संजय गांधींचा मृत्यू झाला होता आणि इंदिरा गांधी आसामचा प्रश्न सोडवत होत्या

१९८० चे वर्ष. ७ व्या लोकसभेचा निकाल लागून नुकत्याच इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या होत्या. पण यामागचे खरे हिरो होते त्याचे पुत्र संजय गांधी. पक्षाच्या तिकीट वाटपापासून ते प्रचारपर्यंतची सगळी जबाबदारी त्यांनीच पार पडली होती.

युवा नेत्यांना संधी देऊन राजकारणात आणले होते. ते स्वतः अमेठीमधून ५० टक्क्यांपेक्षा जास्त मताने निवडून आले होते.

पुढे त्यांच्याच सल्ल्यावरून इंदिरांनी विरोधी पक्ष सत्तेत असलेल्या विधानसभा बरखास्त केल्या. आणि त्यापैकी ८ राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाची सरकार पुन्हा सत्तेत आली होती. ४ ते ८ जून १९८० या काळात एकापाठोपाठ एक काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. या सगळ्यांच्या निवडीतही त्यांचाच शब्द अंतिम होता. संघटनेवरील याच मजबूत पकडीमुळे त्यांना काँग्रेसचे महासचिव बनविण्यात आले होते.

ते जसे एक निष्णात राजकारणी बनले होते तसेच ते वेल ट्रेन पायलट ही होते.

१९७६ मध्ये त्यांना कमी वजनाची विमाने उडविण्याचा परवाना मिळाला होता. आणीबाणी नंतर मोरारजी देसाई सरकारने त्यांचा हा परवाना रद्द केला होता. मात्र इंदिरा गांधी सत्तेत आल्यावर संजय गांधींना हा परवाना पुन्हा मिळाला.

मे १९८० मध्ये इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी संजय यांच्यासाठी ‘पिट्स एस २ए ‘ विमान भारतात आणले. या विमानाची जोडणी दिल्लीच्या सफदरजंग विमानतळावर करून दिल्लीच्या फ्लाईंग क्लबला सोपविण्यात आले होते.

संजय गांधी यांना त्याचवेळी या विमानाची चाचणी करायची होती. पण सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना याची परवानगी मिळाली नाही.

२० जून १९८० रोजी फ्लाईट इन्स्ट्रक्टरने विमानाचे यशस्वी उड्डाण केले.

त्यानंतर २१ जून रोजी संजय यांनी पहिल्यांदा हे विमान उडवले. २२ जून रोजी त्यांनी पत्नी मनेका गांधी, आई इंदिरा गांधी, आर. के. धवन आणि धीरेंद्र ब्रह्मचारी यांना घेऊन जवळपास ४० मिनिटे उड्डाण केले. २३ जून १९८० रोजी सकाळी ८ च्या दरम्यान दिल्लीच्या फ्लाईंग क्लबचे चीफ इन्स्ट्रक्टर आणि त्यांचे सहवैमानिक सुभाष सक्सेना यांच्यासह हवेत उड्डाण केले.

पण २० मिनिटांच्या आतच हवेत तीनदा सूर मारल्यानंतर चौथा मारताना संजय यांचा यांचा विमानावरील ताबा सुटला आणि पंतप्रधानाच्या घराजवळीच एका झाडावर कोसळले.

इंदिरा यांना हा प्रचंड धक्का होता. ‘हवाई कसरती जपून कर’ हि आईने वारंवार केलेली विनवणी व्यर्थ ठरली. त्यांच्या विमान अपघातावर अनेक तर्कवितर्क मांडण्यात आले. पण त्यातील कोणताही खोटा ठरला नाही.

कारण संजय गांधी विमान असे चालवायचे, की कुणी रस्त्यावर कार चालवत आहे. सांगणारे असही सांगतात की, संजय गांधी विमान चालवताना साधे शूज घालायचे देखील कष्ट घ्यायचे नाहीत आपली कोल्हापूरी चप्पल घालूनच ते कार चालवल्याप्रमाणे विमान चालवायचे. 

यानंतर पंतप्रधानाचे सांत्वन करण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी आणि चंद्रशेखर लगोलग  राममनोहर लोहिया रुग्णालयात पोहचले. तेव्हा डोळ्यांवर गॉगल लावून त्या एकट्याच उभ्या होत्या.

त्यांना असे अस्वस्थ झालेले पाहून वाजपेयी त्यांच्या जवळ गेले आणि म्हणाले, 

इंदिराजी, या प्रसंगात तुम्हाला खूप धीर धरावा लागेल…’ इंदिराजी मूक राहिल्या. पण त्यांनी वाजपेयींकडे एक दृष्टिक्षेप टाकला. ‘वाजपेयीजी हे काय सांगायला हवे का..’ अशा अर्थाची ती नजर होती. त्यांचा तो धीर पाहून वाजपेयी चकित झाले.

यानंतर इंदिरा शेजारीच उभ्या असलेल्या चंद्रशेखर यांच्याकडे वळल्या आणि म्हणाल्या, ‘बरेच दिवस झाले मला तुमच्याशी आसामबद्दल बोलायचे होते…’ (आसामी विद्यार्थ्यांचे बांग्लादेशी घुसखोरांच्या विरोधातील आंदोलन तेव्हा मोठ्या प्रमाणावर चालू होते). त्यांना थांबवत चंद्रशेखर पुन्हा म्हणाले, ते आपण नंतर बोलूया…’ त्यावरही इंदिरा म्हणाल्या

“नाही, नाही, आसामची बाब अत्यंत तातडीची आहे.

पलीकडच्या  दालनात आपल्या ३३ वर्षाच्या मुलाचा मृतदेह टाके टाकून शिवला जात असताना एखादी आई असे बोलू कसे शकते? याचे या दोघांना नवल वाटले.

त्यादिवशी सायंकाळी वाजपेयी या वर्तनाचा अर्थ लावताना म्हणाले,

ही महिला हर्षखेदाच्या पलीकडे गेलेली असावी किंवा पाषाणहृदयी स्त्री असावी किंवा तिसरी शक्यता म्हणजे अपार व्यक्तिगत शोकाच्या क्षणीही देशाच्या प्रश्नांचा आपल्याला विसर पडलेला नाही हे त्यांना दाखवून द्यायचं असावे…

काही क्षण वाजपेयी पुन्हा थांबले, अन् पुन्हा म्हणाले, मला वाटते, इंदिराजींना स्वतःची देशप्रश्नांची चिंता सर्वाना दाखवून द्यायची असावी. त्यांच्या स्वभावाची ठेवणच तशी आहे.

त्यानंतर ते वाजपेयी संजय गांधी यांच्या अंतयात्रेतही सहभागी झाले. ते म्हणाले, राष्ट्रीय राजकारणाच्या रंगमंचावर संजय एखाद्या धुमकेतूप्रमाणे चमकले. तो असतो तेजस्वी, पण त्याचे येणे-जाणे अकस्मात असते.

पुढे संजय यांचा लाल कापडात आणि गुलाबाच्या फुलांतील मृतदेह पाहिल्यानंतर भारताच्या आयर्नलेडी समजल्या जाणाऱ्या इंदिरांना मुलाच्या पार्थिवावर डोकं ठेवून हमसून – हमसून रडताना उभ्या देशाने पहिले होते.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.