सातासमुद्रापार आलेल्या या इंग्रजांने जिद्दीने मराठी भाषेतील पहिलं पुस्तक छापून दाखवलं.

आज आपण मराठीत शेकडो पुस्तके प्रकाशित झालेली पाहतो. नावाजलेल्या कादंबरीकारापासून ते नवकवीच्या छोट्याशा काव्यसंग्रहापर्यंत रोज कोणत्या ना कोणत्या प्रकाशनाचे पुस्तक प्रकाशित होत असते. मराठीत जेवढी पुस्तके छापली जातात तेवढी इतर कोणत्या भारतीय भाषेत होत नसतील.

महाराष्ट्रात कवी आणि लेखकांची परंपरा जुनी आहे. साधारण तेराव्या शतकात महानुभाव पंथात तयार झालेले ग्रंथ, ज्ञानेश्वरांनी भगवदगीता सर्वसामान्यांच्या पर्यंत  पोहचावी म्हणून लिहिलेली ज्ञानेश्वरी, अनेक संतानी लिहिलेले अभंग यामुळे मराठी भाषा समृद्ध झाली.

त्याकाळी हे ग्रंथ सुवाच्च अक्षरात लिहून काढले जात. 

पण यामुळे ग्रंथ निर्मितीला अनेक मर्यादा येत. एकटाकी एकाक्षरात लिहू शकणारे लेखनिक फारच कमी मिळायचे. हे मिळालेले लेखनिक अनेकदा प्रचंड मानधन घ्यायचे. शिवाय ग्रंथ लिहून तयार होण्यास देखील बराच वेळ लागायचा. ही हस्तलिखिते खूप कमी प्रमाणात उपलब्ध असायची. हीच परिस्थिती अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत होती.

त्याकाळातदेखील महाभारत सारखे मोठे ग्रंथ १५०-२०० रुपयांना मिळत असत. सोन्यापेक्षाही महाग किमंत ग्रंथांची होती,

जे ग्रंथ उपलब्ध असायचे ते खूपच जपून वापरले जायचे. तुकोबारायांचे अभंग इंद्रायणीत बुडवून त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार घडायचे. याचा परिणाम वाचन व लेखन ही अभिजन व श्रीमंत वर्गापर्यंत मर्यादित होऊन बसले होते. गरिब विद्यार्थ्यांना पुस्तके पाहण्यासही मिळायची नाहीत. आश्रम शाळांमध्ये पाठांतर करून विद्याभ्यास करण्यावर भर दिला जात होता.

हे सर्वप्रथम बदललं एका इंग्रज मिशनऱ्याने. विल्यम कॅरी त्याच नाव.

विल्यम कॅरी हा एक ख्रिस्ती धर्मोपदेशक होता. अगदी तरूण वयात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी तो भारतात बंगालमध्ये आळा. इथे आल्यावर त्याची ओळख सर्वप्रथम बंगाली भाषेशी झाली. त्याने या भाषेचा सखोल अभ्यास केला, त्याकरता जरूर पडेल म्हणून संस्कृत शिकून घेतले. व्याकरण आणि ग्रंथ यांच्या अभ्यासामुळे काही वर्षातच वेद वाचण्याइतकी प्रगती केली.

ख्रिस्ती तत्वज्ञान भारतीयांपर्यंत पोहचवावे म्हणून आलेला विल्यम कॅरी भारतीय अध्यात्माच्या प्रेमात पडला.

कलकत्याजवळ त्याने एक चर्च आणि एक छापखाना सुरु केला होता. तिथे पंचानन कर्मकार नावाच्या बंगाली लोहाराच्या मदतीने त्यांनी युरोपातील भाषांप्रमाणे अनेक भारतीय भाषांतील अक्षरांचे खिळे बनवून घेतले. संस्कृत,मराठी सारख्या देवनागरी भाषेत कानामात्रा वेलांटी यांचे अनेक अडथळे होते मात्र जिद्दीने यावर मात करून  विल्यम करीने हे साधून घेतलं.

अगदी मोडी लिपीचादेखील त्याने लिथोग्राफ तयार केला.

विल्यम कॅरीबद्दल मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याला कळाले.

नुकताच मराठा साम्राज्याचा अंत झाला होता. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा पराभव करून इंग्रजांनी अख्खा महाराष्ट्र ताब्यात घेतला होता. या मराठ्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला होता लॉर्ड माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन.

त्याने मराठी सत्ता बुडवली पण पुण्यात राहिला त्याकाळात त्याचे मराठी भाषेवर प्रचंड प्रेम जडले. पुढे मुंबईचा गव्हर्नर झाल्यावर ही भाषा वृद्धिंगत व्हावी म्हणून त्याने अनेक प्रयत्न केले याचाच भाग म्हणजे मराठी पुस्तके छापणे. विल्यम कॅरीशी संपर्क करण्यात आला. त्याच्या मदतीने बॉम्बे करीयर या छापखान्यात महालिंगदास यांच्या पंचोपाख्यान या ग्रंथाची छपाई करवून घेण्यात आली.

साल होत १८२२.

मराठी भाषेतला हा पहिला छापील ग्रंथ मानला जातो. पंचतंत्रातल्या गोष्टींवर आधारित असलेलं हे पुस्तक कित्येकांच्या पसंतीस उतरले. मराठीतील छपाईला प्रोत्साहन द्यावे म्हणून एल्फिन्स्टन याने या ग्रंथाच्या काही प्रती महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांना पाठवून दिल्या. यात सातारा सांगलीच्या संस्थानिकांचा देखील समावेश होता.

सातारच्या छत्रपती प्रतापसिंह महाराजांना हे पुस्तक प्रचंड आवडले व त्यांनी साताऱ्यामध्ये देखील छापखाना सुरु करायचा निर्णय घेतला.

यापूर्वी पोर्तुगीजांनी व इतर ख्रिस्ती धर्मोपदेशकानी भारतात छापखाने आणले होते मात्र त्याचा वापर धर्मप्रसाराची पुस्तके छापण्यास केला. मात्र विल्यम करी व लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या व्यक्तींनी एतद्देशीय साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याला जगापर्यंत पोहचवण्यासाठी छपाईचा प्रयोग केला.

विल्यम कॅरी यांनी सिंहासन बत्तीशी, रघुजी भोसल्यांची वंशावळी असे अनेक मराठी ग्रंथ छापले. याचबरोबर मराठी भाषेचे व्याकरण,मराठी इंग्रजी शब्दकोश यांचीही निर्मिती केली.

याच सोबत छापखान्यातून १८३४ पर्यंत बंगाली, मराठी, नागरी, संस्कृत, हिंदी, कोंकणी, गुजराती, कानडी, तेलुगू, पंजाबी , उडिया, अरेबिक, पर्शियन, चिनी इत्यादी इत्यादी चाळीस भाषांमधून त्यांनी ख्रिस्ती धर्मग्रंथांच्या दोन लक्ष बारा हजार प्रती छापून प्रसिद्ध केल्या. पौर्वात्य भाषांच्या छपाईचा त्यांनी पायाच घातला.

त्याच्यामुळे पुस्तके गोरगरिबांच्या पर्यंत पोहचू लागली. विल्यम कॅरी हा वनस्पतिशास्त्रज्ञ असून बहुश्रुत आणि बहुभाषी भाषांतरकार तर होताच शिवाय मराठी व्याकरणकार पंडित म्हणूनही त्याला ओळखलं जातं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.