दिल्लीच्या दरबारात या मुघल बादशाहला चाबकाने फटके दिले जायचे..

मुघल बादशाह म्हणजे भारताचा सम्राट. अगदी अकबराच्या काळापासून ते औरंगजेबाच्या काळापर्यंत मुघलांचा दरारा पार इराण अफगाणिस्तान तुर्कस्तान पर्यंत पसरला होता. ताजमहाल, मयूर सिंहासन, कोहिनुर हिरा या मुघलांच्या संपत्तीबद्दल जगभरात अप्रूप होतं. त्यांचं सैन्य अभेद्य मानलं जायचं.

अस अविश्वसनीय वैभव पाहिलेल्या मुघल साम्राज्याच्या बादशाहला चाबकाचे फटके मारले जात होते हे आता वाचून पटणार नाही, पण असं एकदा खरोखर घडलं होतं.  

अठराव्या शतकातली गोष्ट. तेव्हा गादीवर होता शाह आलम दुसरा. औरंगजेबाला मराठ्यांनी धडा शिकवल्यापासून मुघल सल्तनत हळूहळू ढासळत गेली होती. पुढचे सगळे बादशाह कर्तबगार नव्हते. शाह आलमची देखील निराळी कथा नव्हती.

त्याकाळी भारतातली सर्वात शक्तिशाली सत्ता मराठ्यांची होती. महादजी शिंदेंनी दिल्लीच्या बादशाहीला अंकित करून ठेवलं होतं. पण पुण्यात उदभवलेलं राघोबा दादाचे बंड, कोल्हापूर गादीचा प्रश्न, बारभाई कारभार अशा कारणांमुळे महादजी शिंदे दक्षिणेत अडकून पडले होते.

मराठे दक्षिणेत गुंतल्याचा सर्वात मोठा फायदा उचलला रोहिल्यांनी. त्यांचा प्रमुख होता गुलाम कादिर रोहिला.मराठ्यांचा सर्वात मोठा शत्रू. याच्याच आजोबाने म्हणजे नजीब खानामुळे मराठी सेनेला पानिपतच्या युद्धात पराभव स्वीकारावा लागला होता. देशाशी दगाबाजी ही नजीब खानाच्या पुढच्या पिढ्यांमध्येही चालत आली होती.

गुलाम कादिर या बाबतीत आपल्या आजोबांच्याही दोन पावले पुढे होता. संपूर्ण देशावर राज्य करायचं स्वप्न त्याने देखील पाहिलं होतं. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुलाम कादिर रोहिलखंडातून बाहेर पडला. 

त्याच्या सोबत इस्माईल बेगचं देखील मोठं सैन्य होतं. या दोघांनी मिळून दिल्लीवर हल्ला केला. शिंदेंची फौज तिथे नसल्यामुळे कादिरला अडवणारं कोणीच नव्हतं. कादिरच्या भीतीने दिल्लीचा बादशाह असाह्य अवस्थेत किल्ल्यात लपून बसला.

रोहिल्यांची सेना दिल्लीत जरी पोहचली असली तरी लाल किल्ल्यात शिरणे एवढे सहज शक्य नव्हते. अब्दुल कादिरने बरेच प्रयत्न करून पाहिले पण लाल किल्ला अभेद्य होता. अखेर त्याने मन्सूर अली नाझी नावाच्या जनानखाण्याच्या मुख्याधिकाऱ्याला पैसे देऊन फितवले. या नाझीने किल्ल्याचे दरवाजे उघडले.

२९ जुलै १७८८ रोजी रोहिल्यांची सेना आत घुसली. गुलाम कादरने बादशाह शाह आलमला पदच्चूत केले आणि कैदेत टाकले. त्याने महमदशाह याला नामधारी बादशाह बनवलं, त्याच्याकडून १० लाख रुपयांचा करार केला आणि स्वतः कारभार हाकू लागला.

गुलाम कादिरप्रचंड क्रूर आणि पाताळयंत्री होता. त्याने या काळात दिल्लीच्या लाल किल्ल्यात अक्षरशः धुमाकूळ घातला.

रोहिल्यांनी नवीन बादशाहच्या मदतीने लाल किल्ल्यातील सगळं धन लुटलं. खजिना शोधण्याचं निम्मित करून अब्दुल कादिर जनानखाण्यात घुसला. तिथल्या बेगमांच्या अब्रू वर हात टाकला, दागदागिने काढून घेतले.

एकेदिवशी शहजाद्याना आणि बेगमला शाही दरबारात नाचायला लावलं. मुघलांना आपण तालावर नाचवू शकतो हे दाखवण्याचा त्याचा भेसूर प्रयत्न होता.

