दर वाढवताना ८ प्रकारच्या खतांचे वाढवले, पण कमी करताना मात्र एकाचेच केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री ट्विट करतं शेतकऱ्यांना जुन्याचं दरात खत मिळणार असल्याचं जाहिर केलं. ते म्हणाले,

जरी आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढल्या असल्या तरी आम्ही शेतकऱ्यांना जुन्याचं दरात खत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजच्या निर्णयानंतर DAP खताचं एक पोतं २४०० रुपयांच्या जागी १२०० रुपयांनाच मिळेल.

पण नरेंद्र मोदी यांच्या या शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयानंतर देखील सध्या शेतकऱ्यांकडूनचं टिका होत असल्याचं दिसून येतं आहे. कारण दर वाढवताना जवळपास ५ ते ६ वेगवेगळ्या मिश्र प्रकारच्या खतांचे दर वाढवले होते, मात्र कमी करताना केवळ DAP याचं खताची किंमत कमी केली आहे, केवळ याच खताला अनुदान देण्याची घोषणा केली आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

साधारण १२ मे रोजी खतांच्या दुकानात खत खरेदी करायला गेल्यावर शेतकऱ्यांना समजले की खतांच्या दरात वाढ झाली आहे. यूरिया सोडून जवळपास इतर सगळ्या खतांचे जसं की DAP, NPK, NP दर तब्बल ५८ टक्क्यांनी वाढले होते.

याआधी देखील म्हणजे मार्च आणि एप्रिलमध्ये या भाववाढ करण्याची चर्चा सुरु होती, ७ एप्रिल रोजी इफकोनं तसं परिपत्रक देखील काढलं, मात्र त्यावेळी लगेचच हा निर्णय मागं घेण्यात आला होता. सरकारनं देखील यशस्वी हस्तक्षेप केला होता. 

मात्र त्यानंतर लगेच एक महिन्यामध्ये म्हणजे १२ मे च्या दरम्यान पुन्हा या खतांची वाढ करण्यात आली. या वाढलेल्या किमती पुढील प्रमाणे होत्या..

रासायनिक खतांचे जुने व नवीन दर

खतांचा प्रकार,  जुने दर,   नवीन दर

(इफको)

डीएपी – ११८५ – १९००

१०:२६:२६ – ११७५ – १७७५

१२:३२:१६ – ११९० – १८००

२०:२०:० – ९७५ – १३५०

आयपीएल

डीएपी – १२०० – १९००

२०:२०:० – ९७५ – १४००

पोटॅश – ८५० – १०००

महाधन

१०:२६:२६ (स्मार्टटेक) – १२७५ – १९२५

२४:२४:० – १३५० – १९००

२०:२०:०:१३ – १०५० – १६००

जीएसएफसी (सरदार)

१०:२६:२६ – ११७५ – १७७५

१२:३२:१६ – ११९० – १८००

२०:२०:०:१३ – १००० – १३५०

डीएपी – १२०० – १९००

सुपर फॉस्फेट – ४०० – ५००

 सुपर फॉस्फेट (पावडर) – ३७० – ४७०

या नंतरच खतांच्या किमती कमी करण्याच्या बाबतीत मागणी होऊ लागली… 

किंमती वाढवल्यानंतरचे ८ दिवस शेतकरी, विविध शेतकरी संघटना, राज्यातील राजकीय पक्षांकडून, नेत्यांकडून या किमती कमी करण्याबाबत मागणी होतं होती. यात अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहिलं होतं.

यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून खतांच्या किमतीतील दरवाढ मागे घेण्याची मागणी केली होती.

त्याआधी खुद्द भाजपकडून खासदार रक्षा खडसे आणि खासदार प्रितम मुंडे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या खताच्या किंमती कमी करण्यासंदर्भात विनंती केली होती.

या दरम्यान केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे संकेत देण्यात आले. 

१५ मे रोजी कृषी मंत्रालयानं सांगितलं कि,

“शेतकऱ्यांना परवडेल अशा दरात खत उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार कटीबद्ध आहे. खतातील पोषक घटकांच्या आधारे खत उत्पादक कंपन्यांना अनुदान दिलं जातं, जेणेकरून कंपन्या शेतकऱ्यांना परवडेल अशा दरात खते उपलब्ध करून देऊ शकतील.”

या नंतर सरकारनं खतांच्या किमती कमी कारण्याबाबत आणि अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला.

या सगळ्या दबावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री ट्विट करतं सांगितलं की,
शेतकऱ्यांचं जीवन चांगलं बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढल्या असल्या तरी आम्ही शेतकऱ्यांना जुन्याचं दरात खत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजच्या निर्णयानंतर DAP खताचं एक पोतं २४०० रुपयांच्या जागी १२०० रुपयांनाच मिळेल.

त्यासाठी सरकारकडून DAP खतांवरील अनुदानात १४०% वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सरकार अतिरिक्त १४ हजार ७७५ कोटी रुपयांची सबसिडी देणार आहे.

सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात काय होतं?

khat

तसं पाहिलं तर हा शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय होता. मात्र याच निर्णयानंतर आज शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारवर टिका करण्यास सुरुवात झाली.

संगमनेरमधील मुरलीधर बाबर हे शेतकरी खतांच्या किंमती कमी झाल्या असल्याने आज NPK -10:26:26 हे खत आणायला गेले. मात्र त्याठिकाणी त्यांना नव्या दरात म्हणजे १ हजार ७७५ रुपयांनाच मिळालं. केवळ DAP या एकाचं खताची किंमत कमी झालं असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे त्यांनी इतर खतांच्या किंमती कमी कधी होणार असा सवाल करतं सरकारवर टिका केली.

या बाबत खात्री करुन घेण्यासाठी ‘बोल भिडू’ने इंदापूर येतील खत विक्रेते योगेश गोळे यांच्याशी संपर्क साधला.

त्यांनी सांगितले हो हे खरं आहे. केवळ DAP या एकाच खताच्या किमती कमी झाल्या आहेत. याच खताला अनुदान मिळतं आहे. बाकीच्या म्हणजे १०:२६:२६, १२:३२:१६ – २०:२०:२०, पोटॅश अशा इतर मिश्र खतांच्या किमती अद्याप नव्याने वाढवलेल्या किंमती तशाच आहेत.

या निर्णयाचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल याबाबत बोलण्यासाठी ‘होय आम्ही शेतकरी’ या समूहाचे संस्थापक डॉ. अंकुश चोरमुले यांच्याशी संपर्क साधला.

डॉ. चोरमुले ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले, एकतर या खरीप हंगामात DAP खताचा इतर खतांच्या तुलनेत थोडा जास्त वापर होतो. इतर खत देखील खरेदी केली जातात पण अशातच जर इतर खतांच्या तुलनेत दर कमी असल्यामुळे शेतकरी केवळ DAP खत वापरतील. दुसरं कोणतं मिश्र खतचं खरेदी करणार नाहीत. यामुळे पुढे जावून शॉर्टेज होण्याची भीती आहे.

सोबतच सरकारकडून इतर खतांच्या दराबाबत स्पष्टता आणणं गरजेचं आहे, असं देखील चोरमुले म्हणाले.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.