बालभारतीची चूक झालीच पण मुस्लीम धर्माचे म्हणून कुर्बान हुसेन यांचा अपमान करू नका

आठवीच्या पुस्तकात सुखदेव यांच्या जागी कुर्बान हूसेन फासावर गेल्याचा उल्लेख करण्यात आला आणि एकच राडा सुरू झाला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी हौतात्म पत्करलं हे आपणाला माहित आहे.

पण बालभारतीकडून या तीन क्रांन्तीकारकांचा उल्लेख करत असताना भगतसिंग, राजगुरू व कुर्बान हूसेन असा उल्लेख करण्यात आला. सुखदेव यांच्या नावाचा उल्लेख टाळणं ही चुकचं. पण या चुकीवर व्यक्त होत असताना काही हिंदूत्त्ववाद्यांनी हा तर मुस्लीमांचे गोडवे गाण्याचा प्रकार आहे म्हणून टिका केली.

ब्राह्मण महासंघाने सुखदेव यांचे नाव टाळण्याला आक्षेप घेतला. जो की शंभर टक्के बरोबर आणि मात्र कुर्बान हुसेन यांच्या नावाचा उल्लेख करणं हे चुक आहे अस म्हणणं पुर्णपणे चुकीचं आहे.

फक्त मुस्लीम म्हणून जर कुर्बान हूसेन यांच्या नावाला आपण आक्षेप घेत असू, देशासाठी फासावर गेलेल्या क्रांन्तीकारकाचा धर्म बघत असून तर भारताबद्दल आत्मियतेने बोलण्याचा काहीएक अधिकार आपणाला नाही हे देखील तितकच खरं आहे.

कुर्बान हुसेन कोण होते हे समजून घेण्यापूर्वी बालभारतीने नेमकी काय चूक केली, व त्यांच स्पष्टीकरण काय आहे हे पाहणं गरजेचं आहे.

इयत्ता आठवीच्या पुस्तकात यदुनाथ थत्ते यांचा माझ्या देशावर माझे प्रेम आहे असा धडा आहे. यात एक व्यक्ती शाळकरी मुलांना देशप्रेमाबद्दल समजावून सांगत आहे. धडा संवाद स्वरूपात आहे. त्यात एक वाक्य देण्यात आलं आहे.

“भगतसिंग, राजगुरु, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते”

प्रसिद्ध लेखक, संपादक, बालसाहित्यकार यदुनाथ थत्ते यांच्या प्रतिज्ञा या पुस्तकातून हा धडा देण्यात आलेला आहे व बालभारतीचं स्पष्टीकरण आहे की हा धडा जसाच्या तसा छापण्यात आला आहे.

आत्ता एकंदरीत प्रकरण समजले असेल तर आपण कुर्बान हुसेन कोण होते ते पाहूया.

ज्याप्रमाणे भगतसिंग, सुखदेव व राजगुरू हसत हसत देशासाठी फासावर गेले त्याचप्रमाणे कुर्बान हुसेन देखील देशासाठी फासावर गेले. वयाच्या २२ व्या वर्षी देशासाठी हौताम्य पत्करणारे ते पहिलेच संपादक असावेत.

सोलापूरमधला हुतात्मा चौक हा मल्लप्पा धनेशेट्टी, जगन्नाथ शिंदे, किसनलाल सारडा, कुर्बान हुसेन यांच्या हौतात्माचा दाखला देत आजही उभा आहे. सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्याचं महत्व सांगायचं तर भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या शहराने स्वातंत्र्यदिन भोगला.

हा दिवस सोलापूरकरांना पहायला मिळाला ते सोलापूरच्या मातीत जन्मलेल्या अशाच क्रांन्तीकारकांमुळे.

कुर्बान हुसेन यांना गझनफर नावाचे उर्दू भाषेतील साप्ताहिक सुरू केले होते. गफनफर याचा मराठीतील अर्थ सिंह. लोकमान्य टिळकांचे ज्याप्रमाणे केसरी वर्तमानपत्र होते तसेच सोलापूरकरांसाठी क्रांतीची ज्योत पेटवणारे गझनफर हे साप्ताहिक होते. हिंदू मुस्लीम ऐक्य, ब्रिटीशांविरोधात आवाज उठवण्यात काम या साप्ताहिकातून केले जात असे. कुर्बान हुसेन या साप्ताहिकाचे संपादक होते.

कुर्बान हुसेन गिरणी कामगार होते. सामान्य मुस्लीम कुटूंबात त्यांचा जन्म झाला होता. आपल्या साप्ताहिकातून देशलढा उभारणे हे त्यांचे ध्येय होते.

आत्ता येतो तो सोलापूर शहराचा इतिहास.

ब्रिटीश भारतात दोन ठिकाणीच मार्शल लॉ लागू करण्यात आला होता. त्यातील एक शहर म्हणजे पेशावर आणि दूसरे सोलापूर. पण या जुलमी मार्शल लॉ ला टक्कर देण्यासाठी सोलापूर शहर समर्थ होते. कारण सोलापूरचा इतिहास जाज्वल्य होता व स्वातंत्रलढा इथल्या माणसांच्या रक्तात भिनला होता.

