दुधाच्या कंपन्यांनी भाव वाढवलेत… त्याचा शेतकऱ्यांपर्यंत फायदा पोहोचतोय का?

पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर यांच्या किमतींमध्ये चढ-उतार होत असताना आता दुसरीकडे दुधाने या रांगेत लागण्याची तयारी सुरु केली असल्याचं दिसतंय. अमूल आणि मदर डेअरी सारख्या कंपन्यांनी त्यांची विक्री किंमत वाढवली आहे. प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय या कंपन्यांनी घेतला आहे.

अमूलने संपूर्ण भारतभर या किंमती लागू केल्या आहेत तर मदर डेअरीने सध्या दिल्ली-एनसीआरमध्ये या किमती लागू केल्या आहेत. १७ ऑगस्टपासून ग्राहकांना २ रुपये महाग दूध विक्री केलं जातंय. 

असं का करण्यात आलंय? याबद्दल विचारलं असता अमूलने सांगितलंय की…  

दुधाच्या एकूणच ऑपरेशनचा कॉस्ट आणि प्रोडक्शन कॉस्टमध्ये वाढ झाल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गुरांच्या आहाराचा खर्च अंदाजे २०% पर्यंत वाढला आहे. शिवाय इनपुट खर्चात झालेली वाढ लक्षात देखील घेणं गरजेचं आहे. 

दूध कंपन्यांनी दुधाच्या पॅकेट्सचे भाव वाढवले आहेत. त्यामुळे सामान्यांना आता २ रुपये महागाने दूध मिळणार आहे. “ते काहीही असो, शेतकऱ्यांना फायदा होतोय ना? हे महत्वाचं” असं काही दिलदार ग्राहकांचं म्हणणं असेल. तुमचं देखील असंच म्हणणं असेल तर थांबा… 

खरंच दुधाच्या कंपन्यांनी विक्री दर वाढवल्यावर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो का? हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केलाय… हे एकदा वाचा आणि मग ठरवा… 

दूध सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचतं तिथपर्यंतची प्रोसेस ३ टप्प्यांमध्ये विभागून आपण समजून घेऊया…

पहिला टप्पा बघूया कंपन्यांचा…

अमूलने सांगितल्याप्रमाणे त्यांची इनपुट कॉस्ट वाढली आहे. कंपन्यांची इनपुट कॉस्ट म्हणजे ज्या दरात ते शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करतात. फॅट आणि SNF (सॉलिड-नॉट फॅट) या दोन निकषांच्या आधारावर शेतकऱ्यांकडून दूध खरेदी केलं जात असतं.  

सध्या ३.५ टक्के फॅट आणि ८.५ टक्के SNF असलेल्या दुधाची खरेदी किंमत सुमारे ३२-३३ रुपये प्रति लिटर आहे.

कंपनीचा पुढचा मुद्दा म्हणजे ऑपरेशनचा कॉस्ट आणि प्रोडक्शन कॉस्ट वाढली आहे. म्हणजे ३२ रुपयांच्या पुढची किंमत. ही प्रोसेस कशी असते आणि यामध्ये कंपनीला सरासरी किती खर्च येऊ शकतो, हे जाणून घेण्यासाठी बोल भिडूने इंडियन डेअरी फार्मर असोसिएशनचे फाउंडर रवींद्र नवले यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं… 

गावपातळीवर जे दूध संघ शेतकऱ्यांकडून दूध संकलन करतात त्यांच्याकडून दूध खरेदी करताना कंपन्यांना त्यांना २ रुपये कमिशन द्यावं लागतं. तिथून कंपनीपर्यंत दूध मोठ्या टँकर्समध्ये आणलं जातं. त्याचा खर्च येत असेल अंदाजे ७५ पैसे. त्याच्यापुढे सुरु होते दुधावर प्रक्रिया. 

कंपनीच्या गेटच्या आत आल्यानंतर दूध पाश्च्युराईज केलं जातं. म्हणजे घरी जसं दूध आपण गरम करून नंतर ते गार करतो, म्हणजेच निर्जंतुन करतो, तीच प्रोसेस.

कंपनीत मोठ्या प्रमाणात पाश्च्युराईजेशन केलं जातं. जवळपास ९० डिग्रीला दूध गरम करून इन्स्टंट ते ४ डिग्रीला आणलं जातं आणि मग त्याला टॅन्कमध्ये स्टोअर केलं जातं जेणेकरून त्याच्यात बॅक्टेरिया वाढणार नाहीत. त्याला अंदाजे ७० पैसे ते १ रुपया त्यांना प्रतिलिटर खर्च येतो. 

पुढे दूध पॅकिंगसाठी जात असतं. ऑर्डरनुसार दुधाचे वेगवेगळे पदार्थ बनवण्यास ते पुढे पाठवले जातात. आपण दुधाच्या पॅकिंगबद्दल बघितलं तर दुधाच्या पाऊचचा खर्च येतो १० ते २० पैसे. आणि मग पुढे सिटीमध्ये दूध वितरित केलं जातं. ज्या-त्या सिटीजमध्ये दूध पाठवण्याच्या ट्रान्सपोर्ट खर्च वेगला येतो. आपण अंदाजे ७५ पैसे आपण घेऊया.. 

