म्हणून मुंबईला आल्यावर या ५ मोठ्या मार्केट्सला भेट देणं मस्ट असतंय…

मुंबई ही माणसांशिवाय अपुरी आहे. एरवी गर्दीला शिव्या घालणारी मुंबईची लोकं लॉकडाऊनच्या काळात सुन्न पडलेल्या या शहराकडे पाहूही शकत नव्हती. बस, रेल्वे असो, खाऊगल्ल्या असो किंवा प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक स्थळं असो. मुंबईत लोकांना गर्दी करायला वेळ काळ, सणवार काही काही लागत नाही. ही ठिकाणं बारा महीने चोवीस तास तशीच गजबजलेली असतात.

मुंबईची हीच गजबज असते ती मुंबईच्या मोठाल्या मार्केट्समध्ये. लहानशी गल्ली त्यातच दुकानांचे गाळे आणि लोकांचे बार्गेनिंगचे राडे. कशालाच सुट्टी नाय. मुंबईला फिरायला गेल्यावर लोकं मुंबईच्या मार्केट्सना सुद्धा हमखास भेटी देतात, पण असं काय विशेष आहे या मुंबईच्या मार्केट्समध्ये? आणि मुंबईला गेल्यावर नेमकी कोण कोणती मार्केट्स पालथी घालायची…

पहिलं आहे क्रॉफर्ड मार्केट.

क्रॉफर्ड मार्केट म्हणजे मुंबईतलं शॉपिंगसाठीचं सगळ्यात फेमस मार्केट. मुंबईचे पहिले म्युन्सीपल कामिशनर आर्थर क्रॉफर्ड यांच्या नावावरूनच या मार्केटला क्रॉफर्ड मार्केट असं नाव पडलं. सीएसएमटी स्टेशनजवळ असलेलं हे मार्केट महात्मा ज्योतिबा फुले मंडई म्हणूनही ओळखलं जातं. या मार्केटमध्ये तशा अनेक गोष्टी मिळतात पण या मार्केटची खासियत म्हणजे हे मार्केट होलसेल मार्केट आहे.

आता इथे काय मिळतं ? काय मिळत नाही असं विचारायचं. फळ भाजीपाला, मसाले, स्टेशनरी वस्तू, कपडे, दागिने, घरात ठेवायच्या अँटिक गोष्टी. अशा सगळ्या गोष्टी इथे मिळतात.

पण त्यातल्या त्यात इथे वाढीव गर्दी होते ती फळ आणि भाजीपाल्यासाठी. अतिशय कमी किमतीत इथे एकदम फर्स् क्लास ताजी भाजी मिळते आणि आणखी एक खास गोष्ट इथे मिळते… ती म्हणजे इंपोर्टेड चॉकलेट्स, ती पण एकदम स्वस्त दरात. 

दुसरं आहे कोलाबा कॉजवे.

पोरींमध्ये शॉपिंगच्या चर्चा चालू आहेत आणि कोलाबा कॉजवेचं नाव आलं नाही असं कधी होत नाही. आता कोलाबा कॉजवे अर्थातच मुंबईच्या कोलाबा एरियात आहे. हा एरिया पायी फिरण्यासारखा आहे. कोलाबा कॉजवेचा लॅंडमार्क सांगायचा झाला, तर तो म्हणजे कॅफे लिओपोल्ड जिथे २६/११ चा हल्ला झाला होता, ते कॅफे या मार्केटजवळ आहे.

कोलाबा कॉजवेला अजून एक नाव आहे ते म्हणजे शहिद भगत सिंग रोड. आता या मार्केटमध्ये काय मिळतं ? तर अँटिक ज्वेलरी, डिजायनर आणि कॅज्यूअल वेअर असे दोन्ही प्रकारचे कपडे, जुन्या रस्टिक भारीतल्या गोष्टी आणि कलरफूल चपला. एखाद्या नावाजलेल्या फॅशन स्टोअर मधली व्हरायटी संपेल पण कोलाबा कॉजवे मार्केट मधली व्हरायटी संपत नसते.

हे मार्केट म्हणजे अशी एक जागा आहे जिथे कधी कधी भारतीयांपेक्षा सुद्धा फॉरेनर्स जास्त दिसतात. मार्केटमधे मिळणाऱ्या जुन्या काळातल्या गोष्टींमुळे कोलाबा कॉजवेला व्हिंटेज मार्केट सुद्धा म्हणतात. शॉपिंग आटपलं की मार्केट जवळच लियोपोल्ड आणि कॅफे मोंडेगार असे दोन कॅफे आहेत. कॅफेचा कंटाळाच आला असेल तर बडेमियाँला जाऊन मस्त कबाब हाणायचा की झालं.

आता येऊया भुलेश्वर मार्केटकडे.

