बाळासाहेब देसाईंच्या टोपीखालचं डोकं बदललं कि यशवंतरावांचा पुतळा तयार !!

कर्नाटकात असले तरी बेळगाव मध्ये अनेक मराठी भाषिक लोक राहतात. महाराष्ट्राराज्य निर्मितीचा सुवर्णकुंभ दिल्लीतून आणणारे यशवंतराव चव्हाण म्हणजे जगभरातल्या मराठी माणसाचा अभिमान. त्यांचा पुतळा बेळगावात असावा अशी अनेकांची इच्छा होती. याला सीमावादाचीही झालर होती.

हे स्वप्न साकार करण्यासाठी कर्नाटकातील काही मराठी पुढारी एकत्र आले व त्यांनी यशवंतराव चव्हाणांचा पुतळा उभा करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

हा पुतळा लवकरातल्या लवकर उभा करू शकेल यासाठी शिल्पकार कोण याचा शोध घेतल्यावर कोल्हापूरच्या रविंद्र मेस्त्री यांचं नाव समोर आलं. रविंद्र मेस्त्री म्हणजे जेष्ठ चित्रकार, नेपथ्यकार, सिनेदिग्दर्शक बाबुराव पेंटर यांचे चिरंजीव. शिल्पकलेत त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती पण सोबतच स्वभावाने थोडेसे हट्टी,मनस्वी कलावंत म्हणूनही त्यांना ओळखल जायचं.

राजकारण्यांचा त्यांना प्रचंड राग होता. अशातच कर्नाटकातून बाळराजे नणदीकर, शिवाजीराव काकतकर,अर्जुनराव घोरपडे वगैरे नेतेमंडळी यशवंतरावांच्या पुतळ्या संदर्भात त्यांची भेट घेतली. रविंद्र मेस्त्री यांनी तोंडदेखल हसून त्यांचं स्वागत केल. कर्नाटकातून आलेल्या नेत्यांच्या बरोबर काही अतिउत्साही कार्यकर्ते सुद्धा होते. सर्वांचा एकच सूर होता कि,

“यशवंतरावांचा पुतळा मस्त झाला पाहिजे आणि तो दोन महिन्यात तयार झाला पाहिजे.”

रविंद्र मेस्त्री यांनी सुरवातीला ऐकून घेतलं, पूर्णाकृती पुतळा उभा करायचा म्हटल्यावर सहा महिने तरी वेळ लागणार हे समजावायचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. मग रागाच्या भरात फटक्यात उत्तर दिल,

“पुतळा करायचा म्हणजे काय चेष्टा वाटली कि काय तुम्हाला.मला जमणार नाही. तुम्ही कुणाकडूनही पुतळा करून घ्या. मी माझ्या कामाला लागतो. “

आता या मंडळींची पंचाईत झाली. काय करायचं?

मग बाळराजे नणदीकर आणि सगळी मंडळी कोल्हापूरचे खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या कडे आली. सगळ प्रकरण समजावून सांगितल, आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे, तुम्हीच रविंद्र मेस्त्री यांना समजावून सांगा. उदयसिंगराव गायकवाड हे मेस्त्रींचे चांगले मित्र होते. त्यांना त्यांचा विचित्र स्वभाव ठाऊक होता. ते म्हणाले,

“रविंद्र मेस्त्री मोठा कलाकार आहे. आपण त्याच्या कलाने घ्यायला पाहिजे.मी सांगून बघेन पण त्याने नकार दिला तर वाईट वाटून घेऊ नका.”

 

 पुन्हा सगळे मेस्त्रींच्या घरी गेले. गायकवाडांना बघून रविंद्र मेस्त्री म्हणाले,

“आता तुम्हाला घेऊन आले काय? उगीच मला गळ घालू नका. काही उपयोग होणार नाही. सहा महिने कमीतकमी लागतील.”

गायकवाडांनी कर्नाटकातून आलेल्या मंडळीना सांगितल थोडा वेळ बाहेर बसा मी बोलून बघतो. गायकवाड आणि मेस्त्री यांच्यात थोड्याफार गप्पागोष्टी झाल्या. पुन्हा सगळ्यांना आत बोलवण्यात आले. रविंद्र मेस्त्री यांनी त्यांना पुन्हा विचारले,

“किती दिवसात पुतळा हवा तुम्हाला?”

सगळे म्हणाले २ महिने. हातातली सिगरेट शिलगावीत रविंद्र मेस्त्री म्हणाले, मी एका महिन्यात देतो.

आता मगाशी सहा महिने लागतील म्हणणारा माणूस आता एका महिन्यात पुतळा देतो म्हणतोय म्हटल्यावर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पण तरी होकार मिळाल्यामुळे कर्नाटकातून आलेल्या मंडळीना प्रचंड आनंद झाला. गायकवाडांना धन्यवाद देत ते बेळगावला परत निघाले.

ते  गेल्यावर उदयसिंग गायकवाड व रविंद्र मेस्त्री चहा पीत बसले होते. मगाशी बसलेल्या धक्यातून खुद्द उदयसिंग गायकवाडसुद्धा सावरले नव्हते. त्यांनी रविंद्र मेस्त्री यांना विचारल,

“बबेराव, अरे कसा काय देणार आहेस एका महिन्यात पुतळा? “

रविंद्र मेस्त्री हसले, सिगरेटचा झुरका ओढत म्हणाले,

“त्यात काय अवघड आहे ! मागे मी बाळासाहेब देसाई यांचा पुतळा तयार केला त्याचा मोल्ड तयार आहे. धोतर, नेहरू शर्ट, जाकीट सगळ दोघांच सारख आहे. फक्त टोपी खालच डोकं तेव्हढ बदलाव लागेल. हाय काय आणि नाय काय” 

हा किस्सा उदयसिंह गायकवाड यांनी  कथा बारा अक्षरांची या पुस्तकात सांगितला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.