प्रिन्स चार्ल्स उत्तराधिकारी झाले खरे पण उत्तराधिकारी ठरवण्याचे नियम पण तगडे आहेत..

१९५२ चा किस्सा आहे. देशातल्या एका शक्तिशाली राजघराण्याची राजकुमारी केन्याच्या दौऱ्यावर गेली होती. तिथे जाऊन जंगली प्राणी न्याहाळणं, त्यांची शिकार करणं हे तिला अनुभवायचं होतं.

केनिया घनदाट जंगलात ती गेली आणि झाडावर बांधलेल्या घरात राहून तिने प्राणी निरीक्षण सुरु केलं. त्यात सगळ्यात जास्त आकर्षण तिला होतं गेंडा या प्राण्याचं.

घनदाट जंगल त्यात २५ वर्षांची तरुण राजकुमारी म्हटल्यावर तिच्या संरक्षणासाठी त्याकाळचा सगळ्यात प्रतिभावंत शिकारी जिम कॉर्बेट सुरक्षारक्षक म्हणून होता. दिवसभर प्राणीनिरीक्षण करून राजकुमारी रात्री झाडावर चढली आणि घरात आरामात झोपली. मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा ती झाडावरून खाली उतरली तेव्हा ती जगातील सर्वाधिक शक्तिशाली साम्राज्याची ‘राणी’ झाली होती.

कसं? तर त्याच रात्री राजकुमारीच्या वडिलांचं निधन झालं होतं. आणि राजघराण्याच्या परंपरेनुसार वडिलांच्या मृत्यूनंतर राजकुमारी त्यांची वारसदार ठरत राणी झाली होती. 

आपण बोलतोय राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याबद्दल…

काल ब्रिटनची राणी एलिझाबेथचं निधन झालं आणि त्यांच्या कारकिर्दीबद्दल, त्यांच्या खाजगी आयुष्यातील काही महत्वाच्या घटनांबद्दल चर्चा सुरु झाली. मात्र सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न ठरला – राणीचा उत्तराधिकारी कोण होणार?

प्रश्न पडणं साहजिकच आहे. कारण ब्रिटिश साम्राज्याच्या या राणीची संपत्तीचं इतकी गडगंज होती की जगातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये त्यांचं नाव घेतलं जात होतं. त्यातही ब्रिटिश साम्राज्याचा राजा/ राणी हे पदच मुळात किती मोठं आहे, हे दीडशे वर्ष ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली राहिलेल्या भारतीयांना काही नव्याने सांगण्याची गरज नाही. 

तेव्हा राणीच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल माहिती काढता समजतं…

राणी एलिझाबेथ यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रिन्स चार्ल्स हे उत्तराधिकारी असतील. 

राणीला तसे ३ मुलं आणि १ मुलगी. मग असं असताना सगळी संपत्ती एकाच मुलाला कशी? याच्या उत्तरासाठी ब्रिटिश साम्राज्याचा उत्तराधिकारी कसा निवडतात? आणि इतिहास कसा राहिला आहे? हे समजून घ्यावं लागेल. 

ब्रिटिश सिंहासनाचा उत्तराधिकारी निवडताना जेंडर, धर्म आणि लोकमान्यता या गोष्टींचे निष्कर्ष लावले जातात. यासाठी बिल ऑफ राइट्स १६८९, ऍक्ट ऑफ सेटलमेंट १७०१ आणि ऍक्ट ऑफ यूनियन १७०७ हे कायदे लागू केले जातात. 

ऍक्ट ऑफ सेटलमेंट १७०१ नुसार जेम्स पहिला याची नात असलेल्या राजकुमारी सोफिया हिच्या वंशजांना गादीसाठी पात्र ठरवलं जातं. त्यातही पहिले मोठ्या मुलाला प्राधान्य दिलं जातं. सोबतच भविष्यातील राजाचे चर्च ऑफ इंग्लंडशी चांगले संबंध असणं गरजेचं आहे. 

२०१३ मध्ये उत्तराधिकाराच्या एका कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली. याआधी जर राजघराण्याच्या उत्तराधिकाराच्या रांगेत एखादा मुलगा जन्माला आला आणि त्याआधी त्याची मोठी बहीण उत्तराधिकारी असेल तर मुलाच्या जन्मानंतर तो बहिणीला रिप्लेस करायचा. मात्र २०१३ च्या क्राऊन ऍक्टनुसार, मुलींना समान हक्क देण्यात आले आणि मुलाने मुलीला रिप्लेस करण्याची प्रथा बंद करण्यात आली. 

उत्तराधिकाराशी संबंधित नियम केवळ संसदीय कायद्याद्वारेच बदलले जाऊ शकतात. सिंहासनाचा कोणताही उत्तराधिकारी स्वेच्छेने त्याचा उत्तराधिकार सोडू शकत नाही. गादीवर बसल्यानंतर एखादी व्यक्ती मरेपर्यंत राज्य करत असते. 

१९३६ मध्ये एडवर्ड आठवा यांनी इतिहासात स्वइच्छेने पदाचा त्याग केला होता, ज्याला संसदेच्या एका विशेष कायद्याने कायदेशीर मान्यता दिली होती. तर आजवर केवळ एकाच व्यक्तीला अनैच्छिकपणे पदावरून हाकलण्यात आलं होतं. तो व्यक्ती म्हणजे जेम्स सातवा आणि दुसरा, ज्यांना १६८८ मध्ये ग्लोरियास रिव्होल्यूशनच्या वेळी पदावरून निष्कासित करण्यात आलं. 

