त्यांनी निवडणुक आयोगाकडे संपत्ती जाहीर केली त्यात दिड कोटींचा चहाचा सेट होता. 

साल होते २०१३ चं. मध्य प्रदेश मध्ये विधानसभा निवडणूक लागली होती. भाजपने दिल्लीत खासदार असणाऱ्या एका महिलेस पुन्हा राज्यात पाठवलं होतं. १९९८ साली त्या पहिल्यांदा आमदार झाल्या होत्या. त्यानंतर २००५-०७ दरम्यान त्या मध्यप्रदेश सरकारमध्ये मंत्री देखील होत्या. २०१३ साली त्या पुन्हा विधानसभेच्या मैदानात उतरल्या आणि शिवपुरी मतदार संघातून निवडून देखील आल्या. 

त्यांच नाव यशोधराराजे सिंधिया…. 

शिेंदे अर्थात सिंधिया राजघराण्यातील सत्तेत असणार तिसरं नाव म्हणजे यशोधराराजे सिंधिया. 

स्वातंत्र्यानंतर सरदार पटेलांनी ५६२ संस्थानाचे भारतात विलीनीकरण केले खरे पण अनेक पिढ्या राजेशाही भोगलेल्या होत्या. त्यांच्या हातून “संस्थानाची” सत्ता मात्र सुटली नाही. देश स्वातंत्र्य झाला, राज्यांचे विलीनीकरण झाले राजेशाही गेली. मान-पान बंद झाले, दरबार बंद झाला, मुजरे बंद झाले आणि राजघराणी अस्वस्थ होऊ लागली.

हातातून निसटत्या सत्तेला ताब्यात ठेवण्यासाठी मग या लोकांनी राजकारणाची वाट धरली. धन संपत्तीने सधन असल्याने या लोकांना राजकारणात यश मिळाले आणि लोकशाहीच्या मार्गातून राजेशाही पुन्हा एकदा सिद्ध झाली. यामध्ये प्रत्येकजण संस्थानाची राजेशाही टिकवण्यासाठीच होता अस नाही. राजेशाही असणाऱ्या अनेकांनी लोकशाहीच्या मार्गाने लोकांच भलं करण्याच काम केलं. दोन्ही बाजू असतील.

ग्वालियरच सिंधिया घराणं यापैकी कोणत्या बाजूचं हे जो ज्या पक्षाच्या त्या पद्धतीने ठरवावं. ग्वालियरचे शासक जिवाजीराव सिंधिया आणि राजमाता विजयाराजे सिंधिया यांना एकूण पाच अपत्य चार मुली आणि एक मुलगा. पद्माराजे, उषाराजे, माधवराव शिंदे, वसुंधराराजे आणि यशोधराराजे सिंधिया.

पैकी तिघे काळाच्या ओघात राजकारणात आले. माधवराव सिंधिया कॉंग्रेसचे मोठे नेते होते. वसुंधराराजे भाजप मधून राजस्थानच्या मुख्यमंत्री राहिल्या आणि यशोधरा भाजप मधून मध्यप्रदेश सरकार मध्ये मंत्री राहिल्या.

यशोधरा राजेंचा जन्म १९ जून १९५४ साली लंडन मध्ये झाला. १९७७ मध्ये यशोधरा यांचे लग्न डॉक्टर सिद्धार्थ भंसाली यांच्याशी झाले आणि त्या पतीबरोबर अमेरिकेला गेल्या. मात्र १९९४ साली त्यांचा घटस्फोट झाला आणि यशोधरा परत भारतात आल्या. परत आल्या नंतर भाऊ माधवराव कॉंग्रेसचा एवढं मोठा नेता असून देखील त्यांनी आपल्या आई आणि बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत भाजपात प्रवेश केला. विजयाराजे सिंधिया तर भाजपच्या संस्थापक सदस्या होत्या.

यशोधराराजे १९९८ साली आमदार झाल्या. आणि त्यानंतर एका वादग्रस्त राजकीय जीवनाची सुरवात झाली. सामान्य लोकांमधून निवडून येऊनही यशोधरांचा राजेशाही थाट काही कमी झाला नाही. त्यांच्या फटकळ वागण्याने त्या सतत बातम्यांमध्ये असत.

२००५ ते २००७ मध्ये त्या शिवराज सिंग यांच्या मंत्रिमंडळात पर्यटन आणि युवक व क्रीडा खात्याच्या मंत्री होत्या. २०१३ साली परत शिवराज सिंग यांनी यशोधराना युवा विकास आणि क्रीडा खाते दिले.

यशोधरा नेहमी चर्चेत राहायच्या. कधी चालू कार्यक्रमात जनतेसमोरच अधिकार्यांना फैलावर घ्यायच्या तर कधी मनासारखी इमारत बांधली नाही म्हणून सरकारी इंजिनीअरचा अपमान करून उद्घाटन न करताच परत निघून यायच्या. कधी सभेत आपली समस्या सांगणाऱ्या अपंग माणसाचा अपमान करायच्या. तर कधी भाजपच्या राज्य संमेलनात आपल्या आईचा फोटो लावला नाही म्हणून संमेलनात नेत्यांचा अपमान करून त्या निघून जायच्या.

एकदा तर त्यांनी प्रचारा दरम्यान मतदारांना तंबीच दिली की हाताला म्हणजेच काँग्रेसला मत दिले तर आमच्या योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. या वक्तव्यानंतर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर झाला होता.

असाच किस्सा त्यांच्या दिड कोटी रुपयांच्या चहाच्या सेटचा अर्थात कपबशीचा. 

त्याचे झाले असे की, २०१३ साली त्या शिवपुरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत होत्या. राज्य निवडणूक आयोगाला दिलेल्या अॅफिडेविट मध्ये त्यांनी सर्व संपत्ती जाहीर केली होती. त्यांनी ९ कोटी २५ लाख ८० हजार इतकी संपत्ती जाहीर केली होती. राजघराण्यातील असल्याने त्यात विशेष देखील काही नव्हते.

पण संपत्तीतील एका गोष्टीने सर्वांनाच चक्रावून सोडले. संपतीत्त त्यांनी दीड कोटी रुपयांचा एक चहाचा सेट आपल्याकडे असल्याचे नमूद केले होते.

ही गोष्ट साहजिकच चर्चेचा विषय झाली सामान्य माणसाने कधी लाख रुपये पाहिलेले नसतात आणि इथे कपबशीचा सेट दीड कोटीचा. मिडियाने ही बातमी लावली आणि सर्वत्र पोहचली. विरोधकांच्या हातात देखील आईतं कोलीत मिळालं त्यांनी या गोष्टीचा विषय केला पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. यशोधरा सिंधिया पुन्हा एकदा निवडून आल्या.

NDTV च्या एका पत्रकाराने त्यांना या दिड कोटींच्या चहाच्या सेटबद्दल एकदा विचारले होते तेव्हा यशोधरा आपल्या राजेशाही ढंगात अगदी सहजपणे म्हणाल्या होत्या,

“त्यात काय एवढं आम्ही राज घराण्यातले आहोत. आम्ही लहान असताना सोन्या चांदीच्या ताटात जेवलोय.”

सिंधिया घराण्यातील संपत्तीचा वाद नेहमीच कोर्टाच्या पायऱ्यावर आणि सर्वसामान्यांच्या चव्हाट्यावर येत असतो. तेव्हा या वादाहून अधिक किंमतीवर लोकांच लक्ष असत. अस सांगितलं जात की सिंदीया घराण्यातील संपत्तीचा वाद हा साधारण ३०,००० कोटींपेक्षा जास्त रक्कमेचा आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.