कोण आई काढतय, तर कोण बाप…वेळ आलेय भाषेचा प्रोट्रोकॉल ठरवण्याची..

मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेत पडलेल्या दोन गटात मध्ये मोठ्या प्रमाणात वाद विवाद सुरु आहे.  दापोलीत शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टिका केली.

यावेळी रामदास कदम म्हणाले की, मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं किती वेळा सांगणार? काही संशय आहे का? आम्ही कधी नाही म्हटलं आहे का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही असं कधी कोणी म्हणाल्याचं ऐकलंय का? तुम्हाला बाळासाहेबांचं नाव का सांगावं लागतं? तुमचं काही कर्तृत्व आहे का? अशी विचारणा तर केली.

त्याच बरोबर त्यांनी या वादात रश्मी ठाकरे यांना सुद्धा वादात ओढले. आमच्या रश्मी वहिनी मंत्रिमंडळात कशा नाही आल्या याचं आश्चर्य वाटतं. कुठेही गेल्या तरी त्या सोबत हव्यातच. माँसाहेब कधी कोणत्या कार्यक्रमात गेल्या नाहीत, व्यासपीठावर चढल्या नाहीत, असं सुद्धा कदम म्हणाले.

यामुळे रामदास कदम यांच्यावर सर्व स्थरातून टिका करण्यात येत आहे. विरोधक असला तरीही त्याच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टिका न करण्याची भूमिका इथल्या नेत्यांची राहिली आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकारणात टिका करतांना, विरोध करतांना भाषेचा प्रोटोकॉल असायला हवा असे मत जाणकार, राजकारणी व्यक्त करत आहे. 

काही दिवसासापूर्वी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोल भिडूला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राजकारणात वापरण्यात येणाऱ्या भाषेबद्दल सगळ्या राजकीय पक्षांनी सोबत येऊन आचारसंहिता ठरवायला पाहिजे असं सांगितले होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, 

 महाराष्ट्रा ही संत महंतांची भूमी असूनसुद्धा राजकारणाचा अधःपतन होत असतांना सगळ्या नेत्यांनी एकत्र बसून महाराष्ट्रातल्या राजकारणाची आचारसंहिता लिहली पाहिजे. जर अशा प्रकारे आचारसंहिता लिहली नाही तर फार विचित्र होईल. यासाठी समाजाने दबाव आणायला हवा. कोण काय बोलत कोण काय बोलत हे चालणार नाही. 

कोण कोंबडी सोडत. कोंबड्या सोडणं ही काही राजकीय संस्कृती आहे का? हिंमत असेल तर समोरासमोर बोलायला हवं. आचारसंहिता लिहावी लागले. यासाठी लोकांचा रेटा निर्माण होईल. लोक म्हणतील तुम्ही जर निट वागला नाही तर मतदान करणार नाही.  

याबाबत बोलतांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास दादा पवार म्हणाले की,

राजकारणात असे अनेक रामदास झाले आहेत. ज्यांना वाट्टेल ते तसं बोलत आहेत. यांनी बोलण्याचा काहीच दर्जाच ठेवला नाही. राजकारणात आदर, सौजन्य ठेवलं जातं होत. पण आता इतक्या खालच्या स्थराला हे सगळं गेलं आहे की, यामुळे लोकशाहीच अवमूल्यन होत चाललं आहे.

खालच्या पातळीवर जाऊन टिका करणे चुकीचं आहे. जर महाराष्ट्राच्या एकूण राजकीय संस्कृतीला अशा प्रकारची टिका करणे शोभत नाही. महाराष्ट्राची एक परंपरा राहिली आहे. त्यात हे कुठेच हे बसत नाही. यापूर्वी देखील वाद झाले, नेत्यांनी पक्ष सोडले मात्र अशा प्रकारच्या भाषेचा वापर झाला नाही. सगळ्या राजकीय नेत्यांनी टिका करतांना तारतम्य बाळगायला हवे. विरोधकांनी जरूर टिका टिप्पणी करावी त्यात काहीच वावगं नाही. रामदास कदम यांचा विचार करायला गेलं तर शिवसेनेने त्यांना काय दिलं नाही. आमदार केलं, मंत्री केलं त्याच बरोबर विरोधीपक्षनेता सुद्धा होते. त्यांनी टिका करतांना विशेष काळजी घ्यायला हवी.  

याबाबत बोलतांना बोल भिडूशी कायदे तज्ञ् असीम सरोदे म्हणाले की,  

राजकारणात उद्धट आणि गुंड प्रवृत्तीचे लोक मोठ्या प्रमाणात आले आहेत. त्यामुळे अशी भाषा वापरली तरी चालते असा समज झाला आहे. यावर नागरिकांनी आक्षेप घ्यायला हवा. अशा प्रकारे खालची भाषा कुठला राजकीय नेता वापर असेल ते अत्यंत चुकीचे आहे.

यात एका स्त्रीचा अपमान करतोय हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे आपल्या विरोधात जे कोणी आहेत त्यांच्या आई बहिणी विरोधात काहीही म्हटलं तर चालेल आणि ते फार मनोरांनात्मक आहे अशा स्वरूपात हे नेते बोलत असतात. मात्र या नेत्यांकडून वापरण्यात येणारी भाषा ही अडाणी, अशिक्षित आणि मूर्खपणाची आहे. या नेत्यांना लिंगाधारित शिक्षण देण्याची गरज आहे. शालेय जीवनात जे शिकायला हवं ते हे नेते शिकले नाहीत.

अशा प्रकारची भाषा जेव्हा नेते वापरतात तेव्हा जाणवते की, त्यांची विचारशैली ही चुकीची आहे. त्यामुळे सत्तासंघर्ष टोकाला जाऊन पोहचतो की, व्यक्तिगत, खालच्या पातळीवर टिका करण्यात येते. यात त्या घरातील स्त्रीला गोवणे हे चुकीचे आहे. त्यांच्या जन्माबद्दल, आई, वडिलांबद्दल शंका घेणं म्हणजे हे सगळं खालच्या पातळीला गेलं आहे. याचा सगळ्यांनी निषेध करायला हवा. एवढंच नाही तर अशा लोकांना राजकारणातून हद्दपार करायला हवे.

राजकारणात भाषा कुठली वापरली पाहिजे याचा प्रोटोकॉल नाही. प्रोटोकॉल पेक्षाही आपली नैतिकता अशा प्रकराची भाषा वापरा हे सांगत नाही. जागतिक पातळीवर अशा प्रकारची नैतिकता आहे. त्यामुळे नैतिकचे आपले जे काही समज आहेत ते कमजोर आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जे काही आमदार गेले आहेत त्यांच्या मतानुसार ते हिंदुत्वासाठी गेले आहेत. हिदुत्व हा जगण्याचा मार्ग असल्याचे सर्वोच्च न्यायालायने सांगितलं आहे. हे सांगतांना संस्कृती म्हणून हिंदुत्वाला मान्यता दिली आहे. अशा प्रकारची भाषा म्हणजे हिंदुत्वाकडे जाणारी जीवनशैली नाही.

मध्यंतरी पुण्यात एका राजकीय नेत्याच्या घरावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर पुण्यातील सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र येत इथून पुढे कुठल्याही राजकीय नेत्याच्या घरावर मोर्चा नेण्यात येणार नाही. खालच्या पातळीवर जाऊन टिका करण्यात येणार नाही अशा प्रकारची आचारसंहिता सुद्धा ठरविण्यात आली आहे.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.