यासर्व प्रोसेसमध्ये डिझेल, मॅनपॉवर आणि लाईट याचा खर्च १ रुपये प्रतिलिटर असा मानून घ्या.. यासर्वांमध्ये कमी-जास्त होत असते. मात्र इनपुट कॉस्टनंतर दुधाच्या प्रोडक्शनपर्यंत ५ ते ६ रुपये कंपनीचे ऍड होत असतात. 

अशाप्रकारे ३२ रुपयांची इनपुट कॉस्ट दुधाच्या उत्पादनापर्यंत होते ३७ रुपये. पुढे कंपनीचे डिस्ट्रीबरयुटर्स ठरलेले असतात. त्यांना कंपनी १-२ रुपये मार्जिन स्वतःकडे ठेवून विक्री करते. ३७ रुपये कंपनीचा उत्पादन खर्च असेल तर ३९ रुपये प्रतिलिटर ते डिस्ट्रीबरयुटर्सला देतात. 

हे देताना कंपनीने विक्री किंमत ठरवलेली असते. जसं की अमूलची ४२ रुपये होती. हे ३ रुपये पुढच्या टप्प्यासाठी असतात…म्हणजे डिस्ट्रीबरयुटर्स ते ग्राहक साखळी. 

डिस्ट्रीबरयुटर्स  एक ते दीड रुपये मार्जिन स्वतःकडे ठेवत छोट्या दुकानदारांना विकतात आणि मग छोटे दुकानदार कंपनीने ठरवलेल्या किमतीत ते आपल्याला विकतात. त्यांना देखील यात  एक ते दीड रुपये मार्जिन मिळते. 

असे हे दोन टप्पे असतात. आता आपला महत्वाचा तिसरा टप्पा.. शेतकऱ्यांचा. 

कंपनी शेतकऱ्यांकडून ३२ रुपयांना दूध घेते. म्हणजे ही झाली शेतकऱ्यांची आउटपुट कॉस्ट. शेतकऱ्यांना आउटपुट कॉस्टपर्यंत येण्यासाठी किती फायदा सध्याच्या घडीला होतोय, हे बघायला त्यांचा उत्पादन खर्च बघावा लागेल…

हे जाणून घेण्यासाठी बोल भिडूने सोलापूरचे शेतकरी वामन गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या माहितीनुसार…

शेतकऱ्याचा दूध व्यवसाय गाईवर अवलंबून असतो आणि ती गाय किती दूध देणार हे तिला दिल्या जाणाऱ्या आहारावर अवलंबून असतं. या आहारात चारा, पशुखाद्य आणि सप्लिमेंट येतात.

पशुखाद्याचे दर सध्या वाढवलेले आहेत. म्हणून सध्याच्या घडीला एका लिटरमागे पशुखाद्याला जातात १६ रुपये. चाऱ्याला जातात ८ रुपये, मीनल मिक्सचर सारख्या सप्लिमेंटसाठी ५० पैसे ते १ रुपये धारा, लाईटबील सारख्या इतर सप्लिमेंटसाठी १ रुपया, यात गायीचं आजारपण, तिचा औषधोपचार यासाठी १ रुपया धरूया… असे झाले २७ रुपये.

पुढे मजुराचा खर्च येतो. ३ रुपयांपर्यंत हे जर धरलं तर ३० रुपये होतात. आणि आता पुढे येतं भागभांडवल जे शेतकऱ्याने गुंतवलेलं असतं. भांडवलाचा घसारा कमी होणं, बँकेचं व्याज याचे २ रुपये होतात.

अशाप्रकारे शेतकऱ्याचा दुधाचा उत्पादन खर्चच सध्या ३२ रुपयांपर्यंत जात आहे. आणि त्याची व्रिक्री किंमत देखील तेवढीच आहे, ३२ रुपये.

दूध संघटना याच किमतीत त्यांच्याकडून दूध खरेदी करत आहेत. म्हणजे इथे शेतकऱ्यांना सध्या काहीच हाती लागत नाहीये. यात मजुरीचे जाणारे ३ रु प्रतिलीटर हा खर्च जर शेतकरी स्वतः काम करत असेल तर तेवढेच पैसे शेतकऱ्यांना राहतात नाहीतर काहीच मिळत नाही, असं शेतकरी वामन गायकवाड सांगतात.

मग आता कंपनीने पैसे वाढवले आहेत, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो का?

ही संपूर्ण प्रक्रिया जर बघितली तर लक्षात येतं, शेतकऱ्यांचा संबंध तिथेच संपतो जेव्हा ते दूध संघाला दूध विकतात.

कंपनीने जे २ रुपये वाढवले आहेत ते म्हणजे त्यांना स्वतःला दूध तयार करायला जो प्रोसेसिंग खर्च आला आहे त्यासाठी आहे. म्हणजे लाईट, ट्रान्सपोर्ट सारख्या सप्लिमेंटमध्ये त्यांना तो वाढीव खर्च आलेला आहे आणि त्याच्या भरपाईसाठी कंपनीने दुधाचा विक्री दर वाढवला आहे.

शेतकऱ्यांना याचा सध्याच्या घडीला काहीच फायदा होत नाहीये, असं शेतकरी आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे.

 हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.