गांधींनी केलेल्या ५ चुका ज्यामुळं गुलाम यांनी पक्षातून ‘आझाद’ होण्याचा निर्णय घेतला…

राहून राहून जागी होणाऱ्या माध्यमांच्या एका तर्काला अखेर आज पूर्णविराम मिळाला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडला, पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला.

गुलाम नबी आझाद यांनी G23 स्थापन केली तेव्हा त्यांच्या बंडखोरीच्या चर्चांना सुरुवात झाली. तेव्हापासून आझाद पक्षावर नाराज असल्याचं बोललं जातंय. त्यानंतर असे अनेक प्रसंग आले जेव्हा ‘आता गुलाम नबी आझाद काँगेस सोडतील’ अशा बातम्या लागल्या. पण दर वेळी गुलाम नबी आझाद यांनी या शंकांना टांग दिली. अशात आज अचानक त्यांच्या राजीनाम्याची बातमी आली.

काँग्रेस हायकमांडला राजीनाम्याचं पत्र लिहिताना त्यांनी ‘मी खूप जड अंतःकरणाने हा निर्णय घेत आहे. काँग्रेससोबतचं माझं ५० वर्षांचं नातं मी तोडतोय’, असं म्हटलं आहे. 

एककीकडे भाजपला फाईट देण्यासाठी काँग्रेस नव्याने पक्ष उभारण्याचं काम करत आहे. देशव्यापी संघटन करण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसने ‘भारत जोडो यात्रा’ आयोजित केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे मेन मेन नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत.

त्यावरूनच भारत जोडो ऐवजी ‘काँग्रेस जोडो यात्रा’ काढण्याची गरज आहे असा सल्लाही गुलाम नबी आझाद यांनी जाताना पक्षाला दिला आहे. 

पण गुलाम नबी आझाद यांच्या पक्ष सोडून जाण्यामागे मूळ कारण काय आहे?  त्याचं उत्तर म्हणजे… 

राहुल गांधी !!!

खुद्द गुलाम नबी आझाद यांनीच त्यांच्या राजीनामा पत्रात हे नमूद केलं आहे. त्यांनी काँग्रेसच्या अधोगतीचं सगळं खापर राहुल गांधींवर फोडलं आहे. हे पत्र गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांना लिहिलं आहे. 

पत्रात काय म्हणालेत गुलाम नबी आझाद? त्यात त्यांनी ५ मुद्दे सांगितलेत, 

१. राहुल गांधींनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारलं

राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला आणि सोनिया यांनी त्यांची जानेवारी २०१२ मध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवड केली तेव्हा राहुल गांधींनी पूर्वी अस्तित्वात असलेली संपूर्ण सल्लागार यंत्रणाच मोडीस काढली. त्यांनी पक्षातील सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना साईडलाईन केलं, असा आरोप आझाद यांनी केला आहे. 

२. राहुल यांची अपरिपक्वता पक्षाच्या प्रतिमेला मारक ठरली 

राहुल गांधी अपरिपक्व आहेत. त्यांच्या अपरिपक्वतेचं ठळक उदाहरण द्यायचं झाल्यास माध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडणं, असं आझाद यांनी नमूद केलं आहे.  अध्यादेश फाडण्याची घटना २०१३ ची आहे.

२७ सप्टेंबर २०१३ रोजी तत्कालीन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची पत्रकार परिषद चालू होती. शेजारी माजी केंद्रीय मंत्री आणि तत्कालीन खासदार अजय माकन बसले होते. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारने काढलेल्या एका अध्यादेशावर बोलत होते आणि बोलता बोलता अचानक राहुल गांधी यांनी सरकारने काढलेला तो अध्यादेश फाडून टाकला.

न्यायालयाने दोषी ठरवलेल्या नेत्यांना पुन्हा निवडणूक लढण्यासाठी मुभा देणारा तो अध्यादेश मनमोहनसिंग सरकारने काढला होता.

हा अध्यादेश काँग्रेस कोअर ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आला होता. नंतर भारताच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने एकमताने मंजूर केला होता आणि भारताच्या राष्ट्रपतींनीही त्याला विधिवत मान्यता दिली होती.  