इंग्रजी परंपरेनुसार उत्तराधिकारी ठरण्यासाठी राज्याभिषेक होणं गरजेचं नाहीये. जेव्हा एखादा राजा/राणी मरण पावते त्याआधीच त्यांचे उत्तराधिकारी ठरलेले असतात. त्यामुळे सहसा राज्याभिषेक हा उत्तराधिकारानंतर काही महिन्यांनी केला जातो. 

हे नियम कसे लागू होत गेले आणि उत्तराधिकारी बनत गेले, हे बघूया…

राणी एलिझाबेथचा जन्म २१ एप्रिल १९२६ रोजी लंडनमध्ये झाला. तेव्हा त्यांचे आजोबा जॉर्ज पंचम गादीवर विराजमान होते. त्यांच्यानंतर गादीचा अधिकार एलिझाबेथ यांचे काका एडवर्ड आठवे यांच्याकडे गेला. कारण ते सर्वात मोठा मुलगा होता. मात्र डिसेंबर १९३६ मध्ये एडवर्ड आठवे यांनी पदत्याग केला तेव्हा राणीचे वडील किंग जॉर्ज सहावे ब्रिटनचे राजा झाले. 

फेब्रुवारी १९५२ मध्ये जॉर्ज यांचा मृत्यू झाला त्यानंतर ही जबाबदारी आली एलिझाबेथ यांच्याकडे. ब्रिटनच्या राणी म्हणून सिंहासनावर आरूढ झाल्या.

त्यांचा ७० वर्षांचा कालखंड त्यांनी पूर्ण केला आहे. जेव्हा त्या राजघराण्याच्या गादीवर बसल्या तेव्हा त्यांचं वय केवळ २५ वर्ष होतं. राजघराण्याच्या नियमानुसार गादीवरील राजा/राणी यांचा मृत्यू झाल्याशिवाय दुसरं कुणी त्या गादीवर बसू शकत नाही. राणी ९६ वर्ष जागल्या. म्हणून सर्वात जास्त काळ या गादीवर बसल्याचा मान त्यांना मिळाला आहे. 

राणीला ४ मुलं आहेत. मात्र नियमानुसार पहिल्या मुलाला पात्र ठरवलं जातं. त्यामुळे प्रिन्स चार्ल्स राणीचे वारसदार ठरत आहेत. प्रिन्स चार्ल्स यांना दोन बायका राहिल्या आहेत. पहिली बायको लेडी डायना स्पेन्सरसोबत त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी कॅमिला पार्कर बाऊल्सशी लग्न केलं. मात्र आता उत्तराधिकारी ठरवताना त्यांच्या मोठ्या मुलाला संधी आहे. 

डायनासोबत चार्ल्स यांना दोन मुलं झाली. विल्यम आणि हॅरी. मोठ्या मुलाच्या नात्याने विल्यम पुढचे उत्तराधिकारी असणार आहेत. शिवाय गादीचा पुढचा वारस या नात्याने चार्ल्स यांना त्यांची शाही कर्त्यव्य पूर्ण करण्यात मदत करण्याची जबाबदारी विल्यम यांच्या खांद्यावर आहे. 

विल्यम यांनी २०११ मध्ये केट मिडलटन यांच्या सोबत लग्न केलं आहे. या जोडप्याला जुलै २०१३ मध्ये जॉर्ज, २०१५ मध्ये शार्लोट आणि २०१८ मध्ये  लुईस अशी तीन मुलं झाली आहेत. विल्यम यांच्या नंतर त्यांचा मोठा मुलगा जॉर्ज हे वारसदार असणार आहेत. आणि जर त्यांना  झालंच तर त्या लाईनमध्ये नंतर शार्लोट ही मुलगी आणि त्यांच्या नंतर लुईस हा मुलगा आहे.

इथे प्रश्न पडतो…

जर विल्यम यांना काही झालं तर डायरेक्ट त्यांच्या मुलाकडे हा राजगादी कशी जाईल? कारण त्यांचा दुसरा मुलगा हॅरी असणार, तो का वारस ठरू शकत नाही?  कारण इतिहास बघता जेव्हा एलिझाबेथ यांच्या काकांनी गादी सोडली तेव्हा एलिझाबेथ यांचे वडील राजा बनले होते. या न्यायाने विल्यमनंतर हॅरी यांचा हक्क आहे. 

तर यामागे किस्सा असा आहे की, 

हॅरी यांनी १९ मे २०१८ रोजी अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्कलशी लग्न केलं होतं. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये या शाही जोडप्याने राजघराण्याचा त्याग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी राजघराण्याचे सर्व सुख सोडून सामान्य जीवन जगण्याचं जाहीर केलं होतं. म्हणून त्यांचा किंवा त्यांच्या मुलांचा आता या गादीवर हक्क राहत नाही. 

एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर पहिल्या २४ तासांत चार्ल्स यांना अधिकृतपणे राजा म्हणून घोषित केलं जाईल. ही प्रक्रिया लंडनमधील सेंट जेम्स पॅलेसमध्ये अॅक्सेशन काऊंसिल याऔपचारिक मंडळासमोर पार पडणार आहे. यात प्रिव्ही काऊन्सिलचे सदस्य म्हणजे ज्येष्ठ आजी-माजी खासदारांचा समावेश असेल तसंच काही वरिष्ठ नागरी सेवक, कॉमनवेल्थ उच्चायुक्त आणि लंडनच्या महापौरांचाही समावेश असेल.

चार्ल्स यांच्या पदग्रहणाचा राज्याभिषेक हा सर्वांत महत्त्वाचा घटक असेल. चार्ल्स हे ४० वे राजे असतील. राज्याभिषेक समारंभ हा राज्याच्या घडामोडींसदर्भातला एक भाग असल्यानं सरकार त्यासाठी पैसे देत असतं आणि पाहुण्यांची यादी देखील ठरवत असतं. 

 हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.