कोरोनावरच्या उपायाचा ‘सांगली पॅटर्न’, आता २ इंजेक्शनमध्ये आजार बरा होणार आहे भिडू…
गावाकडे काही होतं नाही, गावात काही सुविधा नसतात, नोकरीला काही स्कोप नाही गावात अशी सतत रडगाणी सांगणाऱ्यांसाठी एक गावाकडची पण जागतिक पातळीवर महत्वाची असलेली गोष्ट आज सगळ्या शहरातल्या आणि गावाकडच्या भिडूंसाठी.
सगळं जग २०२० पासून कोरोनावर लस किंवा औषध बनवण्याच्या मागे लागला, एका-पेक्षा एक देशांनी दावे करत या स्पर्धेत उडी घेतली. इस्रायलने तर मे मध्येच जाहीर केलं कि आम्ही कोरोनावर लस शोधली आहे. भारत पण या सगळ्या स्पर्धेत मागे नव्हता. इथल्या पण बऱ्याच कंपन्या लस बनवण्याचे दावे करत होत्या.
मात्र त्याच वेळी आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील ३२ शिराळ्यात मात्र एक शांतीत क्रांती सुरु होती. ही क्रांती होती अँटीबॉडी प्रयोग करून कोरोनावर प्रभावी इंजेक्शन बनवण्याची.
सबंध जग लस तयार करण्याच्या स्पर्धेत असताना ३२ शिराळा मधील आयसेरा बायोलॉजिकल या कंपनीच्या शास्त्रज्ञांच्या डोक्यात हे काही तरी वेगळचं सुरु होतं. अगदी शांततेत हा प्रयोग सुरु केला होता.
लस निर्मिती क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या या कंपनीने या आधी सर्पदंश, विंचू, मलेरिया यावरच्या अत्यंत प्रभावी औषधांची जगभर निर्यात केली आहे. या सगळ्या अँटिबॉडीज् त्यांनी घोड्याच्या रक्तामध्ये त्या रोगांचे जंतू टोचूनच बनवल्या आहेत. सर्वसामान्यपणे जगात इतर ठिकाणी देखील याच पद्धतीने ह्या अँटिबॉडीज बनवल्या जातात.
पण शिराळच्या या कंपनीने या पद्धतीमधला प्रयोग कोरोना आजारावर करायचं ठरवलं, आणि आता अखेरीस त्यांना यश आलं आहे.
आता तुम्ही म्हणालं इंजेक्शन का म्हणतं आहे? सरळ लस म्हणा की. तर त्याआधी लस आणि इंजेक्शनमधला बेसिक पण नेमका फरक समजून घ्या.
कोरोनाची लस दिल्यानंतर रुग्णाच्या शरिरात कोरोनाविरुद्ध लढणारी अँटिबॉडीज् तयार होतात. याला ‘अॅक्टिव्ह इम्युनायझेशन’ म्हणतात.
मात्र एखाद्या व्यक्तीनं कोरोनाची लस घेतलेली नाही आणि त्यास कोरोना झाला तर उपचाराचा महत्त्वाचा भाग म्हणून त्याला कोरोनाविरुद्ध लढणार्या अँटिबॉडीज् इंजेक्शनच्या माध्यमातून टोचल्या जातात.याला पॅसिव्ह इम्युनायझेशन म्हणतात.
शिराळ्यात तयार झालेले अँटिकोव्हिड सिरम हे लस नव्हे तर इंजेक्शन आहे आणि ते रुग्णांना दिल्यास रुग्ण आजच्यापेक्षा फार स्पीडनं बरा होऊ शकेल. थोडक्यात आयसेरानं कोरोनावर उपचारासाठी लागणारं इंजेक्शन शोधून काढलं आहे.
इंजेक्शन बनविण्यापाठीमागे नेमकी कंन्सेप्ट काय होती?
याबाबत कंपनीचे संचालक डॉ. दिलीप कुलकर्णी ‘बोल भिडू’शी बोलताना सांगतात,
आयसेरा बायोलॉजिकलने नेमका काय शोध लावला आहे हे जरा डिटेलमध्ये सांगायचं म्हंटलं तर आम्ही ‘अँटिकोव्हिड सिरम’ नावाचे इंजेक्शन तयार केलं आहे. आणि हे एक किंवा दोन इंजेक्शन दिल्यानंतर कोरोना रुग्ण ठणठणीत बरा होऊ शकतो.
