राज ठाकरे म्हणाले, १०वी -१२वी वाल्यांना पास करा. पण विद्यार्थी-पालकांना नेमकं काय वाटत?

कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या कडक निर्बंध आणि आठवड्याच्या शेवटी पूर्ण लॉकडॉऊन अशी परिस्थिती आहे. पुण्यात देखील अत्यावश्यक सेवा वगळता सार्वजनिक वाहतूकीसोबत इतर दुकान आणि ऑफिसेस बंद आहेत. जवळपास सगळ्यांनीच वर्क फ्रॉम होम दिलं आहे. सरकारी कार्यालयात देखील केवळ अत्यावश्यक लोकांनाच प्रवेश दिला जात आहे. सरकारनं देखील तसेच निर्देश दिले होते.

एका बाजूला हे सगळे कडक नियम असताना दुसऱ्या बाजूला सरकार पुढच्या काही दिवसात दहावी बारावीच्या परीक्षा घेत आहे.

मात्र आज सकाळी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या परीक्षांना विरोध करत दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करावं असं मत मांडलं. ते म्हणाले, 

विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलं आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट केलं पाहिजे. कारण ही लहान मुलं कोणत्या मानसिकतेमध्ये असतील याची आपल्याला कल्पना नाही. अभ्यास कसा करणार आहेत? परीक्षा कशा देणार आहेत? निकाल कसा येणार आहे? याचं कोणतंही उत्तर नाही.

त्यामुळे इतर इयत्तांसारखे या विद्यार्थ्यांना देखील प्रमोट करायला हवं.

पण यानंतर विद्यार्थी आणि पालकांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर आपलं मत मांडायला सुरुवात केली आहे. काहींनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे तर काहींनी परीक्षा व्हाव्यात असं म्हणणं मांडलं आहे.

दहावीत शिकणारा ओम साळुंखे म्हणतो, सगळीकडे कडक नियम असताना,

फक्त आम्हीच आमचा जीव का धोक्यात घालायचा?

दहावीतच शिकणारा ऋषिकेश काळे म्हणतो, 

एकतर कोरोनाचे रुग्ण सातत्यानं वाढत आहेत, आणि दुसरं म्हणजे या कोरोनाकाळात आम्ही ऑनलाईन शिक्षण घेतलं आहे, काहींना ते देखील मिळालं नव्हतं. मग असं असताना परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी?

तर बारावीतील सुजय यादवचे पालक, विष्णू यादव म्हणतात, 

सगळीकडे निर्बंध असताना परीक्षेच्या नावाखाली आमच्या मुलांचा बळी दिलं जातं आहे? मात्र आम्हाला मुलांच्या जिवापेक्षा परीक्षा महत्वाच्या नाहीत.

बारावीतील भूषण जाधवचे पालक, जयश्री जाधव म्हणतात, 

मुलं यावर्षी आजारातून वाचले तर पुढच्या परीक्षा देऊ शकतील. नवीन स्ट्रेन एवढा भयंकर रूप धारण करतं असताना आम्ही मुलांचा जीव का म्हणून धोक्यात घालायचं?

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने दहावी आणि बारावीच्या परीक्षा जूनमध्ये घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.

तसं पत्रच त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना लिहिलं आहे. या पत्रात म्हंटलं आहे की, राज्यात जमावबंदी आहे. त्यामुळे ५ पेक्षा एकत्र जमण्यास बंदी आहे. त्यामुळे साहजिकच नियमानुसार ५०० विद्यार्थी एका केंद्रावर जमू शकत नाहीत.

जून मध्ये दिवसाला २ पेपर्स घ्या, सार्वजनिक सुट्टीदिवशी देखील पेपर घ्या असं देखील या पत्रात म्हंटलं आहे.

यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांचा ट्विटरवर #cancelboardexams2021 चा ट्रेंड चालू आहे.

यात एका ट्विटनुसार मेक्सिकोमध्ये १३०० रुग्ण असून देखील परीक्षा रद्द केल्या आहेत. सौदी अरेबियामध्ये ५४१ रुग्ण तर परीक्षा रद्द, कुवैतमध्ये १४०० रुग्ण तर परीक्षा रद्द. मात्र महाराष्ट्रात आणि भारतात एवढे रुग्ण वाढत असून देखील परीक्षा घेतल्या जात आहेत.

तर समप्रीत कुलकर्णी नामक एका पालकांनी ट्विटमध्ये बोर्डाच्या एका पुस्तकातील संदर्भ देत बदलत्या परिस्थितीनुसार कसे निर्णय बदलले पाहिजेत याबद्दल सांगितलं आहे. त्यामुळे आता केवळ थेरी न वाचता प्रॅक्टिकल करूया असं म्हंटलं आहे.  

तर मानस निकम यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन करतं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना विद्यार्थ्यांच्या भावना समजतं नाहीत असं म्हंटलं आहे.

ओम कावरे या विद्यार्थ्यांनं महाराष्ट्रातील सद्य परिस्थितीचा हवाला देत ‘या परिस्थितीमध्ये तुम्ही ऑफलाईन परीक्षा घेत आहात असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

दुसऱ्या बाजूला परीक्षा झाल्या पाहिजेत असा देखील एक मत प्रवाह दिसून येत आहे. 

