राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेबद्दलच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का..?

सत्ताधारी पक्षावर जर एकच घाव टाकायचा असेल तर विरोधी पक्षांनी लॊकांमध्ये मिसळून विषय लावून धरले पाहिजेत आणि लोकांमध्ये मिसळायचं असेल तर पदयात्रेपेक्षा दुसरं चांगलं माध्यम असूच शकत नाही.

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांची पदयात्रा, कांशीराम यांनी हजारो किलोमीटर सायकलवर केलेली यात्रा, वायएसआर रेड्डी यांनी काढलेली पदयात्रा आणि जगनमोहन रेड्डी यांनी काढलेली यात्रा लोकांना चांगलीच लक्षात आहे. म्हणूनच याच पदयात्रेचं धोरण काँग्रेसने आखलंय.

काँग्रेसने “भारत जोडो यात्रा’ सुरु केली आहे. आजच या यात्रेचा शुभारंभ तामिळनाडूतील कन्याकुमारीमध्ये झाला असून पुढील ५ महिने ही पदयात्रा असणार आहे. साडेतीन हजार किलोमीटर पायी चालून राहूल गांधी हे मोदींना पर्याय म्हणून उभा राहण्याचा प्रयत्न करणार आहेत.

जाणून घेऊया काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेबद्दलच्या १० गोष्टी

गोष्ट क्र. १ – या यात्रेचा उद्देश काय ?

राहुल गांधी जरी या भारत जोडो ला ‘यात्रा’म्हणत असतील तरीही राजकीय विश्लेषक याला २०२४ च्या निवडणुकीची तयारी म्हणतायेत. त्यानुसारच या यात्रेचा उद्देश असा दिसतोय की, “सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारचे अपयश जनतेसमोर मांडायचं, लोकांना जोडून घ्यायचं, जनतेशी संवाद साधायचा, काँग्रेसला पुन्हा एकदा गावागावात पोहोचवायचं आणि पक्षाने स्वबळावर देशातील निवडणुकीस सामोरं जायचं”

गोष्ट क्र. २. राहुल गांधींसोबत कोण-कोण असेल ?

आज राहुल गांधी यांच्या हस्ते या यात्रेचं उद्घाटन होऊन कन्याकुमारी येथून ही यात्रा सुरु झाली आहे. या यात्रेत राहुल गांधी, पवन खेरा, कन्हैया कुमार यांच्यासहित ११९ नेते असणार आहेत, त्यांना भारत यात्री असं म्हणलं जाणार आहे. या ११९ मध्ये प्रत्येक राज्यांच्या नेत्यांचा समावेश आहे, त्यात महाराष्ट्रातले ९ नेते असणार आहेत. ज्या राज्यांतून ही यात्रा जात नाही त्या राज्यातले १००-१०० लोकं सहभागी होतील, हे ‘पाहुणे यात्री’ असतील. आणि ज्या राज्यांमधून ही यात्रा जात जातेय त्या राज्यांमधूनही १००-१०० लोकं सहभागी होतील. हे प्रदेश यात्री असतील…जे फक्त त्यांच्या राज्यातच या यात्रेत सहभागी होतील.

गोष्ट क्र. ३ – भारत जोडो यात्रेचं अंतर 

काँग्रेस मोदी सरकारविरोधात तब्बल ३,५७० किलोमीटरची पदयात्रा काढणार आहे. तसेच ही यात्रा सुमारे १४८ दिवस चालणार आहे याचा अर्थ ३,५०० किमी चे अंतर १४८ दिवसांमध्ये पार करायचं आहे. राहुल गांधी या यात्रेचे नेतृत्व करणार असून हा साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास राहुल गांधी पायीच कव्हर करणार आहेत.

गोष्ट क्र. ४ – भारत जोडो यात्रेचं नियोजन.

मागे झालेल्या कॉंग्रेसच्या उदयपूर चिंतन शिबिरात या पदयात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. पुढील ५ महिन्यांत हवामानात होणारा बदल लक्षात घेऊन नियोजन करण्यात आलंय. ही यात्रा १२ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतून जाणार आहे. तमिळनाडूमधून ८ सप्टेंबरला म्हणजे उद्या कन्याकुमारीमधील पॉलिटेक्निक कॉलेजमधून सकाळी सात वाजता यात्रा सुरू होईल. दररोज सरासरी २२-२३ किमीची पदयात्रा होईल. सकाळी ७ ते साडेदहा आणि दुपारी ३ ते साडेसहा अशा दोन टप्प्यांत दररोज यात्रा असेल. सकाळी १५ किमी तर, संध्याकाळी ८ किमीचे अंतर कापले जाईल. 

गोष्ट क्र.५ – या यात्रेचा मार्ग.

भारत जोडो यात्रेच्या नकाशानुसार, ही यात्रा १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांना कव्हर करत जाईल.. या दरम्यान यात्रा २० प्रमुख ठिकाणांहुन जाणारे..कन्याकुमारी, तिरुवनंतपुरम, कोची, निलांबूर, म्हैसूर, बेल्लारी, रायचूर, विकाराबाद, नांदेड, जळगाव जामोद, इंदूर, कोटा, दौसा, अलवर, बुलंदशहर, दिल्ली, अंबाला, पठाणकोट, जम्मू..अन् शेवटी श्रीनगर. 

