मृत्यूला अडीच महिने उलटून गेले, मग शिंजो अबेंचे अंत्यसंस्कार आत्ता का पार पडतायत ?

८ जुलै २०२२ ला प्रचाराच्या कार्यक्रमात असताना जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. जपानच्या नेव्हीमध्ये काम करणारा माजी अधिकारी तेत्सुया यामागामीनं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि या हल्ल्यातच अबे यांचा मृत्यू झाला. ही घटना घडली ८ जुलैला.

आता २७ सप्टेंबरला अबे यांच्यावर राजकीय अंतिम संस्कार (स्टेट फ्युनरल) होणार आहेत. या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्यासह जगभरातल्या अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती लावली. या अंत्यसंस्कारांची चर्चा सध्या जगभरातल्या माध्यमांमध्ये होत आहे आणि अर्थातच याला कारणंही तशीच आहेत, ती म्हणजे मृत्यूच्या अडीच महिन्यांनंतर राजकीय अंत्यसंस्कार का केले जात आहेत ? या सगळ्या कार्यक्रमाला १.६६ बिलियन येन म्हणजेच जवळपास ९७ कोटी रुपये खर्च का केला जातोय ? आणि महत्त्वाचं म्हणजे जपानचेच नागरिक शिंजो अंबेच्या या राजकीय अंतिम संस्कारांना विरोध का करत आहेत ?

पहिलं बघुयात हे राजकीय अंत्यसंस्कार म्हणजे नेमकं काय असतं..?

८ जुलैला शिंजो अबे यांचा मृत्यू झाल्यानंतर १५ जुलैलाच त्यांच्या कुटुंबीयांनी बौद्ध परंपरेनुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले होते. आता जो राजकीय अंतिम संस्काराचा कार्यक्रम जपानमध्ये घेण्यात येतोय, त्यात अभिवादन करण्यासाठी शिंजो अबे यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या आहेत.

जपानची  राजधानी टोकियोमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्यासह जपानमधले दिग्गज नेते आणि राजकीय, प्रशासकीय अधिकारी यांची श्रद्धांजलीपर भाषणं होतील, शिंजो अबे यांच्या पत्नीही भाषण करतील.

पण मृत्यूच्या अडीच महिन्यानंतरही हा राजकीय अंत्यसंस्काराचा कार्यक्रम घेतला जातोय, याचं कारण म्हणजे…

जपानमध्ये राजकीय अंत्यसंस्कारांना असलेलं प्रचंड महत्त्व. मुळात हे राजकीय अंत्यसंस्कार फक्त राजघराण्यातील व्यक्तींवरच केले जातात. अबे यांच्याआधी राजकीय नेत्यांपैकी फक्त पंतप्रधान शिगेरु योशिदा यांनाच १९६७ मध्ये हा मान देण्यात आला होता. कारण योशिदा यांनी सॅनफ्रान्सिस्को करार यशस्वी करत अमेरिकेचं जपानवरचं वर्चस्व संपुष्टात आणलं होतं.

WhatsApp Image 2022 09 27 at 4.41.56 PM
शिगेरु योशिदा यांचे राजकीय अंत्यसंस्कार

शिंजो अबे यांना हा मान मिळण्याचं कारण म्हणजे, त्यांचा नैसर्गिक मृत्यू न होता, गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. म्हणूनच त्यांच्या सन्मानार्थ जपानमध्ये राजकीय अंत्यसंस्काराचा कार्यक्रम घेण्यात येतोय.

या कार्यक्रमात अबे यांच्या अस्थी ठेवण्यात आल्यानं आणखी एक प्रश्न उपस्थित होतो की, जपानमध्ये अंत्यसंस्कार कसे केले जातात ?

जपानमध्ये बहुतांश लोक बौद्ध धर्माच्या परंपरांनुसार अंत्यसंस्कार करतात. यात व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबीय त्याच्या ओठांना पाणी लावतात. त्याच्या दुसऱ्या दिवशी पार्थिवाचं अंतिम दर्शन घेता येतं. यासाठी येणाऱ्या महिला आणि पुरुषांचा ड्रेसकोड ठरवलेला असतो. यावेळी बौद्ध मंत्रांचं पठणही केलं जातं.

