व्हायरल व्हिडीओ, मुलींचा आत्महत्येचा प्रयत्न ; चंदीगड युनिव्हर्सिटीचं संपूर्ण प्रकरण काय

सध्या देशभरात चंदीगड युनिव्हर्सिटीत सुरु असलेल्या आंदोलनाचा विषय चर्चेत आहे. चंदीगड विद्यापीठात मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि विद्यार्थिनी रस्त्यावर उतरलेत. विद्यापीठातल्या काही मुलींचे खाजगी व्हिडीओ एका विद्यार्थीनीनंच ऑनलाईन लीक केल्याचा प्रकार घडला आहे, याच्याच विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं असून चंदिगढमधलं वातावरण चांगलंच तापलंय.

मात्र या सगळ्यात विद्यार्थीनींकडून काय दावा करण्यात येतोय ? विद्यापीठ प्रशासन आणि पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे ? तेच जाणून घेऊयात.

शनिवारी रात्री विद्यापीठाच्या आवारात शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी जमा झाले. त्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलन करायला सुरुवात केली. यामागचं कारण सांगण्यात आलं की, कॉलेजमधल्याच एका मुलीनं विद्यापीठातल्या ६० मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट केले आणि आपल्या शिमल्यामधल्या मित्राला पाठवले. या मित्राकडून ते व्हिडीओ व्हायरल करण्यात आले.

हे सगळं समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या विद्यार्थिनीला ताब्यात घेतलं. सोबतच या विद्यार्थिनीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात हॉस्टेलच्या वॉर्डन तिला या सगळ्या प्रकरणाचा जाब विचारत आहेत. या व्हिडीओत ती विद्यार्थिनी आपल्या कृत्याची कबुली देत असल्याचंही दिसतं.

पण हे प्रकरण तापलं आत्महत्येच्या बातमीमुळं

आपले व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या भीतीनं एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याच्या बातम्या आल्या, तर आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचंही सांगण्यात आलं. मात्र पोलिसांनी आणि विद्यापीठ प्रशासनानं यात तथ्य नसल्याचं सांगितलं. मात्र विद्यापीठाच्या आवारात ऍम्ब्युलन्स आल्यानं या अफवांना आणखी जोर चढला.

पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्ष मनीषा गुलाटी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे…

‘हे प्रकरण अत्यंत गंभीर असून तपासही सुरू आहे. मला सगळ्या पालकांना सांगायचं आहे की, एकाही दोषी व्यक्तीची सुटका होणार नाही. आंदोलनाच्या वेळी काही विद्यार्थिनींना भीतीमुळे त्रास झाला, त्यामुळेच विद्यापीठाच्या आवारात ऍम्ब्युलन्स आल्या होत्या. आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न अशी कुठलीही घटना घडलेली नाही.’ अशी माहिती त्यांनी दिली.

मात्र या सगळ्या प्रकरणाला वेगळंच मिळतंय, ते मोहालीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक विवेक सोनी यांच्या वक्तव्यामुळं

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक विवेक सोनी यांनी पत्रकार परिषदेत वेगळेच खुलासे केले. ते म्हणाले, “आमच्याकडे जो व्हिडीओ आहे, त्याची आम्ही फॉरेन्सिक तपासणी करत आहोत. आतापर्यंतच्या तपासातुन मिळालेल्या माहितीनुसार ही गोष्ट स्पष्ट आहे की, अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचं सांगण्यात येतं असलं, तरी जिला ताब्यात घेतलं आहे, त्या एकाच मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तिच्या शिवाय इतर कुणाचाही व्हिडीओ नाहीये.

तिनं आणखी कुणाचे व्हिडीओ रेकॉर्डही केलेले नाहीत. इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि मोबाईलही ताब्यात घेण्यात आले आहेत, त्यांचा फॉरेन्सिक तपास सुरू आहे.” 

“काही विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या बातम्या येतात आहेत, त्या पूर्णपणे अफवा आहेत. कुणीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला नाही, एका विद्यार्थिनीला भीतीमुळे त्रास झाला. त्यामुळं तिला ऍम्ब्युलन्समधून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, आमची टीम तिच्या संपर्कात आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये.”

त्यामुळं ६० विद्यार्थिनींचे व्हिडीओ लीक झाल्याच्या बातम्या येत असताना, वरिष्ठ पोलीस अधीक्षक मात्र त्या मुलीनं कुणाचाही व्हिडीओ काढला असा दावा करत आहेत. साहजिकच त्यांच्या तपासात नेमकं काय समोर येतं हे महत्त्वाचं ठरणार आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाब मधल्या विरोधी पक्षांनीही या घटनेचा निषेध केला आहे. मुख्यमंत्री मान यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल अशी हमी दिली आहे.

मात्र सध्यातरी या मुलीनं नेमके किती जणींचे व्हिडीओ काढले आहेत ? हे व्हिडीओ नक्की कुणाला पाठवले आहेत ? आणि चंदीगड युनिव्हर्सिटीत नेमकं काय घडतंय ? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.