भारतभरात कुठेही जा, खतांसाठी शेतकऱ्यांचा हक्काचा ब्रँड म्हणजे ” जय किसान”

भारत हा कृषीप्रधान देश आहे, शेती निगडित गोष्टींवर इतर अनेक व्यवसायही चालतात. त्यातला एक व्यवसाय आणि जो सर्वोतोपरी महत्वाचा मानला जातो तो म्हणजे खत. खतांच्या विविध व्हरायटी असतात, त्यातून शेतीला पूरक कुठले आणि हानिकारक कुठले याचीसुद्धा चाचणी केली जाते. रासायनिक खतांच्या बाबतीत महाराष्ट्र आणि भारतभरात सगळ्यात जास्त वापरला जाणारा ब्रँड म्हणजे जय किसान.

झुवारी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड हि कंपनी बऱ्याच शेतकरी लोकांच्या परिचयाची आहे. शेतीसाठी लागणारे खत आणि त्यातील व्हरायटी हि कंपनी देते. पण शेतकऱ्यांसाठी देवदूत म्हणून धावून आलेल्या या कंपनीचा इतिहास खूप मोठा आहे आणि जय किसान ब्रँड कसा तयार झाला याविषयी आपण जाणून घेऊया.

साधारण १९६५ साली पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी केलेली एक घोषणा जगप्रसिद्ध झाली होती, ती घोषणा होती जय जवान जय किसान.देशासाठी लढणारे जवान आणि जनतेला जगवणारे शेतकरी हे सारख्या अर्थाने महत्वाचे आहेत हे शास्त्रीजींनी ठरवलं होतं.

त्यांच्या या घोषणेला मनावर घेतलं भारतातल्या एका सुप्रसिद्ध उद्योगपतीने. नाव केके बिर्ला.

झुवारी ऍग्रो केमिकल्स लिमिटेडची स्थापना प्रख्यात भारतीय उदयॊगपती डॉ. केके बिर्ला यांनी १९६७ मध्ये सुरु केली होती.

१९७४ पासून त्यांनी उत्पादन सुरु केलं. झुआरीची उत्पादने जय किसान या ब्रॅण्डद्वारे विकली जातात.

झुआरी केमिकल अँड फर्टीलायझर या नावाने सुरु झालेल्या या कंपनीचे तीन वेळा नाव बदलण्यात आले पण त्यातील झुआरी हा शब्द टिकून राहिला.

झुआरी कंपनी हि अशी कंपनी आहे जी भारतीय शेतकऱ्यांच्या प्रगती आणि समृद्धीमध्ये भागीदार असते. खेडेगावातील शेतकऱ्यांना परवडणारी आणि प्रभावी अशी खते पुरवून झुआरी कंपनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करते. झुआरी कंपनीचं उद्दिष्टच हे आहे कि शेती हि आर्थिकरित्या शेतकऱ्यांना बळकटी देईल आणि शेतीकडे लोकं जास्तीत जास्त वळतील.

कंपनीची लोकप्रियता हि आजही टिकून आहे. मिळणाऱ्या नफ्यातून या कंपनीने चंबळ फर्टीलायझर्स हा आणखी एक रासायनिक खत कारखाना उभारला. केके बिर्ला यांच्या निधनानंतर त्यांच्या उद्योगसमूहांची तीन मुलींमध्ये वाटणी होऊन रासायनिक खते व साखर कारखान्यांच्या कंपन्या कन्या ज्योत्स्ना पोतदार यांच्या वाटय़ाला आला. बिर्लाच्या पश्चात त्यांच्या सर्वच कंपन्यांनी मूळ बिर्ला समूहापासून आपली नाळ तोडून स्वत:चे वेगळे अस्तित्व राखण्याचे धोरण स्वीकारले.

ज्योत्स्ना पोतदार यांच्या वाटय़ाला आलेल्या कंपन्या ऍडव्हान्टेज समूहाचा भाग बनल्या. झुआरी ऍग्रो केमिकल्स ही ऍडव्हान्टेज समूहाची कंपनी म्हणून ओळखली जाते. सरोजकुमार पोद्दार यांच्या नेतृत्वात आज ऍडव्हान्टेज समूह उच्च स्थानावर आहे. शेतीसाठी नवनवीन उपक्रम तयार करून शेतकऱ्यांच्या आर्थिक गोष्टीकडे दुर्लक्ष होणार नाही याचीही काळजी झुआरी ऍग्रो कंपनी घेते.

झुआरी ऍग्रो केमिकल्समध्ये वास्को संकुलात रासायनिक खते तयार करण्याचे चार प्रकल्प आहेत.

त्यात युरिया डीएसपी, एसएसपी, एनपीके अशी रासायनिक खते तयार होतात.

पण झुआरी कंपनी रासायनिक खते जय किसान [ युरिया ] या मुख्य नावाखाली जय किसान सम्राट, जय किसान संपूर्ण, जय किसान संपत्ती आणि जय किसान सुरक्षा या नावाने विकते.

या कंपनीने आपल्या विविध इतर छोट्यामोठ्या शाखांद्वारे बी बियाणे, कीटकनाशके, सूक्ष्म खाद्यान्न, विशेष खते अशा प्रकारात प्रवेश केला आहे आणि त्याला मागणीही जोरदार आहे. ज्यावेळी झुआरी कंपनीने कावेरी सीड्स वर प्रक्रिया केली तेव्हा त्यांना आढळून आलं कि या व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. केवळ मोठ्या शहरांपुरतं मर्यादित न राहता हि कंपनी आपली खते गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तामिळनाडू या राज्यांमध्ये विक्री करते.

शेतकऱ्यांसाठी अगदी सवलतीच्या दरात हि झुआरी कंपनी खते उपलब्ध करून देते. जय किसान हा ब्रँड तर अगदी भारतभरात फेमस आहे. खताच्या दुकानांमध्ये जय किसान या ब्रॅण्डची मोठी मागणी केली जाते. जय किसान हा या ब्रँडने कंपनीचं नाव भारतात पोहचवलं. लोकप्रियतेच्या बाबतीत झुआरी आणि जय किसान दोघेही टॉपला आहेत.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.