या कारणांमुळे आनंद दिघेंच्या मृत्यूबद्दल आजही प्रश्न विचारले जातात..

“धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबतीत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे. मी आज जाहीरपणे बोलणार नाही. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्यावेळी भूकंप होईल”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगावच्या सभेत हे वक्तव्य केलं आणि पुन्हा एकदा आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित झाल्या.

त्यांच्या या वक्तव्यानंतर ठाणे शहरात लगोलग बॅनर लावण्यात आले.

या बॅनरवरून प्रश्न विचारण्यात येवू लागला की, ‘नक्की आमच्या धर्मवीरांचं काय झालं, घात की अपघात?’ त्यामुळे काही दिवसात पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आनंद दिघेंच्या मृत्यूबद्दलचं राजकारण तापणार हे स्पष्टपणे दिसत आहे.

आत्ता पुन्हा एकदा असं म्हणायचं कारण म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणावरून आनंद दिघेंच्या मृत्यूबद्दल कोणता ना कोणता नेता प्रश्न विचारतच राहतो मग ते नारायण राणे यांचे पुत्र असो की धर्मवीर सिनेमा रिलीज होण्याचं निमित्त असो. 

पण आनंद दिघेंच्या मृत्यूबद्दल संशय का व्यक्त केला जातो, आजही लोकांना कोणते प्रश्न पडतात आणि का?

तारीख होती २४ ऑगस्ट २००१. गणेशोत्सवाचे दिवस होते. ठाणे शहरातल्या वेगवेगळ्या गणेश मंडळांच्या, कार्यकर्त्यांच्या घरातल्या गणपतींच्या आरतींना उपस्थित राहून आनंद दिघे घरी परतत होते. दिवसभराचा कार्यक्रम पुर्ण करत पहाट झाली होती पण कार्यक्रम थांबले नव्हते. अशाच एका कार्यकर्त्यांच्या घरी जाताना त्यांच्या आरमाडा गाडीचा अपघात झाला. त्यांची गाडी एसटीला धडकली होती.

या अपघातानंतर आनंद दिघेंना ठाण्याच्या सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली. दिघेंना हार्टचा प्रॉब्लेम होता. यापूर्वी देखील २-३ वेळा त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं होतं. मात्र ते व्यवस्थित उपचार घ्यायचे नाहीत. त्यांचं स्वत: कडे नीट लक्ष नसायचं. कधीकधी अर्धवट उपचार घ्यायचे, कधीकधी दवाखान्यातून अचानक निघून जायचे, असं दिघेंचे निकटवर्तीय सांगतात.

मात्र त्यांचा हा अपघात जिवावर बेतणारा नक्कीच नव्हता. सर्व काही व्यवस्थित होवून आनंद दिघे रुग्णालयातून लवकरच बाहेर पडतील, अशी आशा कार्यकर्त्यांना होती. पण रात्री १०.३० च्या सुमारास बातमी आली आनंद दिघे गेले.. 

त्यांच्या मृत्यूनंतर सिंघानिया हॉस्पीटलबाहेर असणारा जमाव संतप्त झाला. उपचार घेणारे दिघे साहेब अचानक कसे गेले? हा प्रश्न उपस्थितांना पडला आणि त्या रागाच्या भरातच हॉस्पीटलमध्ये तोडफोड सुरू झाली. सिंघानिया हॉस्पीटलच्या परिसराला आग लावण्यात आली, २०० खाटांचं रुग्णालय आगीच्या हवाली गेलं..

सुदैवाने हॉस्पिटलचा स्टाफ, डॉक्टर, रुग्णांना बाहेर काढण्यात यश आलं होतं. मात्र फ्रंटलाईन या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, यात एका ६ महिन्याच्या बालकाचा आणि ६५ वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाला होता. कारण गोंधळ सुरु झाल्यावर जेव्हा इलेक्ट्रीसिटी बंद पडली तेव्हा सर्व व्हेंटिलेटर बंद पडले होते. ते बाळ आणि वृद्ध दोघेही व्हेंटिलेटरवर असल्याने त्यांचा मृत्यू झाला होता… 

हा होता त्या रात्री झालेला घटनाक्रम, मग नेमके प्रश्न आणि संशय का व्यक्त केले जातात.. 

तर मुद्दा येतो तो अपघाताचा. दिघेंच्या मृत्यूंपूर्वी काहीच वेळांपूर्वी राज ठाकरे त्यांना भेटून गेले होते. तेव्हा त्यांची तब्येत ठिक होती. डॉक्टरांनी देखील ते काही दिवसात ठणठणीत होतील असं सांगितलं होतं. झालेल्या अपघातातून ते सुदैवाने बचावले होते व ठिकठाक होते. कार्यकर्ते आनंद दिघेंना कधी डिस्चार्ज मिळेल याची वाट पहात होते.

