लाल सिंग चढ्ढा असुद्या किंवा दुसरा कुठलाही, पिक्चर बॉयकॉट केल्यानंतर नुकसान कुणाचं होतं..?

सध्या सोशल मीडियावर एकाच शब्दाची चर्चा आहे, तो म्हणजे बॉयकॉट. एका गटाचं म्हणणं आहे की आमिर खानचा लाल सिंग चढ्ढा पिक्चर बघू नका, बॉयकॉट करा, तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की पिक्चर बघाच. साहजिकच लोकं आपापल्या आवडीनुसार आणि इच्छेनुसार निर्णय घेणार आणि त्यावर एक गोष्ट ठरणार की पिक्चर बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होणार की हिट. 

आता समजा लई लोकांनी एखादा पिक्चर बॉयकॉट केला, तर नेमकं नुकसान कुणाचं होतं ? एक पिक्चर बनवताना कोण कोणती लोकं इन्व्हॉल्व्ह असतात ? या फिल्म इंडस्ट्रीवाल्यांची इकॉनॉमी नेमकी चालते कशी ? या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात.

भारतीय फिल्म इंडस्ट्री ही जगातली सगळ्यात मोठी फिल्म इंडस्ट्री म्हणून ओळखली जाते. लाखो लोकांना यातून रोजगार मिळतो. एखादा पिक्चर काढायचा म्हणलं की त्याच्यात अनेक टप्पे असतात, सुरुवात होते स्क्रिप्ट रायटिंगपासून, त्यानंतर कलाकार, तंत्रज्ञ, सेट्स, लोकेशन यासारख्या गोष्टी नक्की होतात, मग होतं शूटिंग आणि त्यानंतर एडिटिंग, मार्केटिंग होतं आणि सगळ्यात शेवटी डिस्ट्रिब्युटर्सकडून पिक्चर्स थेटरात पोहोचतो. लय लॉंग जर्नी असते.

या सगळ्या लॉंग जर्नीमध्ये पैसा लावणारा माणूस असतो, प्रोड्युसर. 

पार स्क्रिप्ट रायटरपासून ते सेटवरच्या स्पॉट बॉयला पैसे देण्याचं काम हा प्रोड्युसर करतो. स्पॉट बॉयवरुन आठवलं, आपल्याला पिक्चरमधला पैसा म्हणला की, कोटीतले आकडे आणि ऍक्टर्स, डायरेक्टर, प्रोड्युसर्स हेच कार्यकर्ते आठवतात. पण एक पिक्चर बनण्यामध्ये सेटवरची कामं करणारे स्पॉटबॉय, कलाकारांचे स्पॉटबॉय, लाईटमन, सेट उभा करणारे कारागीर, स्टंट डबल्स, मेकअप आर्टिस्ट, जेवणापासून-व्हॅनिटी व्हॅन्स पुरवणारे भिडू, ड्रायव्हर्स अशा कित्येक पडद्यामागच्या लोकांचा महत्त्वाचा वाटा असतो.

तर हा आपण होतो प्रोड्युसर्सवर. 

मार्केटमधले मोठमोठे प्रॉडक्शन हाऊस पिक्चरवर पैसे लावतात. पिक्चरचं बजेट फार जास्त असेल, तर अनेक प्रोड्युसर्स एकत्र येतात. पिक्चरच्या मार्केटिंगची जबाबदारीही प्रॉडक्शन हाऊसचीच असते, आपल्याला रस्त्यावर दिसणारे बॅनर्स ते सोशल मीडियावर चालणारं एखादं कॅम्पेन सगळीकडे हे प्रॉडक्शन हाऊसवाले पैसा लावतात. 

त्यामुळं साहजिकच पिक्चरमधून होणाऱ्या प्रॉफिटवर सगळ्यात मोठा दावा त्यांचाच असतो, पण इथं महत्त्वाचा असतो प्रॉफिटचा पॅटर्न.

पिक्चरच्या प्री-प्रॉडक्शनपासून मार्केटिंगपर्यंत खर्चाचं गणित प्रॉडक्शन हाऊस उचलत असतंय, पण त्यानंतर किंगमेकर असतात, डिस्ट्रिब्युटर्स. प्रोड्युसर्स पिक्चर बनवून झाला की त्याचे हक्क डिस्ट्रिब्युटरला विकतात. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शननं पिक्चर बनवला की तो अनिल थंडानीच्या एए फिल्म्सकडे डिस्ट्रिब्युशनसाठी जातो. हे डिस्ट्रिब्युटर लोक पिक्चर थिएटर, टीव्ही आणि ओटीटीपर्यंत पोहचवतात. 

प्रोड्युसर्स आणि डिस्ट्रिब्युटर्समध्ये तीन प्रकारे डील होतं. 

पहिल्या प्रकारात डिस्ट्रिब्युटर पिक्चरच्या राईट्ससाठी एक ठराविक अमाऊंट प्रॉडक्शन हाऊसला देतं. त्यानंतर पिक्चर हिट झाला तर प्रॉफिटचा काही हिस्सा शेअर केला जातो. दुसरा प्रकार असतो कमिशन बेसिसचा, ज्यात डिस्ट्रिब्युशनचा पैसाही प्रॉडक्शन हाऊसच लावतं आणि प्रॉफिटचा काही हिस्सा डिस्ट्रिब्युटर्ससोबत शेअर होतो. तिसरं डील असतं, डिस्ट्रिब्युटरच्या रिस्कवर. पिक्चरमधून जो काही प्रॉफिट किंवा लॉस होईल तो सगळा डिस्ट्रिब्युटरच्या खात्यात.