अचानक मिळालेली सत्ता गुलाम कादिरच्या डोक्यात शिरली होती. कायम दारूच्या नशेत राहणाऱ्या गुलाम कादिरने ५०० वर्षांच्या इतिहासात मुघलांचा जेवढा अपमान झाला नसेल ते सगळं केलं.

इतकंच नाही तर एकदा खुद्द बादशाह शाह आलम याला  दरबारात बोलावून सगळ्यांच्या समोर चाबकाने फोडून काढले.

प्रचंड प्रयत्न करूनही शाही खजान्याचा ठावठिकाणा कळेना झाल्यामुळे त्याने थेट बादशहाला खजिना कुठे लपवलाय हे विचारले. शाह आलमने माहिती नाही असे उत्तर दिल्यावर तक्तावर हुक्का ओढत बसलेला गुलाम कादिर भडकला. त्याने सरळ तिथून उडी मारली व स्वतःच्या हातातील पेशकबाजाने बादशहाचे दोन्ही डोळे फोडून टाकले.

सगळा दरबार गुलाम कादिरच्या या अमानुष वागण्यामुळे थक्क झाला होता. भारताचा सम्राट मदतीची भीक मागत होता पण कोणीही काही करू शकत नव्हते.

गुलाम कादिरची राजवट ही अतिशय अमानवीय जुलमी कारभाराने बरबटलेली होती. दिल्ली शहरात देखील जोरदार लुटालूट सुरू होती.

बादशहा सकट अख्खा उत्तर भारत द ग्रेट मराठा महादजी शिंदे परतण्याची वाट पहात होता.

१७८८ साली महादजी शिंदेंनी दिल्लीकडे कूच केली. फक्त हिंदूच नाही बरेचसे मुस्लिम सरदारही कादिरच्या वर्तवणुकीला कंटाळले होते. खुद्द इस्माईल बेगदेखील गुलाम कादिरने बादशाहचे डोळे फोडले हे पाहताच त्याचा गट सोडून बाहेर पडला होता. कादिरचे शेवटचे दिवस जवळ आलेत हे ओळखून त्याने मराठ्यांना साथ देण्याचं ठरवलं.

महादजी शिंदेनी राणेखानाच्या नेतृत्वाखाली तोफा व मोठं पायदळ देऊन आपलं एक दल दिल्लीवर पाठवलं तर दुसरीकडे रोहिल्यांच्या अंतर्वेदीवर हल्ला केला. अंतर्वेदीचा बचाव करण्यासाठी गुलाम कादिर दिल्ली सोडून निघाला.

इकडे मराठ्यांनी दिल्लीवर पद्धतशीरपणे कब्जा केला.

मराठ्यांचा जोर पाहून गुलाम कादिर जीव वाचवून पळू लागला तर राणे खान त्याच्या मागावर होता. मिरज किल्ल्यामध्ये त्याने आश्रय घेतला होता पण मराठ्यांनी पराक्रमाने त्याची फौज कापून काढली आणि १९ डिसेंबर १७८८ रोजी त्याला उचलून पाटील बावा म्हणजेच महादजीच्या पायाशी आणून घातले.

जुलमी गुलाम कादिरला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आणि पानिपतच्या पराभवाचा बदला ही पूर्ण केला.

शहा आलमला महादजी शिंदेंनी परत गादीवर बसवले. एका मोठ्या समारंभात अंध बादशाहने महादजींना अलिजा बहाद्दर ही पदवी व वजीरकीची वस्त्रे दिली. छत्रपतींचा सरदार व पेशव्याचा प्रतिनिधी या नात्याने महादजींनी त्याचा स्वीकार केला.

इतकंच नाही महादजी शिंदेंची मर्जी राखायची म्हणून बादशाहने देशात गोवंश बंदी चा फर्मान काढला.

महादजी दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या शाही दरबारात बादशहाच्या शेजारी बसून राज्यकारभार पाहू लागले. शिवछत्रपतींच्या राज्याचा आठवण होईल असा अंमल संपूर्ण राज्यात निर्माण केला.

महादजींचे शाह आलमवर आभाळाएवढे उपकार होते. त्याने वृंदावन, मथुरा अशी देवस्थाने मराठ्यांच्या ताब्यात दिली. पण दुर्दैवाने महादजींच्या मृत्यूनंतर मराठी सत्तेचा उत्तरेतील पाय ढासळत गेला. मुघलांना हरवून इंग्रज तिथे शिरजोर झाले.

पेशवाईतील राजकरण, सरदारांची आपापसातील भांडणे यामुळे मराठा रियासत लयास गेली. मराठयांचा हा सर्वशक्तीशाली योद्धा आणखी काही वर्षे जगला असता तर इंग्रज भारतात कधीच पाय रोवू शकले नसते हे नक्की. 

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.