यात मेन कन्सेप्ट आहे ती म्हणजे कोरोनाचे विषाणू टोचून घोड्याच्या शरीरात अँटिबॉडीज् म्हणजेच प्रतिपिंडे तयार करायची आणि मग अँटिबॉडीज असलेल्या घोड्याच्या रक्तातील अतिशुद्ध ‘अँटिसेरा’ काढून तयार केलेलं इंजेक्शन कोरोना रुग्णांना द्यायचं. त्यामुळे रुग्णांच्या शरीरातील कोरोनाचा विषाणू नष्ट होतो, अशी सगळी ही प्रक्रिया आहे.
हैदराबादच्या कंपनी आधीच मारली बाजी…
खरतरं हा सगळा प्रकल्प ‘आयसीएमआर’ने मागच्या वर्षीच जाहीर केला होता. यात हैदराबादमधील्या एका खासगी कंपनीच्या सहयोगाने हा अँटिसेरा विकसित केला जाणार असल्याचं ‘आयसीएमआर’ने म्हटलं होतं. पण अजून पर्यंत काही प्रगती झालेली नाही.
पण आता मात्र शिराळ्यातील आयसेरा बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं कोरोना विषाणूला संपवण्यासाठी ‘अँटिकोव्हिड सिरम’ इंजेक्शनच्या सर्व चाचण्या पूर्ण केल्याची गुड न्युज दिली आहे.
कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लस तयार करणाऱ्या पुण्यातील प्रिमीयम सिरम या कंपनीचा कोव्हिडवर संशोधन आणि विकासासाठीचा करार आहे. त्यामुळे त्यांची देखील या इंजेक्शन निर्मीती प्रक्रियेमध्ये याआधी कंपनीला मोठी झाली आहे आणि इथून पुढच्या काळात उत्पादनामध्ये देखील मदत होवू शकणार आहे.
डीसीजीआय आणि आयसीएमआरच्या परवानगीची प्रतिक्षा
सद्यस्थितीमध्ये या इंजेक्शनच्या प्राण्यांवरील चाचण्या यशस्वी झाल्या असून मानवी चाचण्यांसाठी आता या इंजेक्शनला ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया यांच्या परवानगीची गरज आहे.
त्यानंतर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआर’ची परवानगी मिळावावी लागणार आहे. आयसीएमआर’नं आधी पुण्याच्या सिरमनिर्मित ‘ कोव्हिशिल्ड’ला परवानगी दिली आणि त्यानंतर भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ला ही परवानगी दिली.
या परवानग्यानंतरचं या दोन्ही लसी रुग्णांना दिल्या जाऊ लागल्या. या इंजेक्शनच पण तसचं आहे. घोड्याच्या अँटिसेरापासून तयार केलेले हे इंजेक्शन देखील ‘आयसीएमआर’च्या परवानगीशिवाय रुग्णांना वापरता येणार नाही.
पण एकदा का या इंजेक्शनच्या मानवी चाचण्या यशस्वी झाल्या आणि त्यानंतर रुग्णांवर उपचारासाठी वापरता यायला लागलं तर हे इंजेक्शन बुक्काच करणार आहे.
त्याचं कारण आताच्या या घडीलाच प्रायोगिक तत्त्वावर आयसेरा बायोलॉजिकलचे इंजेक्शनचे जवळपास ३ लाख डोस तयार आहेत. तर केंद्राच्या परवानगीनंतर दरमहा पाच ते नऊ लाख डोस तयार करण्याची कंपनीची तयारी असल्याचं देखील डॉ. कुलकर्णी सांगतात.
एकुणच या इंजेक्शनला परवानगी मिळाली तर सध्याची हि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी, तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी फक्त महाराष्ट्रालाच नाही तर अख्या देशाला मदत होणार आहे. त्यामुळे डीसीजीआय, आयसीएमार यांनी प्राधान्यानं याचा विचार करायला हवा. तुर्तास गावाकडच्या या कंपनीने केलेले प्रयत्न जबरदस्तचं म्हणायला हवेत आणि त्यासाठी या कंपनीचे संचालक प्रताप देशमुख, दिलीप कुलकर्णी, धैर्यशिल यादव, नंदकुमार कदम यांच्यासह त्यांच्या सगळ्या टीमचं अभिनंदनच…!!!
हे ही वाच भिडू.
- या ठिकाणावरून सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुण्याचा पैसा मोजण्यास सुरवात केली जाते
- RBI च्या गव्हर्नरांना न जुमानता जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष खंबीर राहिला अन् सांगली जिल्हा घडला
- सांगलीची ही २१ वैशिष्टे वाचलासा तर डोकं भंजाळल्याशिवाय राहणार नाय…