डिस्ट्रिब्युटर पिक्चरच्या ओटीटी राईट्स, सॅटेलाईट राईट्स आणि ओव्हरसीज राईट्समधून पैसे कमावतात, पण त्यांचा उत्पन्नाचा सगळ्यात मुख्य मार्ग असतो तो म्हणजे थिएटरमध्ये होणारं बॉक्स ऑफिस कलेक्शन. 

आता हे बॉक्स ऑफिस कलेक्शन कसं मोजतात, याबाबत बोल भिडूनं आधीच लेख लिहिला आहे, जो तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन वाचू शकता.

झुंड असो किंवा पावनखिंड, पिक्चरच्या १००-२०० कोटी कमाईमागचं गणित असं असतंय

या बॉक्स ऑफिस कलेक्शनमधला काही शेअर हा टॅक्स म्हणून कट होतो, तर काही शेअर थिएटर मालकांना मिळतो. त्यानंतर डिस्ट्रिब्युटर्सला आणि करारानुसार प्रोड्युसर्सला प्रॉफिट मिळतो. ही सगळी होती, पिक्चरची इकॉनॉमी. 

आता मुद्दा येतो पिक्चर बॉयकॉट केला, की कुणाला फटका बसतो याचा?

लाल सिंग चढ्ढाला विरोध करणाऱ्यांपैकी अनेक जणांचा विरोध हा आमिर खानला आहे. पण बॉयकॉटचा सगळ्यात पहिला फटका बसेल, तो डिस्ट्रिब्युटर्स आणि थिएटर मालकांना. कारण डिस्ट्रिब्युटरनं रग्गड पैसे मोजत प्रोड्युसर्सकडून हक्क विकत घेतलेले असतात आणि थिएटर मालकांनीही पैसे कमवण्याच्या आशेनं पिक्चरचे शो थिएटरमध्ये लावलेले असतात.

जर पिक्चरला गर्दीच झाली नाही, तर या दोघांना नुकसान सहन करावं लागतं. ज्याचा फटका अगदी थिएटरमध्ये डोअरकिपर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीलाही बसू शकतो.

पण मग बॉयकॉट मोहिमेचा ऍक्टर लोकांना काहीच फरक पडत नाही का ? तर पडतो. गणित कसं असतंय बघा, काहीवेळा सुपरस्टार ऍक्टर्स ज्यांना आपल्या नावावर पिक्चर हिट होईल याची खात्री असते, ते अभिनय करण्याचे पैसे घेत नाहीत, तर पिक्चरमधून जो काही प्रॉफिट होईल त्यातला ठराविक शेअर मागतात. त्यामुळं समजा १०० कोटी प्रॉफिट झाला आणि ऍक्टरचा वाटा ५० टक्के ठरलेला असेल, तर ५० कोटी त्याला. पण जर पिक्चर चालला नाही, तर मात्र ऍक्टरला काहीच मिळणार नाही. 

सोबतच एखाद्या ठराविक ऍक्टरला सातत्यानं बॉयकॉट मोहिमेचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळं बाकी सगळ्यांचा कारभार गंडतोय म्हणल्यावर, लोकं त्याच्या किंवा तिच्यासोबत पिक्चर करायला उत्सुक नसतात. 

साहजिकच त्यांची मार्केटमधली डिमांड आणि मानधनाचा आकडा कमी होऊ शकतो. पण सुपरस्टार लोकांसाठी एखादा पिक्चर पडला किंवा पैसे नाही मिळाले आणि वाईट सेटबॅक बसलाय, असं क्वचित घडतं. हा फटका सोसावा लागतो, तो त्या ऍक्टरच्या टीमला. 

प्रत्येक ऍक्टरभोवती, स्वतःची स्पॉटबॉय, मेकअप बॉय अशी भरपूर मोठी टीम असते, त्यांचा उदरनिर्वाह इन्डायरेक्ट्ली ऍक्टरला मिळणाऱ्या कामावर अवलंबून असतो, त्यामुळं एखाद्या मोठ्या अभिनेता किंवा अभिनेत्रीला काम मिळालं नाही, तर त्याच्यासोबत सेटवर काम करणाऱ्यांनाही फटका बसतोच.

समजा ठराविक प्रॉडक्शन कंपनीला बॉयकॉटमुळं लॉस सहन करावा लागला, तर पुढच्या प्रोजेक्टवर त्याचे परिणाम दिसून येतात. 

ज्यामुळं अगदी लाईटमनपासून आर्ट डिरेक्टरपर्यंत कित्येकांचं नुकसान होतंच. त्यामुळं अनेकदा पिक्चर बॉयकॉट करताना टार्गेटवर अभिनेता किंवा अभिनेत्री असले, तरी त्यांच्यापेक्षा जास्त नुकसान प्रोड्युसर्स, डिस्ट्रिब्युटर्स, थिएटर मालक, सेटवर राबणारी माणसं आणि थेट सरकारलाही सोसावं लागतं. कारण पिक्चर हिट होऊन ५०० करोडची कमाई झाली, तर टॅक्सच्या रूपात सरकारच्या तिजोरीतही भर पडतेच. 

साहजिकच वर वर सोपा वाटणारा बॉयकॉटचा विषय डीप आहे तो सिनेमा व्यवसायावर अवलंबून असलेल्या बहुसंख्य सामान्य लोकांमुळेच.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.