मंदा म्हात्रे भाजपवर टीका करत असल्या तरी त्यांचा खरा राग गणेश नाईकांवर आहे..
बेलापूरच्या तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आज महाराष्ट्रातलं राजकारण तापवलंय. त्यांनी खुद्द स्वतःच्याच पक्षाला म्हणजे भाजपलाच घरचा आहेर दिलाय. त्यांच्या या सडेतोड वक्तव्यांमुळेच तर त्या भाजपच्या फायरब्रँड म्हणून ओळखल्या जातात.
त्या काय म्हंटल्या, तर
राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांना डावलल जातं
त्यांनी असं बोलण्याची बरीच कारण आहेत म्हणा. त्यातलं एक कारण म्हणजे गणेश नाईक. कारण गणेश नाईकांचा आणि त्यांचं वैर सर्वश्रुत आहे.
तर त्या काय काय आणि कुठं हे सगळं बोलल्या ते आधी बघूया, आणि नंतर त्या असं का बोलल्या त्या पार्श्वभूमीकडे सरकूया,
मंदा म्हात्रे मुंबईत लोकमत वृत्तपत्र समूहाच्या महिला सन्मान कार्यक्रमात आमंत्रित होत्या. या लोकमतच्या कार्यक्रमात काँग्रेस नेत्या आणि महिला बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर व्यासपीठावर होत्या. आता त्यांच्यासमोरच मंदा म्हात्रे यांनी ही खंत बोलून दाखवली. त्या म्हंटल्या,
राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांना डावलल जातं. दोनदा निवडून येऊनही मला आजही संघर्ष करावं लागतोय. आजही महिलांना राजकारणात काम करताना संघर्ष करावा लागतो.
आपल्याच पक्षातील माणसं, जर एखादी स्त्री चांगलं काम करायला लागली, तर मग त्याला भीती निर्माण होते, मग भीती निर्माण झाल्यावर फोटो टाकायचं नाही, कार्यक्रमाला बोलवायचं नाही, अशी जेव्हा भीती निर्माण होते, तेव्हा समजायचं आपलं कार्य चांगलं आहे. लक्षात घ्या महिलांनो. ज्यावेळी तुमचा फोटो टाकायचा असेल तेव्हा त्यांच्या मनात भीती निर्माण झाली तर समजायचं तुमच्या कार्याने धडकी निर्माण झाली आहे.
काम करताना, कुठलीही भीती बाळगायची नाही, फळाची अपेक्षा बाळगायची नाही, आपण आपलं काम करत राहायचं, एखादी स्त्री चांगलं काम करायला लागली की पुरुष नेते पंख छाटायला सुरुवात करतात. आज ही महिलांची कामे झाकून टाकण्याचं काम केलं जातं. मला तिकीट दिलं किंवा नाही दिलं तरी मी लढणार, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
त्या हे जे सगळं बोलल्या आहेत त्याला थोडी वादाची किनार आहे.
म्हणजे कस तर गणेश नाईक आणि मंदाताई म्हात्रे हे आता भाजपमध्ये एकत्र जरी असले तरी जेव्हा गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातला कलगीतुरा संपूर्ण नवी मुंबईला माहित आहे.
तर आता भाजप मध्ये असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी आपला चिरंजीव आमदार संदीप नाईक आणि ५७ नगरसेवकांसोबत भाजप प्रवेश केला होता.
गणेश नाईकांच्या या पक्षप्रवेशावेळी नाईकांच्या समर्थकांनी बॅनर तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले होते. मात्र त्यात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे व विधान परिषद सदस्य रमेश पाटील यांचा फोटोच नव्हता. यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. भाजप पक्ष कार्यालयानेही याची दखल घेतली मात्र त्यावर म्हणावा तसा काही प्रतिसाद भाजपच्या नेत्यांकडून मिळाला नाही.
त्यावर नाईकांच्या पक्षप्रवेशावेळी मंदाताई म्हणाल्या होत्या,
ज्यांचं कुठे नाव राहिलेलं नाही, ज्यांचे उमेदवार ४० – ५० हजार मतांनी इथे पडले आहेत, ते त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठीच भाजपमध्ये येत आहेत. त्यांच्या येण्यावर मी काय आक्षेप घेणार? हे सत्तेसाठी असं करत आहेत. सत्तेसाठीच ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. २०१४ मध्येच ते भाजपमध्ये येत होते. पण राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी खो घातल्यामुळे तेव्हा ते राहिलं. पण आज ते सत्तेसाठीच येत आहेत. नाहीतर तसं भाजपवर त्यांचं काही प्रेम नाही
भाजपने गणेश नाईकांना पक्षात घेण्याचं कारण म्हणजे नवी मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा रोवता येईल. पण या सगळ्या रेट्यात मंदाताईंचं पक्षातलं महत्व कमी होत असल्याचा सूर खुद्द मंदाताईंनीच कायम सार्वजनिक व्यासपीठावर ओढलाय.
त्यामुळे डावललं जाण्याविषयीच त्यांनी आज केलेलं वक्तव्य म्हणजे त्यांची दुखरी बाजूच आहे.
हे ही वाच भिडू
- निवडणुकीसाठी पक्षाला १ कोटींचा निधी गोळा करून दिला पण म्हणून मुख्यमंत्रीपद मिळालं नाही
- सत्ता आणि मुख्यमंत्री असताना देखील शिवसैनिक पक्ष का सोडत आहेत?
- धुळ्याच्या या माणसामुळं मुंबई वाचली हे मात्र नक्की.