यानंतर मात्र पार्थिवाचं दफन न करता, हिंदू धर्मातल्या परंपरेनुसार अग्नी दिला जातो. अग्नी दिल्यानंतर पार्थिवाच्या अस्थी चॉपस्टिकनं उचलण्याची प्रथा जपानमध्ये पाळली जाते. यानंतर या अस्थींचं विसर्जन न करता, त्यांचं दफन केलं जातं किंवा काही ठिकाणी या अस्थी जतनही केल्या जातात.

शिंजो अबे यांच्या राजकीय अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला जपानच्या लोकांकडून विरोध होण्याचं मुख्य कारण म्हणजे, त्यासाठी येणारा खर्च.

या राजकीय अंत्यसंस्कारांच्या कार्यक्रमाला जवळपास ९७ कोटी रुपये खर्च येतोय. ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरी हिच्या नुकत्याच पार पडलेल्या राजकीय अंत्यसंस्कारालाही यापेक्षा कमी म्हणजे, ७२ कोटी रुपये खर्चच आला होता. हा खर्च येण्यामागचं कारण म्हणजे जगभरातून ४००० पेक्षा जास्त लोक शिंजो अबे यांच्या अंत्यसंस्कारांसाठी जपानमध्ये दाखल होणार आहेत.

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा, भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांचे पंतप्रधान असे एकूण २१७ देशांचे प्रतिनिधी या ‘फ्युनरल डिप्लोमसी’ला उपस्थित असतील.

साहजिकच या बड्या नेत्यांच्या, अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जपान सरकारला विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. जपाननं या कार्यक्रमासाठी तब्बल २० हजार पोलीस आणि सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. साहजिकच यासाठी जपान सरकारला ८०० मिलियन येन इतका पैसा फक्त सुरक्षेवर खर्च करावा लागलाय.

अनेक जपानी नागरिकांनी या अंत्यसंस्कारांविरोधात आंदोलनही केलं. २१ सप्टेंबरला एका वृद्ध माणसानं पंतप्रधानांच्या कार्यालयाबाहेर स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्नही केला होता.

जपानी नागरिक दोन कारणांमुळे या कार्यक्रमाला विरोध करत आहेत, एका गटाचं म्हणणं आहे की, करदात्यांच्या पैशांमधून ९७ कोटी खर्च करून हा कार्यक्रम घेण्यात काहीच हशील नाही, त्यापेक्षा हे पैसे लोकांना सोयीसुविधा देण्यासाठी आणि शिंजो अबे यांच्या निर्णयांमुळे विस्कटलेली अर्थव्यवस्थेची घडी व्यवस्थित करण्यासाठी वापरण्यात यावे. सध्या जपानमध्ये महागाईचा दर वाढलेला आहे, गेल्या ८ वर्षाची आकडेवारी पाहिली तर महागाईच्या दरानं सर्वोच्च टोक गाठलेलं आहे.

त्यामुळेच महागाई असतानाही अबे यांच्या राजकीय अंत्यसंस्कारांवर एवढा खर्च का होतोय, अशी टीका जपानी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

विरोधाचं दुसरं कारण असंही सांगण्यात येत आहे की, अनेक जपानी नागरिकांच्या मते शिंजो अबे यांना हा मान मिळण्यास ते पात्र नाहीत.

पण शिंजो अबेच नाही तर जपानमध्ये सामान्य माणसांच्या अंत्यसंस्कारांनाही मोठा खर्च येतो, २०२१ मधल्या आकडेवारीनुसार थाटामाटात केल्या जाणाऱ्या अंत्यसंस्कारांना प्रत्येकी ७ हजार ७०० डॉलर्सपर्यंत खर्च आल्याचं पुढं आलं होतं.

शिंजो अबे यांच्या राजकीय अंत्यसंस्काराला ९७ कोटी रुपये खर्च येत असला, तरी ते काही जगातले सर्वात महागडे अंत्यसंस्कार नाहीत. हॉलिवूड अभिनेते आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या राजकीय अंत्यसंस्कारासाठी तब्बल ३२५० कोटी रुपये खर्च आला होता. तर उत्तर कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष किम जोंग ईल यांच्या राजकीय अंत्यसंस्कारांसाठी ३२५ कोटी रुपये खर्च आला होता.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.