१९२५ मध्ये जेव्हा मुंबईच्या गव्हर्नरला मानपत्र देण्यात आले तेव्हा सोलापूरच्या नागरिकांनी त्याविरोधात आंदोलन उभा केले. लोकमान्य टिळकांना जेव्हा ब्रिटीशांनी शिक्षा सुनावली तेव्हा सोलापूरात तीव्र आंदोलन उभा राहिले. कल्पतरू, कर्मयोगी या वर्तमानपत्राने स्वातंत्र्याचा आवाज भक्कम करण्याचे कार्य केल.

त्यामुळेच ६ एप्रिल १९३० रोजी सोलापूर नगरपालिकेने राष्ट्रीय निशाण लावण्याचा ठराव संमत करण्यात आला. ठरावाप्रमाणे नगरपालिकेवर राष्ट्रीय निशाण फडकवण्यात आले.

हा मान मिळवणारे सोलापूर ही महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका आहे.

१९३० साली महात्मा गांधींनी आंदोलन तीव्र केले. तेव्हा सोलापूरात हरताळ पाळण्यात आला. राष्ट्रध्वज हातात घेवून मिरवणूका काढण्यात आल्या. कायदेभंग करण्यासाठी सभा घेण्यात आली.

टिळक चौकात रामकृष्ण जाजू यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या सभेत कुर्बान हुसेन यांच्यासह डॉ.कृ.भि.अंत्रोळीकर, रामभाऊ राजवाडे, तुळशीदास जाधव, शेठ गुलाबचंद, महाजन वकील, नागप्पा अब्दुलपूरकर, कवी कुंजविहारी, सिद्रामप्पा ब्रिटीश सत्तेवर टिकास्त्र डागले.

वातावरण स्फोटक बनले. लक्ष्मी विष्णू मिलच्या परिसरात जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांवर तुफान दगडफेक करून त्यांना पिटाळून लावण्यात आले. दूसऱ्या दिवशी गांधीवादी जमनलाल बजाज यांच्या अटकेची बातमी सोलापूरात वाऱ्यासारखी पसरली, आणि आंदोलनाचा भडका वाढत गेला.

तुळजापूर वेशीच्या पलीकडे असणाऱ्या ताडीच्या बनात कायदेभंग सुरू झाला. दंगल उसळली. परिस्थिती आटोक्याबाहेर गेली. कलेक्टर हेन्नी नाईट यांनी गोळीबार करण्याचा हुकूम दिली. शंकर शिवदारे या गोळीबारात शहिद झाले.  जमावाने मंगळवार पोलीस चौकीवर हल्ला केला. पुढे हा जमाव कोर्टात गेला. संपूर्ण कोर्ट आगीच्या हवाली करण्यात आले.

यामुळेच सोलापूरात मार्शल लॉ लागू करण्यात आला.  सोलापुरातील नेते डॉ. कृ. भि. अंत्रोळीकर, रामकृष्ण जाजू, माणिकचंद शहा, मल्लप्पा धनशेट्टी, किसनलाल सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन आदींना अटक करण्यात आली.

दंगलीचा बदला घेण्याच्या इराद्याने ब्रिटीश पछाडलेले होते. त्यातून जूलूम व अत्याचारांना सीमा उरली नाही.

दूसरीकडे मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, किसनलाल सारडा, कुर्बान हुसेन यांच्यावर पोलिसांच्या हत्येचा आरोप ठेवून खुनाचा खटला सुरू करण्यात आला.

तर १८ मे १९३० रोजी लष्करी कायद्याच्या अधिनियमचा भंग केल्याच्या आदेशावरून लष्करी न्यायालयाने भाई छन्नुसिंग चंदेले, तुळशीदास जाधव, रामकृष्ण जाजू, सिद्धलिंगय्या स्वामी, कोंडो कुलकर्णी, माणिकचंद शहा, रामभाऊ राजवाडे, हररिहर सलगरकर (कवी कुंजविहारी), बंकटलाल सोनी, बाबुराव जोशी (पंढरपूर) आदी क्रांतिकारकांना न्यायालयाने सजा ठोठावली.

कर्मयोगी साप्ताहिकाने या घटनाक्रम छापला व गुप्तपणे देशभरात सोलापूरातील मार्शल लॉ बाबत माहिती देण्यात आली. याचा बदला म्हणून कर्मयोगीचे राजाभाऊ राजवाडे यांना अटक करण्यात आली. त्यांची संपुर्ण प्रेस, घरदार जप्त करण्यात आले.

तरिही ब्रिटीशांनी मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, किसनलाल सारडा, कुर्बान हुसेन यांची फासीची शिक्षा कायम ठेवली. १२ जानेवारी १९३१ रोजी हे चार देशभक्त भारतमातेचा जयजयकार करत फासावर गेले.

त्या दिवशापासून सोलापूरात १२ जानेवारी हुतात्मा दिन पाळला जावू लागला. स्वातंत्र्य भारतात सोलापूरात त्यांचा पुतळा उभारण्यात आला. अशा या क्रांन्तीकारकाडे धर्माच्या चष्म्यातून पाहणे हे  कितपत योग्य वाटते?

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.