सचिनशी झालेल्या पहिल्या भेटीची आठवण आजही युवराजसिंगला भावूक बनवते

१० जून २०१९. भारतीय क्रिकेटने पाहिलेला सर्वात फ्लॅमबॉंएण्ट क्रिकेटर युवराजसिंगने रिटायरमेंट घेतली. त्याने मारलेले अनेक छक्के प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या हृदयात कोरले गेलेले आहेत.

गांगुलीच्या नेतृत्वाखाली जगावर राज्य करणाऱ्या टीम इंडियाचा तो सर्वात घातक अस्त्र होता.

काल युवीच्या रिटायरमेंटला १ वर्ष पूर्ण झालं. या निमित्ताने त्याचा गुरू, त्याचा आदर्श, त्याचा मेंटोर असलेल्या सचिन तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली.

सचिन म्हणाला,

“युवी तुला निवृत्त होऊन एक वर्ष पूर्ण झाले. तुझ्यासोबत पहिल्यांदा मी 2000 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळलो पण तुझ्याबद्दलची माझी पहिली आठवण त्याही आधीची म्हणजे चेन्नई कॅम्पची आहे.

मला नक्की आठवतंय तू शरीराने खूप सशक्त आणि पाँईन्टवर खूप वेगवान होतास. मला तुझ्या षटकार मारण्याच्या क्षमतेविषयी बोलण्याची गरज नाही. हे तेव्हाही मला जाणवलं होत की , जगातील कोणत्याही मैदानावर कोणत्याही बॉलरचा चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवण्याची क्षमता तुझ्याकडे आहे.”

सचिनने युवराज सोबतच्या पहिल्या भेटीची पोस्ट टाकल्यावर युवराजसुद्धा प्रचंड भावनिक झाला.

त्या पोस्टला दिलेल्या रिप्लाय मध्ये तो म्हणतो की,

“थँक यु मास्टर, मला मिळालेला हा आजचा बेस्ट मेसेज आहे.

मला अजून आठवतंय जेव्हा तु मला पहिल्यांदा भेटला होतास तेव्हा माझ्या हातात हात मिळवला होता. मी त्यांनंतर माझाच हात माझ्या अंगावर फिरवला आणि त्यांनंतर दिवसभर अंघोळ केली नाही.

मला हेही आठवतंय की माझ्या किट बॅग मध्ये तुझा फोटो असायचा. जेव्हा चेन्नई मध्ये तु माझ्या शेजारी बसलास तेव्हा मला वाटलं माझा देव त्या किट बॅगमधून निघून माझ्या शेजारी येऊन बसला आहे.

मैदानात आणि मैदानाबाहेर कस वागायचं हे आम्ही तुझ्याकडून शिकलो.

माझ्या आयुष्यातल्या काही कठीण प्रसंगी तु माझ्या सोबत होतास. विशेषतः 2011 च्या वर्ल्डकप पूर्वी मी फिटनेस आणि फॉर्ममुळे चिंतेत होतो तेव्हा तुच मला नवी उमेद दिलीस, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं.

जसं तू आमच्या जीवनात रोल मॉडेल ठरलास आम्हाला शिकवलस तसच मला पुढच्या पिढीच्या क्रिकेटर्स साठी करायचा माझा प्रयत्न राहील.”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.