दिल्लीत आजही मराठ्यांशी फितुरी करणाऱ्याचं घर ‘नमक हराम की हवेली’ म्हणून ओळखलं जातं..

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य अनेक मावळ्यांनी आपलं रक्त सांडून मोठं केलं. बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर, महादजी शिंदे यांच्या सारख्या सेनानींनी केलेल्या पराक्रमामुळे अहद तंजावर तहद पेशावर अशी त्यांची कीर्ती पसरली.

याच परंपरेत येणारं आणखी एक शूरवीराचे नाव म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर.

मराठा साम्राज्याचे आणि पर्यायाने भारताचे खरे शत्रू टोपीकर इंग्रज आहेत हे यशवंतराव होळकर यांनी ओळखलं होतं. त्यांनी इंग्रजांविरुद्ध शिंदे व नागपूरकर भोसले यांना मदतीचे आवाहन केले पण हे घडू शकलं नाही.

इंग्रजांचे आणि शिंद्यांचे युद्ध झाले, त्यात त्यांचा पराभव झाला. शिंदेनाही इंग्रजांचा धोका जाणवू लागला. शिंदेंचा पाडाव केल्यावर इंग्रज सेनापती वेलस्ली याने आपले संपूर्ण लक्ष होळकर साम्राज्याकडे वळवले.

याचा अंदाज आलेल्या यशवंतरावांनी गुप्त रीत्या एक संयुक्त दल उभारण्यासाठी जयपूर, जोधपूर, उदयपूर, बेगम समरू, रोहिल्याचा मुख्य गुलाम मुहम्मद व काहीशीख राजांना पत्रे पाठविली. तसेच दौलतराव शिंद्यांकडे वकील पाठवून इंग्रजांबरोबरचा तह संपुष्टात आणण्याचे आवाहन केले.

दिल्ली पासून ते यमुनेच्या दुआबापर्यंत होळकरी सेनेचा संचार सुरु झाला. इंग्रजांची राजधानी कलकत्ता जिंकून  भारतातून हाकलून द्यायचं नियोजन करण्यात आलं.

यशवंतरावांना रोखण्यासाठी इंग्रजांतर्फे जनरल जेरार्ड लेक याची नियुक्ती झाली. तो अत्यंत अनुभवी आणि कडवा सेनानी होता. त्याने होळकरांची कोंडी करायचं ठरवलं. उत्तरेत होळकरांचे प्रस्थ वाढत असलेलं पाहून दक्षिणेतून त्यांच्यावर दबाव टाकण्याचं धोरण त्याने अवलंबलं.

हे चालू असताना यशवंतराव होळकरांनी  ८ आक्टोबर १८०४ रोजी थेट दिल्लीवर आक्रमण केलं. तेव्हाचा मुघल बादशाह इंग्रजांचा मांडलिक होऊन बसला होता. होळकरांनी घातलेल्या वेढ्याची बातमी जेव्हा त्याला कळाली तेव्हा त्याने खास दरबार भरवुन त्यांनी यशवंतरावांच्या यशासाठी मन्नती मागितल्या व यशवंतरावांना “महाराजाधिराज राज-राजेश्वर अलिजाबहाद्दुर” असा किताब बहाल केला.

यशवंतराव होळकरांनी दिल्लीच्या तटबंदीवर तोफांचा भडीमार सुरु केला. दिल्लीवर भगवा झेंडा फडकणार असं वाटत होतं. खुद्द दिल्लीतली जनता त्यांचा विजय व्हावा म्हणून प्रार्थना करत होती.

त्यांनी वेढ्याचा फास आवळला असल्याची बातमी समजताच जनरल लेक जमेल तेवढे सैन्य घेवुन दिल्लीच्या रोखाने मथुरामार्गे निघाला.

यशवंतराव होळकरांना थेट युद्धात हरवणे अशक्य आहे याचा अनुभव असणाऱ्या लेकने कुटील नीतीचा अवलंब केला. त्याने यशवंतरावांचा मित्र सल्लागार आणि होळकर सैन्यातील मुख्य सेनानी भवानी शंकर खत्री याला अमिश दाखवून फोडले. भवानी शंकर खत्री आणि अमीर खान पिंडारी हे दोघे आपलं सैन्य घेऊन इंग्रजांना जाऊन मिळाले.

ऐन युद्धात झालेल्या या फितुरीमुळे यशवंतराव होळकरांची मोठी ताकद खच्ची झाली. त्यांना वेढा उठवून माघार घ्यावी लागली.

भारताचा स्वातंत्र्यसूर्य उगवता उगवता राहिला. 

या भवानी शंकर खत्रीला नजफगडची जहागीर देण्यात आली. शिवाय त्याला लाल किल्ल्याजवळ चांदणी चौकात घाशीराम याचा आलिशान वाडा देण्यात आला. भवानी शंकर यांना बक्षी म्हणूनही ओळखलं जाई. ते या वाड्यात असलेल्या कचेरीत बसून आपल्या जहागिरीचा हिशोब ठेवायचे. त्यांनी प्रचंड पैसा कमावला मात्र त्यांनी केलेल्या गद्दारीचा डाग कधी हटला नाही.

असं म्हणतात की दिल्लीकरांच इंग्रजांचं संकट जाऊन मराठयांच राज्य होईल हे स्वप्न भंग झालेलं त्यामुळे त्यांचा भवानी शंकर यांच्यावर प्रचंड राग होता. ते आपल्या हवेलीतून बाहेर पडले की लोक त्यांना नमक हराम म्हणून हाक मारायचे.

पुढे त्यांच्या हवेलीचं नावच नमक हराम की हवेली असं पडलं.

आजही चांदणी चौकात फतेहपुरी मशिदीच्या उजव्या हतला असलेल्या गल्लीत गेलं तर दाटीवाटेने असलेल्या घराघराच्या बोळात अंग चोरून ही नमक हराम की हवेली उभी आहे. आता तिथे भवानी शंकर यांचे कोणी वंशज राहत नाहीत. काही भाडेकरू आहेत मात्र त्यांचं भाडं ५ रुपये १० रुपये इतकं कमी आहे.

असं म्हणतात की मराठ्यांना फितुरीचा शाप आहे. कित्येकदा दिल्ली जिंकण्याची संधी आपल्याच स्वकीयांमुळे वाया गेली. यशवंतराव होळकरांना यांना देखील याचा अनुभव आला होता. याच इतिहासाचा साक्षिदार असलेली नमक हराम की हवेली कधी दिल्लीला जाल तर नक्की पहा.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.