जिरवाजिरवीच्या राजकारणातून “तमिळ” ही हरियाणाची दुसरी अधिकृत भाषा झालेली..

तुम्ही तमिळमध्ये बोलणाऱ्या हरियाणवीची कल्पना करू शकता का??? 

कल्पना करण्याचीही आवश्यकता नाही, कारण खरंच तमिळ ही हरियाणाची अधिकृत दुसरी भाषा होती. आता प्रश्न पडला असेल तो म्हणजे हरियाणाचा अन तमिळ चा काय संबंध ? कारण उत्तर भारतातील हरियाणा हे नेहमीच हिंदी भाषिक राज्य राहिलेय. 

हरियाणात आजही मुख्यतः हरियाणवी भाषा बोलली जाते.

तर, १९६९ मध्ये हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री छ. बन्सीलाल यांनी तामिळ भाषेला हरियाणाची दुसरी अधिकृत भाषा म्हणून घोषित केले होते. त्यावेळी केंद्रात इंदिरा गांधींचे सरकार होते. 

तमिळला अधिकृत भाषा म्हणून घोषित करतांना तत्कालीन बन्सीलाल सरकारकडून असा युक्तिवाद करण्यात आला होता की, संपूर्ण देश एक आहे, तेंव्हा आपण प्रत्येक भाषा स्वीकारलीच पाहिजे.

अगदी २०१० पर्यंत तामिळ भाषेचा दर्जा अधिकृत भाषा म्हणूनच होता पण मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांनी त्यांच्या कार्यकाळात पंजाबी भाषेला दुसरी भाषा बनवले. 

पण आजही हरियाणात अनेक जण तमिळ भाषा बोलतात.

पण तमिळच भाषा का निवडली गेली ? यामागे एक इतिहास आहे….

यामागचे खरे कारण पंजाब आणि हरियाणाची फाळणी हे होते. 

१ नोव्हेंबर १९६६ रोजी पंजाब आणि हरियाणा एकमेकांपासून वेगळे झाले. मात्र फाळणी होऊनही या दोन राज्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून वाद सुरूच होते. मग त्या वादांमध्ये पाणी वाटपाचा मुद्दा असू देत किंव्हा विमानतळाचा मुद्दा असू देत यावरून वाद धुमसत राहतात.

या वादामुळे झालं असं की, हरियाणा दक्षिण भारतातील भाषांच्या जवळ आला.

पंजाब आणि हरियाणाचे विभाजन होऊनही, हरियाणामध्ये ‘पंजाब राजभाषा कायदा १९६०’ अंतर्गत काम सुरू होते. आणि महत्वाचं म्हणजे पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची अधिकृत भाषा होती. तरी अधून मधून उद्भवत असलेल्या वादाला वैतागून अखेर हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री बन्सीलाल यांनी एक कठोर निर्णय घेतला.

तो म्हणजे, हरियाणा राजभाषा १९६९ कायद्यांतर्गत ‘पंजाबी भाषेऐवजी’ दुसरी कोणतीही भाषा राज्याची दुसरी राजभाषा म्हणून घोषित करण्याचा निर्णय होता. 

पण या आधीच हरियाणाने, पंजाबी भाषे ऐवजी हिंदी भाषा स्वीकारली होती. 

शेवटी पंजाब राज्याला धडा शिकवण्याच्या उद्देशाने हरियाणाने आपली दुसरी अधिकृत भाषा म्हणून ‘पंजाबी भाषे’ ऐवजी ‘तामिळ भाषा’ निवडण्याचा निर्णय घेतला. 

बरं धडा शिकवण्याचा इथपर्यंतचा हा उद्देश नव्हता तर, बन्सीलाल यांच्या या निर्णयामागे आणखी एक हेतू होता. तो म्हणजे, त्यांना हरियाणातील विद्यार्थ्यांनी किमान दोन भारतीय भाषा शिकण्याची संधी मिळेल हाच हेतू होता. 

एक उत्तरेकडील हिंदी आणि दक्षिणेकडील तमिळ. 

त्या काळात दक्षिणेत हिंदीविरोधी चळवळी सुरू असल्याने सरकारला दक्षिण भारतीय भाषेचा प्रचार करायचा होता. अशा परिस्थितीत बन्सीलाल यांना हे दाखवून द्यायचे होते की, उत्तर भारतीय राज्ये जर दक्षिण भारतीय भाषा स्वीकारू शकतात तर त्यांनी हिंदीलाही विरोध करू नये.

७० च्या दशकाच्या सुरुवातीला, राज्य सरकारने सरकारी शाळांमध्ये शाळांमध्ये तेलुगू शिकवण्यासाठी सुमारे १०० च्या वर शिक्षकांची नियुक्ती केली होती. जरी तेथील काही नागरिक अजूनही तमिळ बोलत  असतील तरी, उपवाद सोडले तर काही लोकांनी या भाषेला पूर्णपणे स्वीकारलेच नाही.

त्यामुळे खऱ्या अर्थाने ‘तमिळ’ ही हरियाणाची दुसरी अधिकृत भाषा बनू शकली नाही.

कारण त्यानंतरही हरियाणाच्या भाषेशी संबंधित कायद्यात बऱ्याचदा सुधारणा करण्यात आल्या, मात्र प्रत्येक वेळेस तमिळ भाषेचा साधा उल्लेखही केला गेला नाही.

त्यानंतर अधिकृतरित्या पाऊल उचलले गेले…

म्हणजेच २००४ मध्ये ओमप्रकाश चौटाला सरकारच्या काळात तमिळ भाषेला दिलेला हा दर्जा काढून घेण्यात आला. अन पंजाबी’ भाषेला हरियाणाची दुसरी अधिकृत भाषा म्हणून दर्जा मिळाला. 

मग मागील सरकारने जसा तमिळ ला अधिकृत भाषेचा दर्जा देतांना जसा युक्तिवाद केला त्याला बाजूला टाकत २००४ मध्ये चौटाला सरकारने युक्तिवाद केला होता. तो म्हणजे, हरियाणात ‘पंजाबी भाषिक’ लोकांची संख्या खूप जास्त आहे, तर ‘तामिळ भाषा’ बोलली जात नाही आणि शिकवली देखील जात नाही असं या सरकारचं म्हणणं होतं. 

२०१९ मध्ये मात्र एक गोष्ट झाली…

ती म्हणजे, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ‘पोंगल’ निमित्त ‘तमिळ भाषेत’ भाषण करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते.

असो मात्र हरियाणात कधीकाळी अधिकृत दुसऱ्या भाषेचा दर्जा मिळालेली तमिळ भाषेचं आज अस्तित्वच उरलं नाही, तसं ते वास्तवात कधीच नव्हतं पण कागदावर मात्र नक्कीच होतं.. 

हे हि वाच भिडू :

  

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.