छत्रपतींच्या लष्कराचं रुपांतर १९ व्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये करण्यात आलं

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट ही भारतीय लष्करातील सर्वात जुन्या रेजिमेंट पैकी एक मानली जाते. महाराष्ट्राच्या मराठी मातीला शौर्याची खूप मोठी परंपरा आहे.

इथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाच स्फुल्लिंग चेतवलं. मावळ्यांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली. स्वतःच आरमार उभारलं. गनिमी काव्याची देणगी जगाला दिली. याच सैन्याच्या जोरावर पुढच्या पिढ्यांनी मराठा साम्राज्य तंजावर ते दिल्ली भारतभर पसरवल. अटकेपार झेंडा फडकवला.

मराठ्यांची दहशत सातासमुद्रापार पोहचली होती.

व्यापाराच्या नावाखाली आलेल्या टोपीकर इंग्रजांनी हळूहळू भारतात बस्तान बसवले. मुंबई बंदरावरून थेट युरोपपर्यंत त्यांचे दळणवळण सुरु असायचे. याच मुंबईच्या संरक्षणासाठी महापराक्रमी मराठा सैन्याची पहिली रेजिमेंट १७६८ साली इंग्रजांनी उभी केली. तिला नाव दिले बॉम्बे सिपोय .

पण आपल्या पराक्रमामुळे ही बटालियन जंगी पलटण म्हणून ओळखली जायची.

कालानुरूप मराठा रेजिमेंट मध्ये एक एक करून बटालियन वाढत गेल्या. आपल्या वेगवान हालचाली मुळे ही रेजिमेंट मराठा लाईट इन्फंट्री म्हणून ओळखली जाऊ लागली. ब्रिटीश सैन्यात मराठा लाईट इन्फंट्रीने प्रचंड पराक्रम गाजवला.

साधारण याच काळात पेशवाई मधील दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा कारभार सुरु होता. त्याच्या अन्यायकारी सत्तेला जनता कंटाळली होती. त्यात त्याने ब्रिटीशांशी तैनाती फौजेचा करार करून चूक केली. आपल्याच सरदारांशी युद्ध पुकारले. पुढे ब्रिटीश त्याच्यावरच उलटले व याच चुकीचा परिणाम मराठा साम्राज्य संपुष्टात आले.

सातारा व कोल्हापूरची छत्रपतींची गादी देखील ब्रिटीशांच्या हातात आली.

ताराबाई राणीसाहेब यांच्या पराक्रमाचा वारसा सांगणारे कोल्हापूरचे युवराज चिमासाहेब असतील किंवा सातारच्या प्रतापसिंह छत्रपतींच्या दरबारातील रंगो बापू असतील यांनी ब्रिटीशांच्या विरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न केला पण तो हाणून पाडण्यात आला. नाना पेशवे, तात्या टोपे यांनी देखील उठाव केला होता पण तो ही अयशस्वी झाला.

१८५७ साला नंतर ब्रिटीशांनी भारतावर पकड मजबूत केली. सर्व संस्थांनी फौजांवर निर्बंध आणले. 

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी कोल्हापुरात छत्रपतीपदावर राजर्षी शाहू महाराज आले. ब्रिटीशांशी लढण्याची ताकद तेव्हा संस्थानकडे नव्हती. यात वेळ व उर्जा घालवण्यापेक्षा सामाजिक उपक्रम, धरणे, बाजारपेठा वसवणे, बहुजनांना शिकण्यासाठी शाळा, बोर्डिंग उभारणे या विकासकामांकडे लक्ष दिले.

शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूर अमुलाग्र बदलले. अनेक उद्योगधंद्याची स्थापना झाली. जातीजातीतील विषमता कमी झाली. बहुजनांना संधी मिळाली.

शाहू महाराजांच्या नंतर त्यांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी हा वारसा पुढे चालवला. मोफत व सक्तीचे शिक्षण सुरु ठेवले. अनिष्ठ प्रथा परंपरावर कारवाई केली. व्यावसायिक शिक्षण मिळावे म्हणून शिवाजी टेक्निकल स्कूल स्थापन केले.

याकाळात कोल्हापूरचे लष्कर म्हणजे लाल डगला, गुढघ्यापर्यंत येणारे बूट, डोक्यावर उंच फेटा, कमरेला तलवार व हातात भाला या वेशात असलेले तगडे जवान कोल्हापूरच्या रक्षणासाठी तैनात असायचे. छत्रपतींच्या लवाजम्यामध्ये घोड्यावरून जाणारे हे जवान विशेष उठून दिसत असत.

१८४५ साली तिसऱ्या शिवाजी महाराजांच्या काळात ८०० स्वार आणि ४०० पायदळाची कोल्हापूर लोकल इन्फंट्री स्थापन केली होती. याच काळात आत्ताच्या लाईन बाजार येथे स्थानिकांच्याकडून जमीन घेऊन लष्कराची रेसिडेन्सी उभी केली होती.

याच इन्फंट्रीचे हे जवान शाहू महाराज, राजाराम महाराजांच्या काळात देखील या कोल्हापूर संस्थानाच्या सुरक्षिततेसाठी तैनात होते.

त्यांच्या कॉलरवर इंग्रजी आद्याक्षरामध्ये KLI असे लिहिलेले असे.

अंतर्गत सुरक्षिततेसाठी नेमणूक असल्यामुळे त्यांना पहिल्या महायुद्धात सहभागी करून घेतले नव्हते. कोल्हापूर शाही घोडदळातील म्हणजेच रिसाल्याच्या जवानांना मुंबईच्या गव्हर्नरच्या बॉडीगार्डसमध्ये स्थान देण्यात आले.

पुढे १९३९ साली ही पलटण बरखास्त करून नवीन आधुनिक पलटण बनवली. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यू नंतर १ जुलै १९४१ रोजी या पलटणीचे नाव देण्यात आले,

राजाराम रायफल्स.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोल्हापुरातील अनेक तरुण या रेजिमेंटमध्ये दाखल झाले. त्यांना फिरोझपूर, विशाखापट्टणम येथे तैनात केले होते. पुढे वायव्यसरहद्दीवर त्यांची रवानगी केली गेली. या युद्धात अनेक कोल्हापूरच्या जवानांनी पराक्रम गाजवला.

पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राजाराम रायफल्सची नेमणूक रांची येथील दिप्तोली लष्करीतळावर करण्यात आली. राजाराम रायफल्सने हैद्राबादच्या निजामावर केलेल्या लष्करी कारवाईमध्ये सहभाग नोंदवला.

वरंगळ व करीमनगर भाग रझाकारांच्या कचाट्यातून राजाराम रायफल्सने सोडवला.

अखेर ४ जून १९४९ रोजी छत्रपतींचा वारसा असणाऱ्या या राजाराम रायफल्सला मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये समाविष्ट करून १९ व्या बटालियनचा दर्जा देण्यात आला. आजही ही तुकडी भारतीय सैन्यदलाच्या अभिमान म्हणून ओळखली जाते. माजी लष्करप्रमुख जोगिंदरसिंग यांनी या तुकडीचा आपल्या पुस्तकात विशेष उल्लेख केलेला आहे.

संदर्भ- कोल्हापूर दैनिक सकाळ

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.