विधानसभा अध्यक्षपदासाठी या ५ नावांवर महाविकास आघाडीत अजून एकमत होईना…

येत्या ५ आणि ६ जुलै रोजी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. याच अधिवेशनात मागच्या अनेक दिवसांपासून रिकामं असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. अजून याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, स्वतः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लवकरात घ्यावी असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुचवलं आहे.

तर त्यापाठोपाठ राज्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील त्याविषयी माहिती दिली, सोबतचं शिवसेना आणि काँग्रेसकडून अधिवेशनाच्या दोन्ही दिवसांसाठी आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हिप बजवण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच विधानसभेला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता दाट आहे.

महाविकास आघाडीमध्ये ठरल्याप्रमाणे हे अध्यक्षपद काँग्रेसकडे असणार आहे. पण त्यासाठी उमेदवार देणं हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न राहिलेला नाही आहे. काँग्रेस जाहीर करणाऱ्या उमेदवाराला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पसंती मिळणं आवश्यक आहे.

मात्र अधिवेशन अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपलं तरी अद्याप काँग्रेसकडून कोणाचही नाव अंतिम करण्यात आलेलं नाही. कॉंग्रेसचा इतिहास पाहता नाव जाहीर होईपर्यंत कोणतीही गोष्ट ग्राह्य धरता येत नाही. मात्र काही नाव चर्चेत नक्की आहेत. ज्यावर अजूनही खुद्द काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये एकमत होणं बाकी आहे. 

यात पहिलं नाव चर्चेत आहे ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांचं. 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण हे सध्या काँग्रेसमध्ये एक मोठं नाव आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यामध्ये देखील त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी त्यापासून काहीस लांबच राहणं पसंत केलं. त्यामुळे त्यांना आता सन्मानजनक पद देऊन त्यांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न काँग्रेसचा असू शकतो. सोबतचं त्यांना संसदीय कामकाजाचा त्यांचा अनुभव दांडगा आहे.

त्यामुळेच त्यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे.

पण चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आहेत. या विरोधाच प्रमुख कारण म्हणजे राज्यात चव्हाण मुख्यमंत्री असताना विरोधीपक्षापेक्षा जास्त त्रास हा राष्ट्रवादीला झाला होता. राष्ट्रवादीच्या अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर आरोप झाले आणि त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. 

राज्य बँकेवरील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला त्यांनी जोरदार धक्का दिला. त्यानंतर सिंचन क्षेत्रावर श्वेतपत्रिका काढण्याचे जाहीर करुन, त्यांनी राष्ट्रवादीकडील जलसंपदा खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यामुळे जर चव्हाण यांचे नाव पुढे आलेच असेल तर राष्ट्रवादीकडून विरोध होणे स्वाभाविक आहे.

सोबतच दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या जागी खासदारकीची संधी दिली जाऊ शकते अशी देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संग्राम थोपटे :

विधानसभा अध्यक्षपदासाठी भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव चर्चेत आहे.

थोपटे हे सध्या तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यात मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यामुळे थोपटे यांनी संधी देऊन पुण्यात काँग्रेसचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.

सोबतचं संग्राम थोपटे यांनी नुकतीच बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली होती. त्यांच्यात एक बैठकही झाली होती. त्या बैठकीस उपस्थित असलेल्या आमदारानं थोपटे यांचं नाव अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याच्या चर्चेला दुजोरा दिला आहे.

मात्र दुसरीकडे संग्राम थोपटे विधानसभा अध्यक्ष झाले तर ते आक्रमक असलेल्या विरोधी पक्ष भाजपला कितीपत नियंत्रणात ठेवू शकतील याबाबत शिवसेना संभ्रमात असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर अजूनही एकमत झालेलं नाही.

ऊर्जामंत्री नितीन राऊत :

विधानसभा अध्यक्षपदासाठी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा देखील विचार सुरु असल्याच्या बातम्या  माध्यमांमध्ये आहेत. त्याच कारण म्हणजे नाना पटोले हे सध्या मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी नुकतीच दिल्लीवारी देखील केली आहे.

मात्र सध्याच्या स्थितीत मंत्रिमंडळात एकही पद रिक्त नाही. त्यामुळेच उर्जामंत्री नितीन राऊत यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन त्यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवण्यासाठी पटोले हे प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. सोबतचं काँग्रेस पक्षाकडे राज्यातील दलित मतदारांना वळवण्याची सूचना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केली होती.

मात्र खुद्द नितीन राऊत यांनीच अध्यक्षपदासाठी नकार दिला असल्याच्या चर्चा आहेत. सोबतचं नाना पटोले यांच्याकडून असे प्रयत्न होत असल्याच्या चर्चेने नितीन राऊत नाराज देखील असल्याचं बोललं जात आहे.

४. सुरेश वरपुडकर

विधानसभा अध्यक्ष पदासाठी पाथरी मतदारसंघातील आमदार सुरेश वारपूडकर यांचे ही नाव समोर आले आहे. ते मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी १९९८ मध्ये कृषी राज्यमंत्री पद भूषवलं होते. त्यानंतर १९९८-९९ मध्ये ते परभणीमधून खासदार सुद्धा झाले होते.

सध्या त्यांना विधानसभा अध्यक्षपद देऊन राजीव सातव यांच्या निधनानंतर मराठवाड्यातील काँग्रेसची ताकद आणि पोकळी पुन्हा भरून काढण्यासाठी वारपूडकर यांना ताकद दिली जाऊ शकते.

मात्र नाराज संग्राम थोपटे आणि दिग्गज पृथ्वीराज चव्हाण या नावांवर आग्रही विचार सुरु असताना सुरेश वारपूडकर यांच्या नावाचा इतर २ पक्षात अग्रक्रमाने विचार होणार का हे बघणं महत्वाच आहे.

५. अमीन पटेल :

मुंबईतील आमदार अमीन पटेल यांचेही नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. अमीन पटेल हे मुंबादेवी मतदारसंघांतून निवडून आलेले काँग्रेसचे आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. सध्याची त्यांची तिसरी टर्म आहे. विधानसभेत येण्यापूर्वी ते मुंबई महापालिकेत नगरसेवक होते.

मुस्लिम चेहरा म्हणून देखील ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायद्याचा ठरतील अश्या चर्चा आहेत. मात्र असं असलं तरी शिवसेना मात्र अमीन पटेल यांना विधानसभा अध्यक्ष करण्यास तयार होईल का याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.