संदीप कदम या पालकांच्या मते दहावी, बारावी हे वर्ष विद्यार्थ्यांच्या भविष्याची दिशा ठरवणार वर्ष आहे. जर याच टप्प्यावर मूल्यमापन नाही झालं तर पुढचं काय? भविष्यात नोकरी मागताना कोविड प्रमोट बॅच असा शिक्का बसलेली बॅच म्हणून ओळखली जाईल.

तर निखिल नामक एका व्यक्तीनं फेसबुकवर राज ठाकरे यांच्या भूमिकेवर आपलं म्हणणं मांडलं आहे. ते म्हणतात, एवढंच करायचं होतं तर मागच आणि हे शैक्षणिक वर्ष प्रमोट करण्यातच घालवायच.

तर मुरलीधर गोरे म्हणतात, विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता पुढे नेले तर त्यांच्या ज्ञानाचे मूल्यमापन कसे करणार? पुढच्या अभासक्रमाचे प्रवेश कशाच्या आधारे करणार? सर्व कामे कोरोना असतानाही करता आली पाहिजेत.

सुरेश जधार देखील अशीच मागणी करतात. ते म्हणतात किमान दहावी बारावी परीक्षा झाली पाहिजे. इंजिनिअर मेडिकल प्रवेश कसे होणार?

10th 

महाराष्ट्र सरकारची भूमिका काय आहे?

एप्रिल आणि मे मध्ये होणाऱ्या परीक्षा घेण्यावर राज्य सरकार सध्या तरी ठाम आहे. त्यामुळे या या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांसहित सर्व शैक्षणिक कर्मचाऱ्यांना लस घेणे किंवा कोरोनाची आरटीपीसीआर ही चाचणी परीक्षांच्या ४८ तासांपूर्वी निगेटिव्ह आल्याचा अहवाल सोबत असणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

तसचं विद्यार्थ्यांना दिलासा म्हणून शिक्षण विभागानं लेखी परीक्षेसाठी अर्ध्या तासाची वेळ वाढवून दिली आहे. परीक्षेची केंद्र हे ते शिकत असलेल्या शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात असणार आहे.

मात्र यातील अनेक बाबींवर सरकारकडून स्पष्टता मिळणं गरजेचं आहे. 

जसं कि, विद्यार्थ्यांचा पेपर शनिवारी आला तर पूर्ण लॉकडॉऊन असताना विद्यार्थी परीक्षा केंद्रांपर्यंत कसे पोहचणार?

परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यास, त्यांच्या कुटुंबातील कोणाला कोरोनाची लागण झाल्यास किंवा कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यास संबंधित जून मध्ये परीक्षा देण्याची प्रक्रिया काय असणार आहे?

वर्गातील एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यास त्यानंतर इतरांना क्वारंटाईन व्हावे लागेल का? आणि किती दिवस? त्यावेळी परीक्षा कशा द्यायच्या. 

विद्यार्थ्यांना संपूर्ण परीक्षेदरम्यान मास्क, हँड ग्लोव्ह्ज वापरायचा आहे का?

इतर राज्यात काय परिस्थिती?

हिमाचल प्रदेशमध्ये १३ एप्रिलपासून, मध्यप्रदेशमध्ये ३० एप्रिलपासून, झारखंड ४ मे पासून तर उत्तरप्रदेशमध्ये ८ मे पासून परीक्षा होणार आहेत. तर सीबीएससीच्या परीक्षा ४ मे पासून सुरु होणार आहेत.  मात्र याठिकाणी देखील #cancelboardexams2021 या ट्रेंडवरुनच संबंधित राज्य सरकारच्या आणि सीबीएससी सारख्या केंद्रीय बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे.

मानस भारद्वाज यांनी म्हंटलं आहे कि, नरेंद्र मोदींनी विचार करायला हवा. जर आम्ही विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी पात्र असू तरी तिथं गेल्यावर आम्ही कोरोना पॉजिटीव्ह होणार आहे. त्यामुळे या परीक्षा रद्द करण्यात याव्यात.

 

वकील आणि बालहक्क तज्ञ असलेल्या अनुभा सहाय यांनी पालक आणि विद्यार्थी सगळेच चिंतेत असल्याचं म्हंटलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सरळ १० वी, १२ वीला प्रमोट करण्याची मागणी त्यांनी केली आहे.   

सोबतच माध्यमातील बातम्यांनुसार केंद्र सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहचवण्यासाठी १० एप्रिल रोजी विद्यार्थी आणि पालकांना इंडिया गेटवर एकत्र येण्याच आवाहन केलं आहे,

एकूणच दोन्ही बाजूनी संमिश्र अश्या प्रतिकिया दिसून येत आहेत. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा घ्याव्यात का? असं एक कोडचं निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आपण देखील आपलं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा.

हे हि वाच भिडू.

1 Comment
  1. नवीन says

    भिडू अश्लीश जाहिराती नका दाखवत जाऊ घरी मोबाईल असतो

Leave A Reply

Your email address will not be published.