मात्र आपल्याच सरकारने आणलेला अध्यादेश राहुल गांधी यांनी फाडला होता. या बालिश वर्तनामुळे पंतप्रधान आणि भारत सरकारचा अधिकार पूर्णपणे ढासळला. ज्याचा फटका निवडणुकांमध्ये पक्षाला बसला. २०१४ च्या निवडणुकांत युपीए सरकारचा प्रभाव होण्याला हीच एक कृती प्रकर्षाने कारणीभूत ठरली, असं आझाद पत्रात लिहितात. 

३. राहुल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा निवडणुकीत पराभव झाला

२०१४ पासून सोनिया आणि राहुल यांच्या नेतृत्वात पक्षाला निवडणुकीत फक्त पराभव बघावा लागला आहे, तो देखील अपमानास्पद असा पराभव. काँग्रेसने दोन लोकसभा निवडणुका हरल्या. २०१४ ते २०२२ दरम्यान झालेल्या ४९ विधानसभा निवडणुकांपैकी ३९ निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला आहे. पक्षाने केवळ चार राज्यांच्या निवडणुका जिंकल्या असून ६ ठिकाणी युती करण्यात यश मिळवलं. 

आता तर कॉंग्रेस केवळ दोन राज्यांमध्ये सत्तेत आहे आणि इतर दोन राज्यांमध्ये युतीचा असा भाग बनून राहील आहे की त्यांच्या असण्याचा कुणी विचार देखील करत नाही, अशी खंत देखील आझाद यांनी व्यक्त करत या परिस्थितीला राहुल यांना जबाबदार ठरवलं आहे. 

राहुल गांधी यांच्यात नेतृत्व गुण नसल्याचं ते याठिकाणी सांगत असल्याचं दिसतं. 

४. काँग्रेस अध्यक्षपद सोडण्यापूर्वी राहुल गांधींनी वरिष्ठ नेत्यांचा अपमान केला

२०१९ मध्ये  राहुल गांधींनी धास्तीने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या सर्व वरिष्ठ कार्यकर्त्यांचा अपमान राहुल गांधींनी केला होता. 

राहुल यांनी पद सोडल्यानंतर सोनिया यांनी अध्यक्ष पदाची सूत्र सांभाळली. हंगामी अध्यक्ष म्हणून स्वीकारलेल्या पदावर आजही सोनिया विराजमान आहेत. गेली तीन वर्ष झाली त्यात आणि पक्षाच्या स्थितीत काहीच बदल झाला नाहीये, असं आझाद लिहितात.  

५. राहुल गांधींचं रिमोट कंट्रोलद्वारे पक्षावर नियंत्रण

सगळ्यात वाईट परिस्थिती काय आहे हे सांगताना आझाद यांनी गंभीर खुलासा केला आहे. युपीए सरकारची संस्थात्मक अखंडता ज्याने मोडीत काढली ते ‘रिमोट कंट्रोल मॉडेल’ आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये लागू झालं आहे. 

सोनिया केवळ चेहरा आहेत, मात्र सर्व महत्त्वाचे निर्णय राहुल गांधी घेत आहेत किंवा त्यांचे सुरक्षा रक्षक आणि पीए घेत आहेत, असा खुलासा कम आरोप आझाद यांनी केला आहे.  

अशाप्रकारे अनेक आरोप आझाद यांनी राजीनामा पत्राद्वारे केले आहेत. पक्ष सोडण्याचा निर्णय केवळ राहुल गांधींच्या चुकीच्या वर्तनामुळे घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हे सांगताना त्यांनी भूतकाळातील मुद्यांवर प्रकाश टाकत कुठे कुठे राहुल गांधी चुकले आणि त्यामुळे गुलाम नबी आझाद आणि पक्षातील ज्येष्ठ नेते नाराज झाले हे सांगितलं आहे.

शेवटी राजकारण असो की कोणतंही ठिकाण.. भारताची संस्कृती ज्येष्ठांना आदर देण्याचं शिकवते आणि जर आदर मिळाला नाही तर काँग्रेस सारखी हालत होऊ शकते, ही आझाद यांच्याकडून राजकीय पक्षांना मिळणारी शिकवण असल्याचं बोललं जातंय.

काहीही असो गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधींवर केलेले ५ आरोप हे काँग्रेसचं वर्तमान आणि भविष्य सांगण्यासाठी पुरेसे आहेत एवढं मात्र नक्की.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.