मिडीयात हवा झालेल्या शिवभोजन केंद्रावर भेट दिल्यावर पाहिलं की लोक बोंबा मारतायत.

शिवभोजन थाळी. दहा रुपयात पोटभर जेवण.

शिवसेनेच्या जाहिरनाम्यात गरिबांना पोटभर जेवण फक्त दहा रुपयात मिळेल अशी तरतूद करण्यात आली. महाविकास आघाडीचे शासन आल्यानंतर कॉमन मिनीमम प्रोग्रॅम अंतर्गत दहा रुपयात थाळीची योजना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने मान्य केली आणि कालपासून राज्यभर शिवभोजन थाळीस सुरवात करण्यात आली.

माध्यमांमधून देखील या शिवभोजन थाळीबद्दल रखाने च्या रखाने छापून येवू लागले. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांचा फोटो शिवभोजन थाळीसोबत छापून आला. जितेंद्र आव्हाडांना दहा रुपयांच्या थाळीसोबत दहा ते पंधरा रुपयांची पाण्याची बाटली घेतली. सोशल मिडीयावरच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ट्रोल देखील केलं.

तिसरीकडे या संकल्पनेचे जनक असणाऱ्या शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंनी मर्सडिजमधून आलेल्या व्यक्तिला देखील शिवभोजन थाळीचा लाभ घेता येईल अस सांगितलं.

आत्ता इतकं सगळं चाललय म्हणल्यानंतर बोलभिडू कार्यकर्त्यांनी देखील या थाळीचा लाभ घ्यावा म्हणून आजचा दौरा पुणे महानगरपालिकेवर काढला.

पुण्यात सात ठिकाणी महाशिवभोजन थाळीचा लाभ घेता येणार असल्याची माहिती होती. त्यात महानगरपालिकेला आपल्यासाठी जवळची असल्याने तिथेच जावून प्रत्यक्षात काय चालू आहे हे पाहू म्हणून आमची स्वारी तिथे गेली.

महानगरपालिकेच्या जवळ निशिगंधा हॉटेलमध्ये शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे. आम्ही गेलो तेव्हा दूपारचे सव्वा एक वाजले होेते. बऱ्यापैकी गर्दी होती. स्वच्छता देखील होती. त्यामुळे सगळच छान छान आहे असं वाटलं. मोठ्या ॲटिट्यूडमध्ये आम्ही दहा रुपयांची नवी कोरी करकरीत नोट घेवून त्यांना दिली तर ते म्हणले थाळी साठ रुपयेला आहे. काकांचा काहीतरी गैरसमज झाला असेल म्हणून आम्ही शिवभोजन थाळीबद्दल चौकशी केली तर काका म्हणाले थाळी संपली. आत्ताची थाळी साठ रुपयेला.

च्या गावात ही तर रितसर गंडवागंडवी आहे. आम्ही परिपत्रक पाहिलं तर त्यावर लिहलेलं होतं की रोज फक्त दिडशे थाळी.

म्हणजे कोणत्याही केंद्रावर फक्त पहिल्या दिडशे थाळ्या या दहा रुपयेला मिळणार व त्यानंतरच्या थाळ्या या हॉटेलच्या रेग्युलर किंमतीत म्हणजे साठ रुपयेला मिळणार. आत्ता हा प्रकार कुठे गंडलेला तर मुळात हॉटेलच्या बोर्डवर कुठेही मर्यादित १५० थाळी अस लिहण्यात आलेलं नव्हतं. १५० थाळी हा प्रकार शासनाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आला आहे. म्हणजे गरिब मजूराने कामासोबत परिपत्रक वाचून यायला हवे. इथे फक्त वेळ म्हणून १२ ते २ लिहण्यात आली होती. त्यामुळे अनेकजण निवांत सुट्टीत जेवण करू या विचाराने एक सव्वा एक नंतर येत होते तर त्यांना साठ रुपयांना थाळी खावी लागतं होती.

आत्ता दूसरा मुद्दा,

आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की मर्सडिजमधला माणूस देखील शिवभोजन थाळीचा लाभ घेवू शकतो.