या दरम्यान ही यात्रा केरळमध्ये १८ दिवस आणि कर्नाटकात २१ दिवस राहणार आहे.  काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होईल तेव्हा ही यात्रा कर्नाटकात असेल.राहूल गांधींची ही यात्रा म्हणायला 12 राज्यातून जाणार आहे पण नकाशा पाहिल्यानंतर कळतं की प्रत्येक राज्याच्या कोपऱ्या कोपऱ्यातून ही यात्रा जातेय. युपी सारख्या राज्याच्या कोपऱ्यावरून जाणारी ही यात्रा जळगाव जामोद आणि नांदेड वरून जात आहे. यूपीचा मोठ्ठा भाग, बिहार, झारखंड, छत्तीसगड, आंध्रचा मोठ्ठा भाग, तामिळनाडू अशा अनेक राज्यांमध्ये या यात्रेचे पाय देखील लागणार नाहीत. 

गोष्ट क्र. ६ – महाराष्ट्रात ही यात्रा कधी येणार ?

८ सप्टेंबरला सुरु होऊन ही यात्रा महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला देगलूरमध्ये प्रवेश करेल. महाराष्ट्रात राहुल गांधी यांचा १६ दिवस मुक्काम असणार आहे. त्यानंतर पुढे नांदेडमार्गे पुढे ही यात्रा महाराष्ट्रात ६ दिवसांत ३८३ किमीचे अंतर पार करेल.

गोष्ट क्र.७ – राहण्याची व्यवस्था ट्रकच्या कंटेनरमध्ये असणार.

राहूल गांधींना ग्लॅमरपासून दूर राहून साध्या पद्धतीने हा दौरा पूर्ण करायचाय अस सांगितल जातय. त्यामुळे पदयात्रा करणारे नेते आणि कार्यकर्ते रात्रीचा आराम करण्यासाठी कोणत्याही लॉजमध्ये, हॉटेलमध्ये राहणार नाहीत तर ट्रकवर असणाऱ्या कंटेनरमध्ये त्यांची व्यवस्था असणारे. या भारत जोडो यात्रेसाठी एकूण ६० कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. 

अशी माहिती मिळतेय कि, या कंटेनरच्या काही डब्यांमध्ये स्लीपिंग बेड्स, टॉयलेट आणि एसीही देखील बसवले गेलेत. लांबचा प्रवास असल्याने खूप उष्णता किंवा आर्द्रता असेल, म्हणून एसीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. हे कंटेनर फक्त रात्री झोपण्यासाठी असतील बाकी पूर्णवेळ यात्रेकरू रस्त्यावरच जेवतील..

गोष्ट क्र. ८- यात्रेदरम्यान दरम्यान दोन राज्यांच्या निवडणूका हा मेन फॅक्टर आहे. 

ही यात्रा आज सप्टेंबर महिन्यात सुरु झालीये ती ५ महिने चालणार आहे म्हणजेच २०२३ च्या जानेवारीमध्ये या यात्रेचा समारोप होईल…आणि याचदरम्यान डिसेंबर महिन्यात हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या विधानसभा निवडणूका येणार आहेत. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये पोहोचण्याचा कॉंग्रेस पक्षाचा प्रयत्न असेल. त्यात भारत जोडो यात्रा परिणामकारक ठरू शकतेय.

गोष्ट क्र. ९ – भारत जोडो यात्रेची ‘महात्मा गांधींच्या पदयात्रेशी तुलना करण्याचा प्रयत्न केला जातोय.

‘खादीपासून तयार केलेला राष्ट्रीय तिरंगा फडकावून भारत जोडो यात्रेची सुरुवात केली जाईल. यात्रेत मेड इन चायनावाला पॉलिएस्टर ध्वज नसेल. तेव्हा खरा राष्ट्रवाद आणि बनावट राष्ट्रवादातील फरक कळेल’’, असे काँग्रेसचे मीडियाप्रमुख जयराम रमेश यांनी ‘भारत जोडो’ यात्रेची माहिती देताना सांगितले. या यात्रेचा संबंध खादी आणि स्वदेशी वस्तूंशी जोडून काँग्रेस ‘भारत जोडो’ची तुलना गांधीजींच्या पदयात्रांशी करण्याचा प्रयत्न करत आहे. 

स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी महात्मा गांधी यांनी १९४२ साली ‘चले जाव’चा नारा दिला आणि अख्खा देश एकवटला होता.. तोच धागा पकडत काँग्रेस भाजप सरकारच्या विरोधात एक होण्याचं आवाहन करत  भारत जोडो यात्रा काढत आहे.

गोष्ट क्र. १० – या यात्रेला कितपत यश मिळेल ??

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला या यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधायचा आहे. सद्या काँग्रेसची असणारी बिकट अवस्था पाहता पक्षाला पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी, पक्षाच्या उभारणीसाठी तसेच भाजपला सक्षम प्रतिस्पर्धी पक्ष म्हणून काँग्रेसच आहे, असं स्वतःचं स्थान बळकट करण्यासाठी या पदयात्रेचं यशस्वी होणं मस्ट आहे. 

देशातलं ताणलं गेलेलं धार्मिक वातावरण, बेरोजगारीचा वाढता टक्का आणि सोबतच वाढती महागाई असे सर्व मुद्दे काँग्रेस पुढे करून २०२४ मध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं टार्गेट ठेवतंय. हि भारत जोडो यात्रा कितपत यशस्वी ठरेल हे येत्या डिसेंबर महिन्यातील  हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा आणि २०२४ च्या लोकसभेच्या निकालातून स्पष्ट होईल.

थोडक्यात ही भारत जोडो यात्रा कशी पार पडेल त्याचे काय परिणाम दिसून येतील आणि या यात्रेने मरगळलेल्या कॉंग्रेसला पुन्हा संजीवणी मिळेल हे पाहणं गरजेचं आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.