भारतात पंचायतीच्या निवडणुका सुरु करणारा नेता दुर्दैवाने पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झाला.

देश १९४७ साली स्वतंत्र झाला. आपण लोकशाही स्वीकारली होती. आपला देश भविष्यात कसा चालवला जाईल त्याचे कायदे काय असतील यासाठी संविधान सभा भरली.

अनेक चर्चा वाद यातून संविधान जन्माला आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकहाती घटनेचा मसुदा बनवला होता. २६ जानेवारी १९५० रोजी भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला.

भारताने संसदीय लोकशाही स्वीकारली होती. १९५१ साली पहिल्या निवडणुका झाल्या. पण काही दिवसांनी लक्षात आले की शेवटच्या टोकापर्यंत ही लोकशाही पोहचली नाही. सत्ता घराणेशाही सरंजामशाही या वर्तुळातून बाहेर पडत नाही आहे. त्यावेळी गांधीजींची आठवण आली.

गांधीजी म्हणाले होते,

“आजादी नीचे से शुरू होनी चाहिए। सच्चे प्रजातंत्र में नीचे से नीचे और ऊंचे से ऊंचे आदमी को समान अवसर मिलने चाहिए। इसलिए सच्ची लोकशाही केंद्र में बैठे हुए दस-बीस आदमी नहीं चला सकते, वह तो नीचे से हरेक गांव के लोगों द्वारा चलाई जानी चाहिए।”

आपल्या इथे खेडोपाड्यात पूर्वापार पंचायत व्यवस्था होती. या व्यवस्थेमध्ये काही दोष देखील होते पण हे दोष बाजूला करून पंचायती मध्ये लोकशाही पोहचवता आली तर त्याचा फायदा व्यवस्थेच्या उतरंडीमध्ये शेवटला असणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचवता येईल हे गांधीजींचे मत होते. हेच गांधीजींचे स्वप्न पुरे करण्याची जबाबदारी नेहरूंनी गांधीजींच्या शिष्यावर म्हणजेच बलवंतराय मेहता यांच्यावर दिली,

बलवंतराय मेहता हे गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल यांचे खंदे समर्थक होते. स्वातंत्र्यलढ्यात बारडोलीच्या सत्याग्रहावेळी त्यांचे नेतृत्व पुढे आले होते. गांधीजीच्या वाटेवरून जात असताना त्यांना अनेकदा जेल मध्ये जावे लागले पण ते मागे हटले नाहीत. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसच्या पक्षाच्या बांधणीसाठी बलवंतराय मेहता यांच मोठ योगदान राहील होत.

१९५७ साली बलवंतराय मेहता यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या अभ्यास गटाने पंचायत राज्याची दिशा आणि रचनेच्या दूरगामी व अमुलाग्र बदलासाठी शिफारशी केल्या. आणि प्रथमच लोकशाही विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने पंचायत राज्याची संकल्पना मांडण्यात आली. राष्ट्रीय विकास मंडळाने या शिफारसी स्वीकारल्या.

गांधीजीचे स्वप्न पुरे करण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले.

पुढे बलवंतराय मेहता हे १९६३ साली गुजरात राज्याचे दुसरे मुख्यमंत्री बनले. त्यांनी त्याकाळात घेतलेले अनेक निर्णय गुजरातच्या विकासासाठी कारणीभूत ठरले. सर्व थरातल्या जनतेला आपला वाटणारा हा नेता, यांचा अंत मात्र एका दुर्दैवी अपघातामध्ये झाला.

१९ सप्टेंबर १९६५ मुख्यमंत्री बलवंतराय मेहता राज्याच्या दौर्यावर होते. मिठापूर इथे असलेल्या टाटा कंपनीच्या केमिकल कारखान्याची पाहणी केल्यावर मेहता बिचक्राफ्ट या विमानातून पाकिस्तान सिमेलगत असणाऱ्या कच्छ प्रांताकडे निघाले. १९६५ सालचं भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील युद्ध ऐन भरत होत.    

अचानक एक पाकिस्तानी लढाऊ विमान मुख्यमंत्र्यांच्या विमानाच्या टप्प्यात आले. कैस हुसेन नावाचा नुकताच पाकिस्तानी हवाई दलात सामील झालेला पायलट ते विमान चालवत होता. त्याला ठाऊक नव्हते की समोरच्या विमानात कोण आहे. त्याने हेडक्वार्टरला संदेश पाठवला, एक भारतीय विमान माझ्या टप्प्यात आले आहे.

दरम्यान बलवंतराय यांच्या वैमानिकाने त्या विमानापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य नव्हते. त्यांनी आपल्या विमानाचा पंखा हलवून सुटकेचा शेवटचा प्रयत्न केला पण हुसेनने त्याकडे दुर्लक्ष केले. काहीच वेळात त्याला वरिष्ठांचा संदेश मिळाला.

“फायर”

त्याच क्षणात त्याने बलवंतराय यांच्या विमानावर हल्ला केला आणि प्रतिकार करण्याची सुविधा नसल्यामुळे काहीच मिनिटात ते विमान भूज जवळ जमीनदोस्त झाले. परत आपल्या तळावर गेल्यावर हुसेनने आपण आज एका भारतीय विमानाची शिकार केल्याची बातमी आपल्या सहकाऱ्याना सांगितली. त्यांनी त्याची पाठ थोपटली. हवाई कॅम्पवर जल्लोष करण्यात आला.

पण काही वेळाने रेडीओवर बातमी कळाली की हुसेनने हल्ला करून पाडलेल्या विमानात गुजरातचे मुख्यमंत्री बलवंतराय मेहता, त्यांची पत्नी आणि काही स्टाफ मेम्बर आणि दोन पायलट हे मृत्यूमुखी पडले. कैस हुसेन याच्यासाठी हा मोठा धक्का होता. आपल्या हातून खूप मोठी गुस्ताखी झाली आहे हे त्याला ठाऊक होते पण आता काहीच करता येत नव्हते.

qais 543

या युद्धानंतर दोनच वर्षात त्याने पाकिस्तान हवाई दलाचा राजीनामा दिला. पण पुढे अनेक वर्ष तो आपल्या चुकीच्या पश्चातापाचे ओझे वाहात राहिला. अखेर ऑगस्ट २०११ साली म्हणजेच त्या घटनेच्या ४६ वर्षांनी त्या विमानाच्या पायलटच्या मुलीला पत्र लिहून माफी मागितली.

“युद्धामधील हुकुमाचे पालन करणे एवढेच माझ्या हातात होते. तरीही जे घडले त्याची जबाबदारी माझीच आहे आणि त्याबद्दल मी आपली आणि इतर सात जणांच्या कुटुंबाची माफी मागतो. “

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.