉप्टर चालवण्यास अडथळा येतोय. वायु दलाशी बोलून लवकरच मार्ग काढला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

 

 मुख्यमंत्री शिंदेनी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून जाहीर केली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल अशी माहिती दिली आहे, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आपत्कालिन नियंत्रण कक्षावर नजर ठेवून आहेत, अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत. 

आतापर्यंत 80 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे तर अजूनही 70 ते 80 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. 

WhatsApp Image 2023 07 20 at 10.16.34

जखमी झालेल्या नागरिकांवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे उपचारांचा फॉलोअप घेतायेत. तर दुर्घटनास्थळी मोफत शीवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा घेतला आहे.जो पर्यंत परिस्थिती पूर्व पदावर येत नाही तो पर्यंत हा पुरवठा सुरूच राहणार आहे, प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. घटना मोठी असल्यामुळे आणि बाधितांना वाचाविण्याकरिता मदतकार्य युद्धपातळीवर व्हावी याकरीता आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ह्यांनी जमेल त्या सर्व संस्थांना मदतीसाठी आवाहन केले…

हे ही वाच भिडू :

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.