प्रत्यक्षात मात्र आम्हाला एक PMT चे चालक भेटले. त्यांना थाळी नाकारण्यात आली होती. त्यांना अस कारण देण्यात आलं की थाळी गरीब व मजूर लोकांसाठी आहे. PMT चालकाचे म्हणणे होते की आज घरी डब्बा तयार नव्हता. सकाळी लवकर ड्युटीवर यायला लागलं. आमचा पण पगार कमीच आहे. हॉटेलमध्ये खाणं आम्हाला परवडतं नाही. म्हणून इथे आलो तर थाळी नाकारण्यात आली. त्याचं कारण PMT चालक असल्याने नाकरल्याचं सांगण्यात आलं.  त्यांनीच आम्हाला PMT वाल्यांना ही थाळी मिळणार नाही का असा प्रश्न केला. आत्ता परिपत्रकात तर तसं कुठेही लिहण्यात आलेलं नाही.

शिवाय आदित्य ठाकरे मर्सिडिजवाल्यांची गोष्ट सांगत आहेत पण इथे PMT चालकांना थाळी मिळाली नाही.

आत्ता आमचा मोर्चा उपहारगृहाच्या मालकांकडे वळला.

त्यांना विचारलं की काय भाऊ लोक लय तक्रारी करतेत. काय भानगड. तर ते म्हणले हे बघा, आम्हाला दिडशे थाळ्यांचा अनुदान येतय. दिडशे थाळ्या काय जाग्यावर संपतेत. त्यानंतर आम्ही आमच्या किंमतीत थाळी विकतोय. झालय काय शासनाने अनुदान वाढवायला पाहीजे. तिनशे थाळ्या ठेवल्या तर किमान लोकांना १० रुपयात जेवण मिळेल. त्यात त्यांनी दूसरा मॅटर सांगितला. ते म्हणले महानगरपालिकेच्या जवळ असल्याने इथे गर्दी जास्त असते. लोक जास्त येणार त्यामुळे थाळ्या लवकर संपणार. पण दूसऱ्या एखाद्या कमी गर्दीच्या ठिकाणी थाळ्या शिल्लक राहतील. मजूर अड्यांपासून ते बस स्थानक ठिकठिकाणी केंद्रांची संख्या वाढवली पाहीजे.

पण असो ही सुरवात असल्याने चार चांगले शब्द बोलायला पाहीजेत.

आत्ता जाता जाता एक अभ्यासू MPSC कार्यकर्त्यांच लॉजिक सांगतो त्यांने दावा केला की या थाळी भ्रष्टाचार होणाराय. आम्ही आमची एक भूवयी उडवून पठ्याला विचारलं कसकाय? तू नक्की MPSC करतो का BJP वाले तुला पैसे देतेत. काय असल ते सिद्ध कर. 

तर तो म्हणला,

हे जे हॉटेलवाले आहेत ते आपल्याला दहा रुपयात थाळी देतेत. सरकार त्यांना वरच्या ५० रुपयांच अनुदान देतय. म्हणजे हॉटेलवाल्यांना दहा रुपयाच्या थाळीचे साठ रुपयेच मिळतेत. आत्ता लोक आणि मिडीया काय करतेत तर, बघा बघा दहा रुपयात किती छान जेवण. पण त्या थाळीची किंमत साठ रुपयेच आहे न. साठ रुपायप्रमाणे ती थाळी दिली पाहीजे कनाय. तशी ती आहे का?

इथं हॉटेलवाले कट मारायला तयार आहेत. थोडक्यात भ्रष्ट्राचारास उत्तम संधी मिळू शकतेय.

नाय म्हणालया काकांच्या लॉजिकमध्ये दम होता. कारण थाळी तर साठ रुपयाची होती. साठ रुपयाची थाळी म्हणून बधितलं तर गंडल्यासारखं दिसतं. दहाची बघितली तर बरं वाटतं. पण प्रत्यक्ष किंमत साठ रुपये असल्याने त्याच चष्माने बघितलं पाहीजे.

असो आजचा दूसराचं दिवसं असल्याने शिवभोजन थाळीला चान्स दिला पाहीजे. फक्त ते आदित्य ठाकरे खोटं बोललेत का ते स्पष्ट करावं. कारण PMT चालकाबद्दल खरच वाईट वाटलं. बाकी सरकारला वेळ द्यावा या मताचे आम्ही देखील आहोत.

हे ही वाच भिडू. 

1 Comment
  1. योगेश गांधी says

    शिवभोजन थाळी जरी खाण्यासाठी असली तरी वर्तमान पत्रात रकाने असतात… चूक भूल द्यावी घ्यावी

Leave A Reply

Your email address will not be published.