या मार्केटच्या आजू बाजूला मुळातच क्रॉफर्ड मार्केट, झवेरी बाजार, मंगलदास मार्केट अशी मोठी मार्केट्स आहेत त्यामुळे या मार्केटला कशाचीच कमी नाही. या मार्केटला ब्राइड्स मार्केट म्हणूनही ओळखलं जातं. घरात लग्नाचा माहोल असेल तर भुलेश्वर मार्केटला हमखास चक्कर टाका. डिजायनर चपला म्हणू नका, इमिटेशन ज्वेलरी म्हणू नका, भरजरी ड्रेसेस आणि लेहेंगाज म्हणू नका. इथे सगळं मिळतं आणि ते पण एकदम बजेटमध्ये बसणाऱ्या किमतीत.

इथली दागिन्यांची दुकानं खास आहेत. शिवाय फक्त बांगड्यांची सुद्धा इथे मोठ मोठी दुकानं आहेत. त्यामुळे लोकं आणि खास करून बायका या मार्केटमध्ये शिरल्या 3-4 तास कुठेच जात नाहीत.

चौथा आहे चोर बाजार.

ग्रँट रोड जवळच्या मटन स्ट्रीटला लागून हा चोर बाजार आहे आणि या चोर बाजाराला तब्बल १५० हून अधिक वर्ष झालीयेत. ब्रिटिशांच्या काळापासून हा बाजार अस्तित्वात आहे आणि तेव्हा सुद्धा हा बाजार कायम गजबजलेला असायचा. 

आजही इथे जशी गर्दी असते तशीच पूर्वी सुद्धा असायची. सतत गजबज, आवाज आणि कल्ला असायचा म्हणून या बाजाराचं नाव ‘शोर बाजार’ असं होतं. पण तेव्हा व्हायचं काय, तर इंग्रजांना ‘शोर’ हा शब्द उच्चारता येत नसे. ते शोर हा शब्द चोर असा उच्चारत असत आणि म्हणून असं म्हणतात की तेव्हापासूनच शोर या शब्दाचा अपभ्रंश चोर असा झाला आणि हा बाजार चोर बाजार म्हणूनच ओळखला जाऊ लागला.

आता इथे काय मिळतं? तर पुरातन काळातल्या किंवा अँटिक गोष्टींचं बरचसं सेकंड हँड कलेक्शन या चोर बाजारात आहे. इथे तुम्हाला छोट्या मोठ्या आकाराचे कंदील, छोटे मोठे तांब्या पितळ्याचे पुतळे, कॅमेरे, बॉलीवुडचे पोस्टर्स, घड्याळं, गाड्यांचे स्पेअर पार्ट्स अशा अनेक गोष्टी मिळतात.

बॉलीवुडच्या सेट्ससाठी सुद्धा अनेक गोष्टी इथे भाड्याने घेतल्या जातात. या बाजारात तुम्ही गेलात की ठरवलेल्या गोष्टींपेक्षा चार जास्तीच्याच गोष्टी तुम्ही विकत घेऊन येत असता.

आणि आता शेवटचं म्हणजे पाचवं मोठं मार्केट आहे धारावीचं लेदर मार्केट.

धारावीची झोपडपट्टी ही फक्त एक स्लम एरिया म्हणून मर्यादित राहिलेली नाहीये तर, अनेक मार्केट आणि इंडस्ट्रीजचं मोठं जाळं बनलीये. इथला बिझनेस सुद्धा मोठ्या स्केलवर सुरू असतो. धारावीत लेदर मार्केट, पॉटरी मार्केट म्हणजे मातीच्या मडक्यांचा व्यवसाय असणाऱ्यांचं मार्केट, कपड्यांचं मार्केट अशी बरीच छोटी मोठी मार्केट्स आहेत.

लेदर मार्केटचं सांगायचं झालं तर धारावीतल्या लेदर मार्केटचं जाळं, जशी वर्ष जातील तसं अजून अजूनच पसरायला लागलंय आणि हे मार्केट धारावीतलं सगळ्यात मोठं मार्केट आहे. 

इकडच्या चामड्याच्या वस्तूंना परदेशातूनही मागणी असते. या वस्तूंमध्ये चांबड्यापासून बनवलेल्या चपला, बॅग्स, वॉलेट, जॅकेट अशाही गोष्टी मिळतात.

धारावीत उत्पादन झालेले अनेक प्रॉडक्ट्स अख्ख्या जगभरात एक्सपोर्ट केले जातातच, शिवाय हे लेदर, ‘झारा’ सारख्या लक्झरी ब्रॅंड्सना सुद्धा धारवीतूनच पुरवलं जातं. धारावीतत्या लेदर मार्केटमध्ये जवळ जवळ दीड लाख लोकं काम करतात आणि हे मार्केट वर्षाला जवळ जवळ ३०० ते ५०० मिलियन डॉलरचा टर्नओव्हर आरामात करतं.

तर ही होती मुंबईतली पाच मोठी मार्केट्स, या शिवाय लालबाग हिंदमाता मार्केट, बांद्रा लिंक रोड मार्केट, फॅशन स्ट्रीट, दादर फूल मार्केट ही मार्केट्सची यादी तशी न संपणारीच आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.