असं वातावरण असताना अचानक आनंद दिघेंच्या मृत्यूंची बातमी आल्यानेच हा धक्का शिवसैनिकांना बसला. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आनंद दिघेंना सध्याकाळी सव्वासातच्या दरम्यान पहिला अटॅक आला. त्यानंतर पुढच्या दहा मिनटांनी दूसरा अटॅक आला. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले पण त्यांना अटॅकमधून वाचवता आलं नाही.

या माहितीला धर्मवीर आनंद दिघे या सिनेमाच्या प्रमोशनवेळी एकनाथ शिंदे यांनी देखील दुजोरा दिला होता. त्यांनी देखील आनंद दिघेंना अटॅक आल्याचं सांगितलं होतं. 

मग मुद्दा येतो तो म्हणजे संशय का व्यक्त केला जातो.. 

तर हा प्रश्न विचारण्यास सुरवात झाली ती आनंद दिघेंच्या अंत्यसंस्कारापासून. कारण आनंद दिघेंच्या अत्यंसंस्कारास बाळासाहेब ठाकरे उपस्थित नव्हते. त्यांची अनुपस्थिती ही संशयाला बळ देत गेली. आनंद दिघेंची वाढती लोकप्रियता बाळासाहेबांना सहन होत नव्हती. पक्षांतर्गत गटतट होते त्यातून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जावू लागला.

वास्तविक आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर सिंघानिया हॉस्पीटलमध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळेच सुरक्षायंत्रणांनी बाळासाहेबांना आनंद दिघेंच्या अंत्यसंस्कारास जाण्यास अटकाव केला होता. दूसरीकडे राजकीय विश्लेषकांनी देखील असा कोणता घातपात झाल्याची शक्यता फेटाळून लावत शिवसेनेत कधीच बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्यात स्पर्धा नव्हती, असं सांगितलं होतं.

२०१९ रोजी नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी ‘शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या हत्येसाठी बाळासाहेब ठाकरे जबाबदार होते.’ असं वक्तव्य केलं होतं.

तेव्हा नारायण राणे यांनी पुढे येत स्पष्टीकरण दिलं होतं. ते म्हणाले होते,

“शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या मृत्युबाबत जे काही आरोप झाले, ते मला मान्य नाहीत. आनंद दिघेंना शेवटचा भेटणारा मी होतो. मी गेलो तेव्हा दिघे यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. मी बाहेर पडून बाळासाहेबांना फोन केला आणि डॉ. नितू मांडके यांना पाठवून देण्याची विनंती केली. बाळासाहेबांनी तशी व्यवस्था केली. पण डॉ. नितू मांडके येण्याअगोदरच दिघे यांचा मृत्यू झाला होता. ही वस्तुस्थिती आहे.”

मात्र याच नारायण राणेंनी एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेतून बंड केलं तेव्हा सूचकपणे म्हटलं होतं…

“शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”

त्यांच्या या वक्तव्याला देखील दिघेंच्या मृत्यूशी जोडण्यात आलं होतं. त्यावेळी काही शिवसेनेच्या नेत्यांकडून नारायण राणे दिघेंना भेटणारे शेवटचे नेते होते आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला म्हणून राणेंना संशयाच्या धारेवर धरलं गेलं होतं. 

याबाबत ठाण्याचं राजकारण जवळून पाहिलेले, जेष्ठ पत्रकार रवींद्र पोखरकर यांच्याकडून अधिकची माहिती विचारण्यात आली. बोलभिडू सोबत बोलताना ते म्हणाले, 

“आनंद दिघे यांचा अपघात जीव जाण्याइतका गंभीर नव्हता. रुग्णालयात ते बरे होत आहेत अशी स्थिती असताना मृत्यूची बातमी आल्याने काहीशी संभ्रम अवस्था निर्माण झाली होती. हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना शिवसेनेचे लहान-मोठे नेते मंडळी भेटून जात होते ज्यात राज ठाकरे देखील होते.

राज ठाकरे आणि दिघे यांच्यात थोडावेळ बोलणं झालं आणि त्यानंतर राज ठाकरे १०-२० किलोमीटरच गेले असतील की इकडे आनंद दिघेंना अटॅक येऊन मृत्यूची बातमी आली. २००० ते २००१ या काळादरम्यान बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यात थोडे मतभेद झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रांत आल्या होत्या.

त्यावेळी ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी रस्ते रुंदीकरण, अनधिकृत बांधकाम पडलं अशी कामं हातात घेतली होती. यामुळे शिवसैनिकांच्या टपऱ्या, दुकानं तुटत होती त्यांचा रोजगार हिरावून घेतला होता म्हणून दिघेंनी विरोध केला होता. पण बाळासाहेबांनी संमती दर्शवली होती. म्हणून अशा बातम्या आल्या होत्या. आणि त्यामुळे दिघेंच्या मृत्यूवरून मातोश्रीला धारेवर धरण्यात आलं होतं” 

थोडक्यात आजही आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जातो तो याच कारणांमुळे. महाराष्ट्राच्या बदललेल्या सत्तासमीकरणात आत्ता हा प्रश्न पुन्हा उफाळून येताना दिसत आहे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.